-
जयंत वाबळे
‘प्यार
किया तो डरना क्या’ ह्या ओळी कानावर पडताच नजरेसमोर येते अनारकली म्हणजे मधुबाला.
भारतीय इतिहासात
आजपर्यंत सर्वात हिट ठरलेल्या या चित्रपटाने साठ वर्ष पूर्ण केली आहेत. गेली सहा दशके ह्या चित्रपटाने माझ्या मनावर गारूड केले आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर मी हा सिनेमा पाहिला.
दर वेळेला वेगळी अनुभूती आली.
सिनेमाचा
पडदा उघडतो, पुत्रप्राप्तीसाठी वाळवंटात, अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दिन चिस्तीच्या दर्ग्यात नवस (मन्नत) करण्यासाठी
जाणारा शहेनशहा जलालुद्दिन अकबर दिसतो. मागे सजवलेला हत्ती,
सैनिक आणि पालखीत बेगम, सगळं कसं एकदम भव्य.
मुलगा
मोठा होतो. त्याची अनारकली नावाच्या दासीशी जवळीक वाढत
जाते. जोधाबाई, अकबराची हिंदू राणी, कृष्णाष्टमीचा सण साजरा करणार असते, तेव्हा युवराज
सलीम अनारकलीला राधा करण्यास सांगतो.
‘मोहे पनघट पे
नंदलाल छेड गयो रे’ हे अप्रतिम गाणं. लताचा आवाज आणि
मधुबालेचे आरस्पानी सौंदर्य.
मी
बारा-तेरा वर्षांचा असताना हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला.
नुकतेच आयुष्यात रंग भरण्यास सुरवात झाली होती. ह्या गाण्याला तर मी खुर्चीला खिळून बसलो होतो.
युवराज
अनारकलीच्या प्रेमात वेडा होतो आणि तिलाच मल्लिका-ए-हिंद बनवण्याचा हट्ट धरतो.
शहेनशहा नकार देतो. युवराज आपल्या पित्याशी
युध्दाला उभा राहतो. शहेनशहा दासीला कैद करतो व भिंतीत चिणून
मारण्याची शिक्षा देतो.
प्रेमासाठी
स्वत:च्या पित्यासमोर उभा ठाकलेला सलीम, युद्धभूमीवर
संपूर्ण योद्ध्याच्या पोशाखातला सलीम, एकदम तरूणाईचा हिरो
वाटतो. चित्रपटाची भव्यता, संगीत,
लढाया, ह्यापेक्षा लक्षात राहते ती शीश
महालाच्या प्रत्येक आरश्यात थिरकणारी मधुबाला. तीच जास्त
आकर्षित करते.
ह्यानंतर
वयाच्या तिशीत मी हा सिनेमा परत पाहिला. आता विचारांची
दिशा बदललेली असते, समज आणि समाजाचे भान आलेले असते. सलीम अनारकलीच्या प्रेमात अखंड बुडाला म्हणजे काय,
हे जाणवले. आपल्या प्रेमासाठी वाट्टेल ते धाडस व त्याग
करण्याचा विचार जास्त प्रभावी वाटला.
‘मुगल-ए-आझम’
२००४ ला संपूर्ण रंगीत झाला. सम्राट अकबराच्या
भूमिकेत पृथ्वीराज कपूर आणि आपल्या पित्याशी संघर्ष करण्यास उभा ठाकलेला सलीम म्हणजे
दिलीपकुमार, जोधाबाईच्या भूमिकेत दुर्गा खोटे आणि अनारकली मधुबाला अशी जबरदस्त
कलाकारांची फौज. पण लक्षात राहते ती सौंदर्याची खाण असलेली मधुबाला. ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’ हे गाणं असो की ‘प्यार किया तो डरना
क्या’ असो, मधुबाला खाऊन टाकते.
चित्रीकरण पण झकास झाले आहे.
एकूण
बारा गाणी. लता, रफी, शमशाद बेगम ह्यांचे आवाज आणि नौशादचे संगीत. ह्या
सगळ्यावर कडी म्हणजे तानसेनला दिलेला उस्ताद बडे गुलाम अली खांसाहेब ह्यांचा आवाज. सोहनी रागाची आलापी ही त्याच तोडीची व्हावी, तसेच
‘प्रेम जोगन बन के’ ही ठुमरी, हा चित्रपटाच्या यशाचा मोठा
भाग आहे.
मी
वयाच्या पन्नाशीत हा सिनेमा परत पाहिला. ह्या वेळेला मी
आयुष्याच्या अशा टप्प्यावर होतो की फक्त प्रेम आणि त्यासाठी त्याग, हे विषय गौण वाटायला लागले. राजा हा राजा असतो,
कायदा कानून ह्यांनी बांधलेला असतो. मुलाच्या
हट्टापायी एका दासीला सम्राज्ञी बनवणे स्वीकारू शकत नाही.
मुलगा व पती, एकमेकांशी लढायला निघालेले पाहिल्यावर आईची
होणारी घालमेल, खूपच चटका लावून जाते.
पीर-फकीरासमोर
हात पसरून, नवसासायासाने झालेला मुलगा, एका क्षुद्र दासीसाठी आपल्याविरूध्द लढायला उभा ठाकतो, आपल्याला आव्हान देतो, हे सगळे पित्यासाठी केवढे
कष्टप्रद आहे.
चित्रपट
तोच,
मांडणी तीच, फक्त रंग भरत गेलेले. जीवनाचे पण
असेच आहे. आपण आपल्या भावविश्वात असतो आणि त्याप्रमाणे विचार
करतो. तारूण्यात सगळेच रंगीत असते, तारतम्य
बाळगून विचार करण्याची सवय नसते. तसेच माझे झाले.
पुत्रप्राप्तीसाठी
पदर पसरणारा सम्राट देवापुढे थिटा वाटतो. सलीम
अनारकलीच्या प्रेमाला विरोध करणारा शहेनशहा खलनायक वाटतो.
ज्याने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलाच्या उन्नतीसाठी खर्च केले त्या पित्याशी
तो मुलगा युद्ध करायला तयार होतो. सगळेच अगम्य.
असा हा ‘मुगल-ए-आझम’, ज्याने माझे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा