संस्कृत – समज आणि गैरसमज

 -      सौ. मानसी मांडे  

“संस्कृत” हा शब्दच मुळी आपल्यासाठी एखाद्या संग्राह्य चीजवस्तूसारखा आहे. म्हणजे काय तर संस्कृत म्हटलं की, आपल्यामध्ये एकदम अभिमानाची भावना जागृत होते, हे अतिशय सुंदर आणि अमूल्य आहे हे आपल्याला माहित असतं, पण शोकेसमध्ये एखादं सुबक घंगाळं ठेवावं तसं! अमूल्य असेल तरीही कायम दुर्लक्षित किंवा रोजच्या जीवनात काहीच उपयोग नसणारं! आज संस्कृतची अवस्थापण अशीच आहे. सणवार, एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळीच संस्कृतचा वापर होतो. आणि दहावीपर्यंत अधिक गुण मिळवून देणारा विषय म्हणून!

संस्कृत म्हणजे मंत्र, भगवद्गीता आणि देवः देवौ- यापुढे आपली गाडीच जात नाही. अगदीच नाही म्हणायला कोणीतरी कालिदासाच्या साहित्याबद्दल काहीतरी बोलते. संस्कृतची विद्यार्थिनी म्हणून या सर्व गोष्टी माझ्यासाठी खरंच खूप त्रासदायक आहेत. त्यामुळे कायमच संस्कृत सारख्या देवभाषेची ही अवस्था का व्हावी आणि ही अवस्था कशी बदलता येईल याविषयी बर्‍याचदा स्वतःशीच विचारमंथन सुरू असते, बरेचदा सहाध्यायी, मित्र-मैत्रिणी, विद्यार्थी यांच्याशी बोलून हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करते.

या सगळ्यातून काही गोष्टी समोर आल्या. आज आपल्याकडे कोणत्याही बाबतीत दोन टोकाचे तट पडलेले दिसतात. संस्कृत आणि आपली संस्कृती, पर्यायाने आपली धार्मिक कार्ये, उत्सव, चाली-रीती यांची एक घट्ट वीण बनली आहे. बरेचदा नवीन पिढीने चाली-रीतींबाबत विचारलेल्या प्रश्नांची घरातील ज्येष्ठांनी दिलेली उत्तरे नव्या पिढीला पटत नाहीत. आणि नव्या पिढीच्या दृष्टीने ती उत्तरे त्यांच्या आधुनिक निकषांवर तपासून दाखवली जात नाहीत, त्यामुळे त्यांना सगळेच चुकीचे वाटते. या सर्वाचा परिपाक म्हणजे दोन पिढ्यांची तोंडे दोन बाजूंना होतात. अर्थातच आपली शैक्षणिक धोरणे या सगळ्याला हातभार लावतातच. परिणामतः हे दोन्ही तट आपापसातच आपले म्हणणे कसे खरे आहे, यावर चर्चा करत राहतात, आणि विशेष काहीच निष्पन्न होत नाही. अर्थातच यालाही तुरळक अपवाद आहेतच. पण या सगळ्या प्रकारात आपली नवीन पिढी मात्र संस्कृतपासूनच दूर जाते आहे.

मंत्र, सण, वार, धार्मिक कार्ये, संस्कार या सगळ्याच्या पलिकडेसुद्धा संस्कृतमध्ये काही आहे, हे सगळ्यांनीच समजून घेण्याची गरज आहे. वास्तुशास्त्र, रसायनशास्त्र, वाद्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र अशा अनेक विषयांवरील लिखाण संस्कृत भाषेमध्ये आहे. π = २२/७ हे यज्ञाची वेदी तयार करताना फार पूर्वीपासून वापरले जायचे. गुरुत्वाकर्षणाबद्दल अन्नंभट्ट नावाच्या ग्रंथकर्त्याने ‘तर्कसंग्रह’ नावाच्या ग्रंथात न्यूटनच्या फार पूर्वीच सांगितले आहे. शिवाय या ग्रंथातील अन्नंभट्ट यांच्या म्हणण्यानुसार या ग्रंथामध्ये त्यांनी माहितीचे केवळ संकलन केले आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षण याबद्दल त्यांच्या पूर्वीच माहिती होती. कर कसा गोळा करावा, एखादी इमारत अग्निरोधक कशी करावी, राजनैतिक धोरणे कशी आखावी, गुप्तहेर कसे पेरावे अशा विविध विषयांवर सांगोपांग चर्चा कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात आहे. असेच अजून अनेक रोचक आणि महत्त्वाचे म्हणजे आजही ज्याचा उपयोग आपण करू शकतो असे विषय संस्कृत भाषेमध्ये आहेत. इतकेच नाही तर संस्कृत ही एक अतिशय शास्त्रोक्त भाषा आहे. व्याकरणदृष्ट्या ज्या पद्धतीने केवळ सूत्र स्वरुपात नियम, अपवाद, वापर याचा जो काही मेळ बसवला आहे की, आधुनिक शास्त्रज्ञांच्या मते संस्कृतच्या व्याकरणाचे हे सूत्र स्वरूपातील तंत्र संगणकाला कशा पद्धतीने ‘कमांड’ देता येतील यासाठी उत्तम मार्गदर्शक आहे.

आज जी मुले शाळेत संस्कृत शिकतात त्यांना हे काही तर कोणी सांगतच नाही पण पुस्तकात जे आहे ते तरी आपण का शिकतो, हे देखील त्यांना कोणी सांगत नाही. ‘परंपरा, संस्कृती जपण्यासाठी!’ हे उत्तर आताच्या पिढीला मान्यच नाही. मग यावर उपाय काय? सरकार आणि शैक्षणिक धोरणे बदलतील तेव्हा बदलतील, पण आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करायला काय हरकत आहे?

मी माझ्यापुरता यावर एक उपाय शोधला आहे. मागची पिढी किती पुढे येईल आणि पुढची पिढी किती मागे येईल, याचा आपापल्या घरातला अंदाज प्रत्येकाला असतो. अशा वेळी मी या दोन टोकांमधला दुवा होते. दोन्ही पिढ्यांचे म्हणणे समजून घेऊन, ज्याला त्याला ज्याच्या  त्याच्या भाषेत सांगते. तसेच नवीन पिढीला शक्यतो त्यांच्या तार्किक भाषेत समजावण्याच्या प्रयत्न करते. आणि मुख्य म्हणजे अशा प्रकारे जिथे संधी मिळेल तिथे जे जे सांगता येईल ते सांगते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!