देणं कृतज्ञतेचं!

 -      अनिकेत अजित निकम

नमस्कार! तुम्हा सर्वांना दिवाळी २०२० च्या आरोग्यमय शुभेच्छा! दिवाळीच्या किंवा तत्सम सणांच्या शुभेच्छा देताना आपण नेहमीच सुख समृद्धी लाभो वगैरे म्हणतो, पण आजची आपली सर्वांची कोविड २०१९ मुळे एकंदरीत परिस्थिती पाहता आरोग्यमय शुभेच्छा देणे किती गरजेचे आहे हे वेगळे सांगायला नको. आमचा कौटुंबिक व्यवसाय पर्यटनाचा असल्याने मी कायमच निरनिराळ्या ठिकाणी फिरतो आणि लोकांना नेहमी सुदृढ रहा. फिरत रहा असे सांगत असतो पण दुर्दैवाने आज तुम्हाला घरातच रहा असे नाईलाजाने सांगत आहे.

    डिसेंबर २०१९च्या अखेरीस मी, माझी पत्नी दीप्ती, मुलगा अद्वय आणि सासूबाई स्वतःच्या गाडीने ‘साम्राज्य’ पासून प्रवासास सुरुवात करून सोलापूर – कर्नूल - कडप्पा – तिरुपती - चेन्नई - पॉंडेचरी - मदुराई - रामेश्वर – उटी - म्हैसूर - हुबळी असा तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा घरी आलो. २०२० हे वर्ष आमच्या स्वागतास सज्ज होतेच. प्रवासाच्या आठवणींमध्ये रमत रमत पुन्हा कामाला सुरुवात केली. आमचे ‘निकम टूर्सचे’ ऑफिस हे कर्वे पुतळा चौकात असल्यामुळे एकंदरीतच माझा कोथरूड परिसरातील जनसंपर्क चांगला आहे आणि त्याचा फायदा निश्चितच मला माझ्या पर्यटन व्यवसायात होत असतो. २०२० वर्षाची सुरुवात देखील इतर वर्षांप्रमाणे अतिशय छान झाली. जानेवारी मध्ये भूतान दौरा करून आल्यावर माझ्याकडे चार धाम, लडाख, मनाली, नॉर्थ ईस्ट, मलेशिया, दुबई, सिक्कीम-दार्जिलिंग अशा एक ना अनेक पॅकेजेसची बुकिंग झाली होती. बुकिंग केलेल्या अनेक प्रवाशांनी निम्म्याहून अधिक पैसे जमा देखील केले. वर्षाची सुरुवात अपेक्षेपेक्षा छान झाल्याने मी समाधानी होतो. एव्हाना चीन देशातील वुहान शहराच्या बातम्या कानावर येत होत्या. पुढे जाऊन याच गोष्टी इतक्या गंभीर होतील आणि आपल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर इतका भीषण परिणाम होईल असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. मलेशियाचा माझा दौरा १७ मार्च रोजी ठरला होता. आम्ही फक्त ईस्ट मलेशियाला भेट देणार होतो त्यामुळे तेथील सरकारने पेनिस्युलर मलेशियावर प्रवाशांना मज्जाव केला असला तरी आम्ही फारसे काळजीत नव्हतो. मात्र वैयक्तिक माझ्या घरून मला नन्नाचा पाढा होता. सगळी तयारी झाली. विमान तिकिट, व्हिसा, करन्सी आली होती. अखेरीस १७ मार्च दिवस उजाडला. मी बॅग भरायला सुरुवात केली. विमानाचे उड्डाण १८ मार्चच्या पहाटे असल्यामुळे मी पुण्यातून संध्याकाळी निघणे अपेक्षित होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मोबाईलवर काहीतरी मेसेज आला, मी उत्सुकतेने मोबाईल घेतला. मेसेज वाचून माझा विश्वास बसेना. फ्लाईट कॅन्सल्ड! काय करू काहीच सुचेना. आता पुढे काय? तेथील हॉटेलचे केलेले बुकिंग? स्थानिक पर्यटनासाठी केलेल्या गाड्यांचे बुकिंग? 

    अशा एक ना अनेक प्रश्नांनी माझ्या मनामध्ये थैमान घालायला सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे फ्लाईट रद्द झाली हे ऐकून घरचे मात्र सुखावले. परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय माझ्यापुढे काहीएक पर्याय नव्हता. तो दिवस तसाच द्विधा मनस्थितीत घालवून मी दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला गेलो. येणाऱ्या फोनला काय उत्तर देऊ हेच मला समजत नव्हते. प्रत्येक जण फोनवर हेच विचारत होता की आता पुढे काय? सहल जाणार का? नाही गेली तर काय? आम्ही भरलेल्या पैशांचं काय? मी निरुत्तर होतो.

देशातील परिस्थिती देखील गंभीर होऊ लागली होती. माननीय पंतप्रधानांनी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन केले. देशवासीयांनी देखील त्याला खूपच चांगला प्रतिसाद दिला. २३ मार्च रोजी रात्री १२ वाजल्यापासून अमर्यादित काळासाठी लॉकडाउन घोषित करण्यात आला. १४४ कलम लागू करण्यात आले. त्यानंतर धडाधड पुढील सगळी विमाने, रेल्वेगाड्या रद्द झाल्याने माझ्याकडे बुकिंग झालेल्या सगळ्या सहली रद्द झाल्या. काही नाईलाजाने तर काही प्रवाशांकडून. अडकलेले पैसे व नुकसान झाल्यामुळे आर्थिक झळ मी आकड्यात मोजू लागलो. दोन लाख... चार लाख… दहा लाख… पंधरा लाख…. तब्बल २१ लाख ७५ हजार! माझे डोळे पांढरे झाले. प्रचंड दडपण आले. रक्‍तदाब वाढू लागला. या वयात असले त्रास? बापरे! कसा मार्ग काढायचा आता? काय होऊन बसले हे? आजवर अशी परिस्थिती कदाचित कधीच आली नव्हती. आलेल्या संकटामुळे मी पुरता हतबल झालो होतो. घरात, फोनवर, टीव्हीवर फक्त आणि फक्त एकच विषय - कोरोना!

सगळे खूप नकारात्मक आणि उदासीन वाटू लागले. फक्त भीतीचे वातावरण. दिवस ढकलायचा, बस! स्वतःला कशात गुंतवू हा यक्षप्रश्न माझ्यासमोर होता. १० एप्रिलचा दिवस, दुपारच्या वेळी असाच शिवाजी सावंतांचं ‘मृत्युंजय’ चाळत असताना कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांचा फोन आला. मदत हवी आहे! भेटायला या. फोन ठेवला आणि मी चमकून उठलो. मीच केलेली कविता मला पुन्हा आठवली-

चैतन्याची वीज उसळली एकाएकी जगताना...

झोपलेल्या जाग्या झाल्या भावना मनी वसताना.

स्फुरण चढले बाहूंना, कंप फुटला शत्रूला...

निधडी छाती, तलवार नंगी... म्यान पडले बाजूला!

   गेली वीस वर्षे मी विविध सामाजिक संघटनांमार्फत कार्यरत आहे. जोशी मॅडम वाहतूक शाखा पौड फाटा येथे असताना देखील त्यांच्यासोबत वाहतूक व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा अशी बरीच कामे केलेली आहेत. समाजसेवा किंवा पोलिसांना मदत हे काही मला नवे नसल्याने दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर उठून न्याहरी करून मी तडक पोलीस स्टेशन गाठले. विषय समजून घेतला. माझ्यावर आपत्कालीन व्यवस्थापन प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली. पोलीस स्टेशनच्या आवारात घालण्यात आलेल्या मांडवात माझी व माझ्या सहकार्‍यांची व्यवस्था करण्यात आली. 


फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्यात असा आदेश असल्यामुळे जनता खूप संभ्रमात होती. कोणाला परवानगी आहे, कोणाला नाही हे लोकांना समजत नव्हते. लोक अडचणींचे निवारण करण्यासाठी स्वाभाविकच पोलीस स्टेशनला येऊ लागले. माझं व सहकाऱ्यांचं ध्येय एकच. प्रत्येकाच्या प्रश्नांचे निवारण करायचे. ई-पास साठी अर्ज कसा करायचा? अत्यावश्यक सेवांचा पास कसा मिळवायचा? पेट्रोल कसे मिळवायचे? सोसायटीच्या जनरेटरसाठी डिझेल कसे मिळवायचे? गावांतर्गत, शहरांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवास कसा करायचा? असे प्रश्न लोक विचारू लागले. त्यांना मार्गदर्शन करणं माझ्यासाठी आनंददायक होतं.


    पण नंतर हळूहळू वेगळ्याच गोष्टी समोर येऊ लागल्या. ऊस तोड कामगार, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, हातावर पोट असलेले लोक येऊ लागले. “साहेब, आमचं काम बंद झालं हो. आमच्याकडे पैसे नाहीत. घरात खायला अन्नाचा कण नाही. आम्ही पोटाची खळगी कशी भरू? आम्ही कसं जगू?” मला माझीच लाज वाटू लागली. आपण इतके दिवस जे दुःख उगाळत बसलो होतो, ते या लोकांच्या दुःखापुढे किती छोटं आहे याची जाणीव मला होऊ लागली. विचार मन पोखरू लागले. काम तर आपण करतच आहोत पण ते संवेदनशील होऊन करणं गरजेचे आहे हे मन मला सांगू लागले. मी ठरवलं आता एकाच भावनेने काम करायचं. आपण समाजाचे देणे लागतो! 
    स्वतःची आर्थिक बाजू कोलमडून पडल्याने मी तरी कोणाच्या पोटाची भूक भागवू शकत नव्हतो. मग पर्याय फक्त एकच! मित्रांना, आप्तेष्टांना व समाजातील दानशूरांना मदतीचे आवाहन करायचं. स्वच्छ आणि शुद्ध मराठीत एक संदेश तयार करून तो ‘व्हॉट्सप’च्या माध्यमातून सर्वांना पाठवला. व्यवहार पारदर्शक राहण्यासाठी स्वतःच्या खात्यावर पैसे न घेता संस्थेच्या नावाने मदत करण्याचा आग्रह धरला. मदत येऊ लागली तशी आम्ही धान्य खरेदी करून त्याची ‘किट’ बनवू लागलो. प्रचंड वेगात काम सुरू झाले. गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, मसाले अशी पद्धतशीर शेकडो ‘किट’ तयार करून ती गरजूंपर्यंत पाठवणे हेच आमचं काम. हे सगळं करत असताना इतर संस्थांशी व त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क येत गेला आणि मग त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आम्ही काम सुरू केले. मला सांगण्यास अतिशय आनंद होतो की आम्ही आजवर ६२ हजार लोकांना जेवण दिले आहे. अनेक गरजू गरोदर स्त्रियांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविले आहे. अनेक गरीब रुग्णांचे हॉस्पिटलचे बिल विविध योजनांमध्ये बसवून कमी करून दिले आहे. 


एकीकडे ही सगळी कामे सुरू असताना घरी मात्र सगळे सतत चिंतेत होते, कारण फक्त एकच - कोरोना! मी सतत बाहेर असल्यामुळे माझा लोकांशी येणारा संपर्क हे त्यांच्या चिंतेचे खूप मोठे कारण होते. पण मी अगदीच घरावर तुळशीपत्र ठेवून काम न करता स्वतःची काळजी घेत ही कामे करत होतो. किंबहुना करत आहे.

         खरी गंमत तर पुढे होती. सरकारने आपल्या राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण ते वाटते तेवढे सोपे काम नव्हते. त्यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागणार होते. पुणे आयुक्तालय मार्फत प्रत्येक पोलीस उपायुक्तांना आपल्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २१ नुसार ‘विशेष पोलीस अधिकारी’ नेमण्याचे आदेश दिले. ‘परिमंडळ तीन’च्या आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांना घेऊन मी व माझे मित्र प्रसिद्ध मराठी सिने दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर (‘आई कुठे काय करते?’ फेम मधुराणी प्रभुलकर यांचे पती) यांनी एक चित्रफीत तयार केली. ती संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात पसरली. एवढेच कमी होते की काय ती पाहून मला अमेरिकेहून एका लांबच्या भावाचासुद्धा फोन आला. सोशल मीडियाची ताकद मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणवली. आपण फक्त त्याचा समाजासाठी चांगला फायदा कसा करू शकतो हे महत्त्वाचे. चित्रफितीमध्ये संपर्क म्हणून माझा मोबाईल क्रमांक असल्याने मला तेव्हा रोजचे साधारण ८० ते ९० फोन येत होते आणि अनेक मेसेजेस. असो!
आता मनुष्यबळ तर मिळाले पण एवढ्या सगळ्या मजुरांचे स्थलांतर म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. एक तर ते सगळे अशिक्षित त्यामुळे त्यांचे सर्वांचे ऑनलाईन अर्ज भरणे, नियमानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करणे. ही कामे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध होणे गरजेचे होते. शिवाय वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांची टीम देखील गरजेची होती. पण चांगलं काम करण्यासाठी जर तुम्ही पुढे सरसावला तर सगळ्या अडचणी आपोआप दूर होतात. आम्हाला पौड रोडवरील ‘मंत्रा’ कार्यालय उपलब्ध झाले आणि डॉक्टरांची टीम देखील!  त्या काळात रोजच्या दोन हजार वैद्यकीय तपासण्या होत होत्या आणि शेकडो समूहांचे अर्ज भरून होत होते. मजूर अशिक्षित असून देखील कुठेही कोणतीही गडबड नाही, गोंधळ नाही, सगळे एकदम शिस्तबद्ध. आणि त्यामागे होती प्रत्येक व्यक्तीची निस्वार्थ आणि अपार मेहनत!



    सर्व मजुरांची राज्य वर्गवार विभागणी करण्यात आली. प्रत्येक समूहाचा गटनेता ठरविण्यात आला. ही सर्व माहिती पोलीस मुख्यालयाला पाठवून त्याप्रमाणे अभ्यासपूर्वक व आवश्यकतेनुसार रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये पी.एम.टी.ची मजुरांना रेल्वेस्टेशनला सोडण्यात फार मोठी मदत झाली. पोलीस, पी.एम.टी, रेल्वे विभाग, एस. पी.ओ. (विशेष पोलीस अधिकारी) या सगळ्यांनी मिळून ही मोठी जोखीम अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली. सरकारी यंत्रणा किती कार्यक्षमतेने काम करू शकते याचे दर्शन घडविले. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की नुसत्या कोथरूड आणि कर्वेनगर भागातून दहा हजाराहून जास्त मजुरांचे स्थलांतर आम्ही यशस्वीपणे पार पाडले. अनेक मजूर असे होते की त्यांच्या गावी रेल्वे गाड्या जात नाहीत. मग अशा मजुरांचे काय करायचे? बसने प्रवास? बापरे! एवढे बस भाडे ते कसे देणार? या संदर्भात माझे पुण्याचे पोलीस सहाय्यक आयुक्त रवींद्र शिसवे यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यांनी मला संपूर्ण पुण्यासाठी काम करा व राजकीय पक्षांना मदतीस घ्या अशी विनंती केल. पण मी ती नाकारली व फक्त कोथरूड भागातून मी हे कार्य करीन असे सांगितले. त्यांनीही ते मोठ्या मनाने मान्य केले. पुढे आम्ही अशा सर्व मजुरांच्या गटनेत्यांना पोलीस स्टेशनला बोलवले, त्यांचे समुपदेशन केले, त्यांना बसभाड्याचा अंदाज दिला. हे सर्व मेट्रोचे कामगार असल्यामुळे काही पैसे त्यांनी स्वतः गोळा केले तर काही त्यांच्या ठेकेदाराने आणि मग मी त्यांच्यासाठी बसेसची व्यवस्था केली. आजवर कधीच इतक्या लांब पल्ल्यासाठी बसेस पाठवल्या नसल्याने प्रत्येक बस सोबत दोन चालक पाठविले. बसेस चांगल्या स्थितीत आहेत याची खात्री केली आणि प्रवाश्यांमध्ये योग्य ते अंतर राखत त्यांना रवाना केले. तेलंगण, कर्नाटक या नजीकच्या राज्यांबरोबर अगदी झारखंड, त्रिपुरा सारख्या लांबच्या राज्यांमध्ये सुद्धा बसेस पाठवण्यात आल्या. स्वतःच्या घरी जाण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणाऱ्या त्या मजुरांची उलघाल मी खूप जवळून बघितली. आपण किती सुखी आहोत तरीदेखील सतत छोट्या छोट्या गोष्टींसाठी किती कुरकूर करतो हे मला क्षणोक्षणी जाणवत होते. बस मागून बस, रेल्वे मागून रेल्वे गेल्या. 

 


    सगळ्या मजुरांचे स्थलांतर झाले. पण स्थानिक लोकांचे काय? कोरोना आ वासून उभा होता. झोपडपट्ट्यांमधील राहणारे लोक, सार्वजनिक शौचालय वापरणारे लोक... त्यांचे काय? त्यांचे प्रबोधन कोण व कसे करणार? मग मी आणि माझ्या मित्रांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची मदत घेऊन आपल्या परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये वैद्यकीय तपासणी शिबिरे राबवली. त्यांना कोरोना पासून स्वतःला कसे वाचवायचे याचे धडे दिले. हे सगळे करत असताना चार-पाच महिने कसे गेले कळलेच नाही. रेशनिंगच्या दुकानासमोर लोकांची नीट रांग लावणे, महानगर पालिकेने सांगितलेले परिसर पत्रे लावून बंद करणे, येण्या- जाणाऱ्यांवर निर्बंध घालणे, नियम मोडणाऱ्या लोकांवर १८८ कलमा अंतर्गत कारवाई करणे या सर्व गोष्टी करत असताना खूप मोठा अनुभव मिळाला. हे सगळे काम करताना समाजातील अनेक स्तरातून मला प्रचंड बळ मिळाले. त्या प्रत्येक व्यक्तीचे, संस्थेचे व राजकीय पक्षाचे नाव इथे सांगणे शक्य नाही पण मी त्या सर्वांचा कोरोना मुळे बाधित झालेल्या लोकांच्या वतीने आयुष्यभर ऋणी राहीन. आपल्या “साम्राज्य” सोसायटीतील काही लोकांचे देखील अनमोल सहकार्य लाभले ते म्हणजे सौ मंजिरी नाडकर्णी, श्री. किशोर भालवणकर, तन्वी क्षीरसागर, श्री. विशाल मोकाटे, इ. त्या दिवशी मला जाणवले की आपल्या सोसायटीतील लोक सामाजिक कार्यासाठी कसे सरसावून पुढे येतात. मी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो.

    आपल्या सोसायटीच्या यंदाच्या दिवाळी अंकात माझे अनुभव मांडावे अशी विनंती करण्यात आली. मी ती लगेच मान्य केली. मला ही संधी दिल्याबद्दल शतशः आभारी आहे. मी माझे अनुभव लिहावयास घेणार तोच माझ्या समाजसेवेच्या स्वभावामागे सर्वात मोठा हात असलेले माझे प्रेरणास्थान माझे वडील श्री. अजित दिनकर निकम वय वर्षे ७१ यांना २९ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ‘ब्रेन स्ट्रोक’ आल्याने देवाज्ञा झाली. आमच्या संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळले. छत्र हरवणे काय असते हे मी आता अनुभवत आहे.मात्र समाजात पाहिलेली दुःखं मला माझ्या दुःखातून सावरण्यासाठ मदत करत आहेत. आणि निश्चितच या दुःखातून बाहेर येऊन मी माझ्या वडिलांनी दिलेला “आपण समाजाचं देणं लागतो” हा वारसा असाच पुढे चालू ठेवीन.








टिप्पण्या

  1. खूप प्रेरणादायक काम. अभिमान वाटावा असेच काम. दिवाळी अंकात लिहिल्यामुळे आम्हाला कळाले तरी. खूप धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. स्वतःच्या अडचणी,दुःख बाजूला ठेऊन,समाजातील गरजूं साठी कामात झोकून देणं,हे केवळ ईश्वरी दूतच करू शकतो!!!
    आम्हाला आपला अभिमान वाटतो!!!

    उत्तर द्याहटवा
  3. खूप कौतुकास्पद काम. प्रेरणा घ्यावी असे काम आहे तुमचे. अभिमान वाटतो तुमचा.

    उत्तर द्याहटवा
  4. श्री अनिकेत निकम यांनी मदतीची संधी दिली त्याकरता खुप आभार...
    इथून पुढे कायम स्वरुपी मदक पथक ठेवले तर विविध समाज उपयोगी उपक्रम करता येतील.
    सर्वांना दिपावलीच्या भरभरुन शुभेच्छा...
    💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय कौतुकास्पद काम आहे. खूप अभिमान वाटतो तुमचा.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संस्कृत – समज आणि गैरसमज