ही गोष्ट पंधरा वर्षांपूर्वीची आहे. मी त्यावेळी आमच्या बँकेच्या लंडन कार्यालयात काम करत होतो.
लंडन
हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र असल्याने, लंडन विभागातील
आमचे काही ग्राहक इतर युरोपियन देशातील व आफ्रिका खंडातील होते. यातले बरेचसे मूळ
भारतीय वंशाचे. तेही ८०-९० टक्के गुजराथी. अशा ग्राहकांना वेळोवेळी भेटी देऊन ग्राहक
संबंध घट्ट करणे, नवीन ग्राहक जोडणे, तसेच
ज्या कर्ज प्रकरणात वसुलीचे प्रश्न आहेत, त्यांचा पाठपुरावा
करणे इ. कामांसाठी काही वेळा अधिकाऱ्यांना ग्राहकांच्या भेटीसाठी त्या देशात
पाठवले जाई.
मलाही
अशाच कामासाठी २००५ साली दोन आठवडे केनियात पाठवले होते. माझ्याबरोबर महेंद्र नावाचा
लंडनमधील स्थानिक अधिकारी, मदतीसाठी दिला होता. एक
तर तो गुजराथी होता व त्याचे बालपण केनियात गेले होते, त्यामुळे
त्याला थोडीफार स्वाहिली भाषा येत होती.
बहुधा
तो नोव्हेंबर महिना होता. लंडनच्या थंडीतून निदान दोन आठवडे सुटका होणार व ऊन
खायला मिळणार म्हणून मी आनंदात होतो. व्हिसा मिळाल्यावर पीतज्वराची लस टोचून घेऊन
आम्ही तयार झालो.
ज्या
कामासाठी जायचं, ज्यांना भेटायचं, त्यासाठी
तिथल्या ग्राहकांच्या याद्या केल्या. त्यांचे पत्ते, फोन
क्रमांक इ. इ. सारं बरोबर घेतलं व दोन आठवड्यांसाठी लागणाऱ्या कपड्यांसह बॅग भरून
आम्ही केनिया एअरलाईन्सने लंडनहून नैरोबीला पोचलो. तेथील विभागप्रमुख माझा मित्रच
होता. आम्ही बँकेच्या कामासाठी येत असल्याने, आमची राहण्याची
सोय बँकेच्याच अधिकाऱ्याच्या घरी केली होती. आम्हाला विमानतळावर घ्यायला दोन
अधिकारी आले होते. विमानतळावरून येतांना त्यांनी तिथली राजकीय व आर्थिक स्थिती, घडत असलेले बदल, प्रेसिडेंट कीबाकी इत्यादींविषयी
सांगितलं व त्याच वेळी उगीचच बाहेर फिरणं कसं धोक्याचं आहे हेही सांगितलं.
आमच्या
बँकेचं, तिथल्या विभागप्रमुखासाठी घेतलेलं निवासस्थान म्हणजे एक मोठा बंगला होता
आणि तो बँकेच्या मालकीचा होता. चार पाच बेडरूम असलेला तो प्रशस्त बंगला, दोन गाडया, दोन गॅरेज, भरपूर
मोकळी जागा, भव्य प्रवेशद्वार, इ. इ. आणि
मुख्य म्हणजे चांगल्या वस्तीत होता. एकच बाब ठळकपणे वेगळी लक्षात येत होती, ती म्हणजे सुरक्षेसाठी नेमलेले दोन धट्टेकट्टे सुरक्षा रक्षक. देशात आर्थिक
विषमता पराकोटीची होती, त्यामुळे शहरात दारिद्र्य, बेकारी बरोबरच चोऱ्यामाऱ्या, लुटालूट, इ. गोष्टी अगदी सामान्य होत्या.
बँकेनं
दिमतीला गाडी व ड्रायव्हर दिल्याने, आम्हाला खूप
सोयीचे झाले होते. त्यामुळे पहिल्या चार दिवसातच आम्ही बऱ्याच जणांच्या गाठीभेटी घेतल्या.
इथं श्रॉफ मंडळी बरीचशी ऑइल, टेक्सटाईल, इ. व्यवसायात प्रचंड पैसा कमावून गबर झाली होती. तर पटेल मंडळी
हार्डवेअरच्या धंद्यात तरबेज होती. बाकी काही सरदार मंडळी स्वतः उद्योजक म्हणून
यशस्वी झाली होती. युगांडा मध्ये १९७१ साली झालेल्या वांशिक संकटात, बरेचसे गुजराथी लोक पूर्व आफ्रिकेतून लंडन व भारतात परतले होते. पण
काहीजण मात्र धीराने केनिया, टांझानिया इथं मागे राहिले.
या
सर्वांनी आपल्या मेहनतीने तसेच थोड्याशा चतुराईने खूप माया जमवली होती. हे पैसे ते
बाहेरील देशात विशेषतः लंडन येथील बँकांमध्ये ठेवत. त्यांची एकच आग्रही मागणी
किंवा अट असे, की बँकेकडून कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार होता कामा नये.
आमची
कामे उत्तम रीतीने होत असताना, बँकेचा ड्रायव्हर सतत
बरोबर असणं काही ग्राहकांना आवडत नसे. त्यांनी सुचवलं की ज्याला भेटायचं आहे तो
त्याची गाडी पाठवत जाईल, मग आम्ही बँकेची गाडी काही काळ नेणं
बंद केलं. या भेटीगाठींमध्ये सात नवीन ग्राहक आम्हाला जोडता आले.
आणि
तो दिवस उजाडला!
आम्ही
एका ग्राहकाच्या गाडीतून त्याच्या घरी गेलो, मग त्याच्या
दुकानात गेलो. ते हार्डवेअरचे दुकान होते. आम्ही पोहोचताच त्याने आम्हाला मागच्या
दरवाजाने आत नेले व लगेच कुलूप लावून, दुकानाच्या दर्शनी
भागात केबिनमध्ये बसवले. दुकानात दोन गुजराथी व एक आफ्रिकन नोकर होता. दर्शनी
भागात दुकान पूर्ण उघडे असले तरी समोरील बाजूस लोखंडी ग्रिल बसवले होते. त्या
ग्रिलमधूनच हात घालून / बाहेर काढून व्यवहार चालत. मोटारीच्या स्पेअर पार्टचे
दुकान असल्याने, प्रत्येक वेळी दुकानातील नोकर ग्राहकाला हवी
असलेली वस्तू एका हाताने पैसे घेऊन मग ती वस्तू पुरवत. अगदीच मोठा पार्ट असेल तर
मागच्या बाजूने, दुकान बंद करताना घेऊन जाण्यास सुचवत. मी आयुष्यात हे प्रथमच पाहत
होतो. त्याच वेळी तिथल्या असुरक्षिततेची जाणीव झाली. महेंद्रने आमच्या बँकेचे आधी
ज्या ठिकाणी ऑफिस होते ते ठिकाण पहायला जायचा प्रस्ताव ठेवला म्हणून आम्ही
तिथपर्यंत त्या ग्राहकाच्या गाडीने गेलो व नंतर आपण काहीतरी व्यवस्था करून जाऊ, असे ठरवून गाडी सोडून दिली.
तो
भाग म्हणजे नैरोबीतील टॉम मोया स्ट्रीट. इथं जवळच एक थिएटर पण होतं. गजबजलेल्या
त्या भागात खूपच चहलपहल होती, दांडगट तरुणांची टोळकी
रस्त्यावर उगाच उभी होती, मधेच एखादा विनोद होई व सारे आसुरी
सुरात हसत व ओरडत. आम्ही दोघेही सुटाबुटात असल्याने व महेंद्रच्या हातात एक ब्रीफ केस असल्याने आमच्याजवळ खूप कॅश
असेल असे कोणालाही वाटले असते. एकंदर वातावरण बघून मी जरा मनातून हादरलो. ऐकलं होतं
तिथले चोर, पैशासाठी प्रसंगी जीव पण घेतात! इकडे यायलाच नको
होतं, असं वाटू लागलं. एका ठिकाणी थांबून त्यानं मला आमच्या
ऑफिसची जुनी इमारत दाखवली. बाजूची कॅफे, इतर जुनी दुकानं इ.
पाहात आम्ही पुढे निघालो.
तेव्हढ्यात
एका माणसाने आम्हाला "Hi Guys, do you need
help?” असा प्रश्न करत थांबायला सांगितलं.
त्याचं
लक्ष महेंद्रच्या हातातल्या बॅगेवर होतं. महेंद्रने स्वाहिलीत त्याला धन्यवाद दिले
व आम्ही पाठ फिरवून निघालो. थोडं अंतर गेल्यावर मघाचाच तो माणूस हातवारे करत
आमच्या मागे येतांना दिसला. आता त्याच्याबरोबर अजून एक धटिंगण होता. महेंद्रने मला
मागे न पाहता, भरभर चालायची सूचना दिली. साधारण अर्धा एक
किलोमीटर गेल्यावर मी मागे वळून पाहिले, तर ही जोडी आमच्या
मागेच होती. आता मात्र आम्ही दोघेही हादरलो. नाही म्हटलं तरी शे पाचशे डॉलर आम्हा
दोघांकडे होते, याशिवाय नवीन खातेदारांनी दिलेले पेपर इ.
होतेच.
"आपला पाठलाग होतोय!", महेंद्र म्हणाला. मग एका
वळणावर त्यांना चकवून आम्ही एका गल्लीत शिरलो.
आम्ही
त्यांना चकवलं, असं आम्हाला वाटत होतं,पण तो आमचा भ्रम होता,काही क्षणातच ते आम्हाला
पुन्हा दिसले. मग जरा पुढे गेल्यावर एक अगदी छोटी गल्ली आम्हाला लागली, पण अनोळखी ठिकाणी गल्लीत शिरणं अजून धोक्याचं असल्याने आम्ही तिकडे न
वळता त्या रस्त्यानेच पुढे जाऊ लागलो. सुदैवाने महेंद्रला एक फोटो स्टुडिओ दिसला, नावावरून तो इंडियन माणसाचा असावा, असं वाटलं. महेंद्रने
मला खूण करून आत शिरायला सुचवल्यावर आम्ही त्या स्टुडिओत शिरलो. खाली काउंटरवर
कुणी नव्हतं, पण दाराचा आवाज ऐकल्यावर,
मागच्या बाजूने आवाज आला, “Who's that?” आमच्या अंदाजाप्रमाणे तो गुज्जू होता. मग महेंद्रने त्याला, दोन काळे आमच्या मागे लागल्याचे सांगितले. त्याने आम्हाला धीर दिला,
व मागच्या बाजूस बसायला सांगितले. पंख्याखाली बसल्यावर व पाणी प्यायल्यावर
आम्ही जरा सावरलो. त्याने जे सांगितले ते असे, की ही मंडळी
काम नसल्यामुळे नशेबाज झाली आहेत, आणि अगदी थोड्या पैशांसाठी
ते काहीही करतात. मग त्याने आम्हाला कॉफी दिली व मी सांगितल्याशिवाय बाहेर पडू नका
असं बजावलं. दहा पंधरा मिनिटानंतर त्यानं बाहेर डोकावलं तर ते दोघे थोड्या अंतरावर
सिगारेट ओढत उभे दिसले. त्यानं मग आम्हाला त्याच्या मागच्या दरवाजातून, एका अरुंद बोळातून शेजारच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहोचवलं, तिथून समोरच मुख्य रस्ता होता. मिळेल त्या टॅक्सीने घर गाठायची सूचना
देऊन तो दुकानात परतला. सुदैवाने एक व्हॅन आमच्या राहण्याच्या ठिकाणाजवळ जाणारी
येताना दिसली, काहीही विचार न करता आम्ही आत शिरलो. आत आधीच
दहाबारा प्रवासी होते,पण आम्हाला दोन जागा मिळाल्या.
शिलिंगच्या
ऐवजी महेंद्रने डॉलर दिल्यावर व्हॅनवाला एकदम खुश झाला, त्याने मग आम्हाला अगदी घरापाशी सोडले. एका मोठ्या संकटातून आम्ही बचावलो
होतो! घरी आल्यावर हे सारं माझ्या मित्राला सांगितलं. आम्ही सुखरूप सुटलो याचा त्याला
आनंद झाला. पुढं जोपर्यंत तिथं आहोत तोपर्यंत रस्त्याने न चालण्याची व फक्त बँकेची
गाडीच नेण्याची त्याने अट घातली ती आम्ही आनंदाने पाळली. यापूर्वी आमच्या बँकेच्या, पुण्यातून गेलेल्या एका अधिकाऱ्यावर झालेल्या, जीवघेण्या
हल्ल्याची कहाणी त्याने त्याच वेळी ऐकवली.
वीकेंडला
मग आम्ही मसाइमारा इथं तीन दिवसांची ट्रिप केली. ७ नंतरच्या रविवारी व्यावसायिकदृष्ट्या
यशस्वी झालेली ट्रिप पूर्ण करून लंडनला परतलो.
या
दोन आठवड्यात आम्ही, भारतीय लोकांचं अफाट
प्रेम, अफाट ऐश्वर्य त्याबरोबरच निसर्गाचं अफाट सौंदर्य
पाहिलं तर दुसऱ्या बाजूला मनातली भीती, आर्थिक विषमता, असुरक्षितता, लोकांची हतबलता इत्यादी अनुभवलं.
आयुष्यातील
एक विलक्षण अनुभव या दोन आठवड्यात आला! आमेन!!!
छान...!
उत्तर द्याहटवा