- सौ. शुभांगी क्षीरसागर
पैठण म्हटले की संत एकनाथ महाराज ओघाने चर्मचक्षुसमोर उभेच राहतात. पैठणमध्ये नाथाघरी कावडीने पाणी भरणारे साक्षात श्रीकृष्ण असल्याचे सर्वश्रुत आहेच. श्री संत एकनाथ महाराज व त्यांची पत्नी गिरिजा (शांतीब्रह्म व शांतीसरिता) यांना आपला मुलगा हरी याच्या विवाहानंतर श्रीखंड्याचेही लग्न लावून द्यायचे मनात होते. पण तेच भगवंत असल्याचे जाणवल्यावर नाथांनी देवालाच विचारले की आम्हा दोघांना तर तुझे लग्न लावून द्यायचे होते. ते कसे करावे? त्यावर मोकळेपणाने देव सांगतात, माझी प्रत्येक युगात खूप लग्ने झालेली आहेत, तू माझ्या विवाहावर अशी सुंदर काव्यरचना कर ज्याच्या पठणानेही अनेकानेक जडजीवांचे कल्याण होईल. श्रीखंड्याने म्हणजेच साक्षात श्रीकृष्णानेच आज्ञा केल्याने हे काव्य सर्व गुणांची खाण बनले. संत एकनाथांनी ‘रुक्मिणी स्वयंवर’ हा ग्रंथ सन १५७९मध्ये श्रीक्षेत्र काशी येथे मनकर्णिका तीरावर रामनवमीच्या दिवशी पूर्ण करून श्रीकृष्णचरणी अर्पण केला. कृतार्थता अनुभवत ते म्हणतात, "मनची झाले कृष्णनाथ."
कृष्णाने
देवकीच्या पोटी जन्म घेतला ना, तसे इकडे
विदर्भात राजा भीमक व राणी शुद्धमती यांच्या पोटी चितशक्ती रुक्मिणी
रूपाने पृथ्वीवर अवतरली. राजा भीमकाच्या दरबारात नेहमीच अनेक
दिग्गज मंडळी येऊन नवनवी जगतवर्णने करत असत. एकदा कीर्तीनामा नावाचा ब्राह्मण कृष्णकीर्तन करत होता. तो निर्गुण निराकार निष्काम लीला विग्रह सुकुमार कोमल देहयष्टी असे
भान विसरून वर्णन करू लागला. कृष्णस्तुती गाताना तो तल्लीन होऊन सांगत होता. त्रिलोकसुंदर वर्णन
कीर्तीनामाच्या मुखातून बाहेर पडले होते. असे
ऐकले तेव्हा माता शुद्धमती तात्काळ वदली, की माझ्या मनी येते
कन्या अर्पण करावी ती इथेच. राजा भीमकही मनात
असेच चिंतित होता. रुक्मिणीचा बंधू रुक्मी ह्यास मात्र कृष्ण
अजिबात पसंत नव्हता. रुक्मी त्याला नेहमी काळ्या, गवळ्याचा मुलगा म्हणत हिणवायचा. रुक्मी नेहमी
कृष्णनिंदा करत असे. त्याच्या मनात रुक्मिणीचा
विवाह आपला परममित्र शिशुपाल याच्यासोबत व्हावा असे होते. कारण एकच, कृष्णाचा द्वेष.
म्हणून रुक्मीने मातापित्यांनाही न जुमानता हे कार्य ठरवले. दशदिशांमध्ये आमंत्रणे दिली. रुक्मीने दुष्टपणे कृष्णालाही
पत्रिका पाठवली. पण ब्राह्मण मुखातून कृष्णाबद्दलचे
अनुकूल मत तसेच आईवडिलांचेही तेच मत असल्याचे जाणून नुसत्या कृष्णाच्या
आठवणीनेही रुक्मिणीचे सर्वांग थरथरत होते. शेवटी
रुक्मिणीने पुढाकार घेतला. तिने श्रीकृष्ण भगवंताला एक पत्र लिहिले.
रुक्मिणी दिसायला तर देखणी होतीच, पण बुद्धीनेही चतुर
असल्याने हे पत्र तिने सुदेव नामक विवेकी ब्राम्हणाच्या हाती
पाठवले.
या
आरतीरूपी पत्रात रुक्मिणीने आपल्या मनाची
अवस्था वर्णन केली व हे पत्र गुप्तपणे लवकरात लवकर श्रीकृष्णापर्यंत पोहोचवण्यास सुदेवाला
आज्ञा केली. शक्य तेवढ्या लवकर अगदी मनोवेगात
पोचून ही मागणी भगवंताचरणी अर्पण कर तर अणि तरच मी जगण्याची शक्यता असेल असे सांगितले. एवढे बोलून ती बेशुद्ध पडली. तत्क्षणी स्वतःला धन्य मानत, क्षणही न घालवता सुदेव ब्राम्हण बाहेर पडला. राजकन्येने त्याच्यावर
ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत हे कार्य पार पाडायचे असे त्याने ठरवले
होते. मजल दरमजल करीत तो द्वारका नगरीला पोहोचला देखील. आहा काय ती द्वारका!! तिचे वर्णन किती व कसे करावे? कुठे
कसलीच उणीव नव्हती. जेथे श्रीकृष्णाचे वास्तव्य
तेथील वैभवाकडे बघून सुदेवाचे मन अती आनंदले. देवाची नगरी अलौकिक
हे खरे.
त्याने
थेट
कृष्णाची भेट घेतली. त्याकाळी कोणाही सामान्य माणसाला राजाला
भेटता येत होते. तेव्हा देवाने ब्राह्मण पूजन केले आणि जेवण झाल्यावर विचारले आपण कोठून आलात व येण्याचे कारण सांगा. कृष्णदर्शनाने
ब्राह्मण मौन झाला. आपले कार्यच विसरला. वारंवार मस्तक ईश्वरचरणी
ठेवू लागला. अती हर्ष मानसी, मनोभूमिका
हरपली त्याची. येतांना झालेले कष्ट, तहान
भूक सारे विसरून गेला, तोच क्षण पकडत निरोप दिला की राजा भीमकाची कन्या रुक्मिणी हिचा विवाह तिचा
भ्राता रुक्मी मातापित्यांच्या मनाविरुद्ध आपला मित्र शिशुपाल याच्याशी करू पाहत आहे. त्वरित घाई केली तरच इच्छित साध्य होईल.
ताबडतोब
कृष्ण रथारूढ होत निघाले. डोळ्याचे पाते मिटतोवर त्यांनी वेस
ओलांडली होती. क्षणात वडील बंधू बलरामही सैन्य सोबत घेऊन भावामागे धावत निघाले. पत्रात
रुक्मिणीने फार सुरेख तपशील दिला होता. हे देवा, त्वरित निघा.
पल्ला लांबचा गाठायचा आहे, आणि वेळ फार कमी. त्यामुळे
तुम्ही असे करा, आमचा एक कुलाचार असतो - नववधू गावाबाहेर देवीचे
दर्शन घेऊन मग अणि मगच विवाह मंडपात पाणिग्रहण करू शकते. तेथे
खूप गर्दी असेल तेव्हा तुमच्या रथावर गरुडध्वज लावा म्हणजे मला तुम्ही ओळखू याल. मी आधी पूजा करून बाहेर पडेन तेव्हा समोर जर तुमचा रथ मला दिसला नाही
तर माझ्या हातातल्या अंगठी मध्ये एक हिऱ्याचा खडा आहे तो खाऊन मी जीवन संपवेन असा माझा पक्का निर्धार झाला आहे.
रुक्मिणीने
पाठविलेल्या पत्रात असेही नमूद केले होते की, माझा भाऊ रुक्मी ह्यास
मी शिशुपालाची अर्धांगिनी व्हावी असे वाटते. कारण
तो त्याचा परममित्र आहे. माझे मातापिता
यांना अव्हेरून भावाने हे सर्व परस्पर ठरवले
आहे. असा हा घास मी त्या वडिलांच्या वयाला शोभेल अशा नराधमाला
मिळू देणार नाही. हे श्री कृष्णाला आठवत होते.
आता इष्ट दिवसाला आरंभ होतो, नववधूचा वेष धारण करून
रुक्मिणी माता व सख्यांसोबत वेशीबाहेर असलेल्या देवीच्या देवळात
दर्शनासाठी येते. अतिशय नयनरम्य स्थळ आहे ते. तेथे तळे आहे, सुंदर
मंदिर आहे. त्या देवीला रुक्मिणीने मनोभावे पूजले. मनासारखे होणार
नसेल तर इथेच मी देह त्यागीन असा निश्चय
केला. सारी पूजा आटोपून नवरी बाहेर पडते. चहूकडे दृष्टी फिरवते.
कुठे गरुडध्वज दिसतोय का ते हेरत असता क्षणात नजर स्थिरावते. तत्क्षणी ती मंदिराच्या
पायर्या धावतच उतरते. तिची पावले राजमंडपाकडे जाणार्या वळणावर येऊन ठेपली तोच विलंब न करता सुसाट वेगाने धावत पळत
गरुडध्वज गाठते. भगवंत राजकन्येचा हात पकडत तिला रथामध्ये ओढून
घेतात. तेव्हाच तिचे सौंदर्य बघून थक्क होत आनंदभरात रथ वेगात
फिरवत पळवतात. हे सर्व क्षणात घडल्याने सगळे भांबावून जातात. तोच रुक्मी
जोरात ओरडतो, “शिशुपाला, अरे तो
काळ्या तुझ्या होणार्या पत्नीला पळवून नेतोय, धाव पकड आपल्या बायकोला!” आणि मग तेथेच घनघोर युद्ध
सुरू झाले. रुक्मीचा दारुण पराभव झाला. आता रुक्मीला
मारणार तोच रुक्मिणी कृष्णाचे पाया पडत विनवते की तो कसाही असला तरी माझा भाऊ आहे, त्याला मारू नये. समोरून
येणाऱ्या बलरामानेही ते ऐकले. बलराम वदले, की बरोबर आहे ते तुझे
आता नातेवाईक झालेत. त्याला मारून टाकणे योग्य होणार नाही. मोठ्या भावाचे म्हणणे कृष्णाने
ऐकले. त्यास सोडून देत समज दिली की मातापित्यांचे ऐकायला
हवेस तू. आता शांती-समाधानात कृष्ण रुक्मिणीसह
द्वारकेकडे सावकाश निघतात. बलरामाने द्वारकेत निरोप पाठवला. कृष्णाच्या लग्नाची तयारी सुरू करा. आम्ही नववधूला
घेऊन निघालो आहोत. तसाच निरोप रुक्मिणीच्या मातापित्यांस धाडला, की द्वारकेला पोहोचा.
रुक्मिणीचे
मिलन म्हणजे देवाचे भक्तीशी होणारे मिलन
होय. केवढा मोठा आनंद सोहळा! हा शरण भाव,
नम्रभाव, नववस्त्र ल्यालेली रुक्मिणी, देवाला जिंकण्यासाठी. सारे वातावरण मंगलमय बनले. चहू दिशांना भक्तीचा
आनंद वारा वाहत असून, मनसोक्तपणे सर्व जण
ह्या भक्तीच्या प्रवाहात मिसळून जात होते. निर्मळ आनंद उपभोगण्याची हीच ती संधी, हाच तो दिवस आणि हाच तो क्षण. अतिउत्तम मुहूर्त
साधला. भक्तीचे देवाशी होणारे मिलन हा परमोच्च,
पराकोटीचा भाग्यवान क्षण असणार. ह्या क्षणाला तर त्याचाच हेवा वाटू लागावा असा
हा दिवस. मंगल वाद्ये पावित्र्य दुणावत होती. सनईची सुरेल तान,
वाजंत्रीचा मंजुळ नाद हे ऐकून तर आनंदलाही उधाण
येऊन शांती व समाधान आपलाच हेवा करू लागले. रुक्मिणीने भक्तीची
परिसीमा गाठली होती. आज ती विवेकाची सात्विकतेची नववस्त्रे जणू पांघरून नववधू बनली होती.
कीर्ती
नामक ब्राम्हण दिलखुलास मोकळ्या आवाजात कृष्णाचे गुणगान गात होता. तो
प्रत्येक गुणाचा एकेक अलंकार कृष्णचरणी अर्पण करत होता. हे स्वर तिच्या मनात
घुमत होते. मंडपात सुवासिनी कोण होत्या, तर बघा - दया, क्षमा, शांती, उन्मनी. अश्या सुवासिनी सोहमभावाचे गजरे वाटत होत्या. ह्या मंडपात जन्ममरण क्रिया स्तब्ध झाल्या, संकल्प
विकल्प गोठून गेले, उफराट्या वृत्तीचा नायनाट झाला. येथील शुभकार्य बघून विधाता ही स्थिरावला. सागर लहरींची नव्हाळी व त्रिगुणात्मक अंशही न उरलेला वारा आनंद दशदिशा वाहू लागला. उपनिषदांना तर कळलंच नाही मौन कधी बाळगले ते. उद्धटपणा, द्वैतभाव यांचा
तर पार चेंदामेंदा झाला. आता चारी वेद सुखावत कंकणे बनून रुक्मिणीच्या
हाती झंकार खुळखुळ करू लागले. ही झाली नववधूची
तयारी.
आता कृष्णाची तयारी. नवरदेवाचा थाट बघू यात. श्रीकृष्णाबद्दल - बघा ना बालसूर्याचे तेज जणू अंगोपांगी भरून
आले होते. त्याचे मुखतेज बघताना अभिमान
पार जंगलात पळून गेला. नाभीमध्ये विधाता स्थापित
झाला. जणू विधाता नव्हे पद्मनाभच देखिला.
कृष्णमुकुटावर मयूरपीस शोभा वाढवत होते. कुंडले बघून तर उपनिषद
किरणे झळकत होते. (एक म्हणे साकार, दुसरा बोले निराकार) पण निखळ सत्य हे, की ना साकार ना निराकार. हे श्रवणसुख विकार लोपवते, मोक्षसुख पदरी पडून निर्दोष मुक्तता लाभते. किती सौंदर्य वाखाणले तरही मन भरत नाही. कृष्णाठायी समाधीची समाधी. विश्रामाचा विश्राम. कर्ता करविता एक आणि
एकच आहे तो म्हणजे श्रीकृष्ण. असे हे रुक्मिणी स्वयंवर म्हणजे जीव-शिव मिलन सोहळा, देव भक्तीचा मिलाप, एकरूप होणारे आत्मा परमात्मा यांचे मंगल
पवित्र कार्य.
राजा
भीमकाने व शुद्धमतीने कन्यादान केले, कृष्णाने रुक्मिणीचे पाणिग्रहण केले. तो थाट अवर्णनीय. एका राजकुमारचा
एका राजकन्येशी होणारा विवाह तसाच अलौकिक झाला.
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा