-
उषा जोशी
जगात
असती कितीक नाती गोती । मोलाचे माणिक मोती बहीण भाऊ ।
वसंतभाऊचा
फोन आला होता, त्याच्याबद्दलच्या माझ्या लहानपणीच्या आठवणी कळव,
तेव्हा कळवल्या होत्या. (मी आणि वसंतभाऊ - आम्ही मावसभावंडं)
प्रिय
वसंतभाऊ,
ही
माझी आठवण नाही, पण माझ्या आईने म्हणजे ताईने सांगितलेली. (तुझ्या आईला मी पण आईच म्हणायची
आणि माझ्या आईला ताई.) तू लहानपणी खूप सशक्त, बाळसेदार होतास, त्यामुळे ताईने तुला
कडेवर उचलून घेतलं की तिला दम लागायचा. तू तेव्हा दोन-तीन वर्षांचा
असशील. रस्त्यावरून चालायला नाखूष असायचास. चालत चल, म्हटले की रस्त्यातच मातीत लोळण
घ्यायचास. अरे, अरे, उठ, उठ, बैलगाडी येतेय म्हटलं तरी स्वारी तशीच पडून राहायची. शेवटी
मोठ्या मंडळींना म्हणजे दादा, आईला माघार घ्यावी लागायची. ताईला मी विचारायची, आईला
नाही का गं दम लागायचा? ताई म्हणायची, नाही, देव देतो बळ आईला
आपल्या बाळासाठी.
मला
पहिली आठवण झाली, ती तू माझ्या प्रत्येक फोटोखाली 'उषी नकटी आहे' असं लिहून ठेवायचास.
आपले सगळ्यांचे फोटो एका वहीत चिकटवून ठेवलेले असायचे. खरं तर मी काही नकटी नव्हते,
म्हणजे नाही. आता थोडं नाक मोठ्ठं आहे एवढंच. मला काही तरी करून
चिडवायचं एवढाच तुझा उद्देश असायचा. पण मी चिडकीच, त्यामुळे तुला जास्तच जोर यायचा.
अंजनगावला
आपल्याकडे एकच आरामखुर्ची होती. आपल्या दोघांनाही एकाच वेळी तिच्यावर बसायची लहर यायची.
मी समजा आरामखुर्चीवर बसलेली असले की तू सांगत यायचास "आता
अंगणात केवढा मोठ्ठा कोंबडा आला आहे, हा एवढा त्याचा तुरा". मी भोळसट. असे ऐकले
की मी तो बघायला खुर्ची सोडून जायची की तुला खुर्ची मिळायची. तू खुर्ची सोडावीस म्हणून
मी तीच युक्ती अंमलात आणायची, पण तू कोंबडा बघायला जायच्या ऐवजी तेथेच ठाण मांडून बसून राहायचास, हलायचाच नाहीस. आईकडे
तक्रार केली की आई म्हणायची, "जाऊ दे तू आता बसूच नकोस, तूच बस म्हणाव हवा तेवढा
वेळ. आपण आपलं दुसरंच काम करावं." ते ऐकून मी दुसरीकडे जाई, पण आडून आडून तू उठलास
की नाही ते बघे. ते तुझ्या लक्षात येई आणि अधिकच चेंगटपणा करून खुर्चीवर बसून राहायचास.
शाळेची वेळ झाली की दप्तर घेऊन निघालास की म्हणायचास “बस आता!...” पण मग त्यात मजा नव्हती.
एखादा
विनोद किंवा चुटका मी सांगू लागले की तू “इथे हसायचं का?” असं म्हणून त्यातील हवा काढून टाकायचास. तू माझ्यापेक्षा वयाने दोन-तीन वर्षांनी मोठा असल्यामुळे तुझ्यावर कोणीतरी केलेला हा प्रयोग
माझ्यावर करायचास. मग मला हिरमुसल्यासारखे व्हायचे. कोणी गाणं म्हण म्हटलं की हे 'संघाचं
गाणं' चालेल का म्हटलं की तू मुद्देसूद वाद घालायचास. “कशावरून?
त्याच्यावर नाव लिहिलंय संघाचं? दाखव कुठे आहे.” तेव्हा आरएसएसवर काहींचा रोष असायचा. राष्ट्रभक्तीपर मातृभूमीचं गुणगानच खरं
तर त्यात असायचं.
तुझ्या
वडिलांचं म्हणजे ती. दादांचं नेहमी सांगणं असे की रोज सकाळी शौचास
गेलेच पाहिजे. तू टाळाटाळ करायचास आणि दादा फारच रागावले तर जायचास, पण तेथेच संडासाच्या
पत्र्याच्या दारावर Book म्हणजे पुस्तक असे चित्र रेखाटून यायचास.
उन्हाळ्याच्या
दिवसात आपण ओटीवर पलंगावर झोपत असू. एकदा तू अंगणात अंधुक उजेडात गेलास आणि तुला साप
दिसला, तर तिथूनच “अरे बाप रे” असं म्हणून थेट पलंगावरच उडी घेतलीस. ती लांब उडी सात
- आठ फूट तरी असेल.
एखादी
गोष्ट खूप मोठी, तिचा विस्तार दाखविण्यासाठी दोन्ही हात लांब करून “किती
लांब होती सांगू, हेss इथून तेss तिथपर्यंत!” असे ते शब्द अजून माझ्या कानात आहेत,
पण ते स्वर अक्षरात कसे पकडणार?
तू
माझ्या खूप खोड्या काढायचास, त्याबद्दल आपल्याला मार बसेल हे तुला माहित असायचे, पण
मार खाण्यातही तू पक्का होतास. तेव्हा बरेचदा दादा तुला खूप रागावत, प्रसंगी चोप देत.
मग तुला पण राग यायचा. पण तो राग व्यक्त करायचा मार्ग म्हणजे जेवायला बसले की सगळं
अन्न वाढून व्हायच्या आधीच तू आईने वाढलेला भात भराभर वरणाशिवाय कोरडाच बकाबक खाऊन
हात धुवायला निघून सुद्धा जायचास. कधीतरी दादा मलाही रागवायचे.
मग अपमान वाटायचा. आपणही वसंतासारखा कोरडाच भात खायचा प्रयत्न मी करायची. पण तो घशाखाली
उतरायचा नाही. डोळ्यातून पाणी मात्र घळघळा वाहू लागे.
मोठ्यांची
गम्मत करायची म्हणून आपण मांजरे आपापसात भांडताना आवाज काढतात, तसे करायचो आणि मग शुक
शुक करत पाय आपटत मोठी माणसे आली की मजा वाटायची.
मुंगूस
दिसलं की “मुंगसा, तोंड दाखव, तुला रामाची शप्पथ” असं म्हटलं की ते वळून बघायचं.
रस्त्याने
गाढव ओरडलेलं ऐकू आलं की आम्ही एकमेकांना हाक मारायची आणि 'ओ' दिली की एक गाढव लागलं
असं म्हणायचं.
तू
माझ्या वस्तूला हात का लावलास असं विचारलं की “मन की ख़ुशी, दिल का राज” असं
उत्तर यायचं. ‘मन की ख़ुशी, दिल का राज' हा शब्दप्रयोग तुझ्याकडून खूपदा व्हायचा. खरं तर हिंदीची सवय
पण नव्हती.
पोटात
बोराची बी गेली की आता तुझ्या पोटात बोराचं झाड उगवणार आणि तोंडातून
बाहेर येणार म्हणायचास. मग मी घाबरून रडवेली व्हायची. मग दादांना
सांगायचे. दादा तुला रागवायचे, पण तुला ढिम्म व्हायचं नाही. दादा मला समजावयाचे, म्हणायचे,
अगं असं नसतं. हा तुला चिडवतो ना, आपण त्याचं घर उन्हातच बंधू.
मग तर झालं. "हं" म्हणून मी रडं आवरायची.
भाऊबीजेला
मी तुला ओवाळायची. तू तुझ्या सदऱ्याखाली ओवाळणीची वस्तू दडवून ठेवीत असे. काय बरं असेल
अशी उत्सुकता असेच. अर्थात तेंव्हा काय पेन्सिल नाही तर खोडरबर असेच काही तरी असे.
मी तुला ओवाळून तबकात तू ओवाळणी टाकशील म्हणून किती वेळ तबक धरून उभी असायची, तर तू
आपला निरांजनातल्या ज्योतीकडेच टक लावून बसलेला असायचास. शेवटी
कंटाळून मी "आई, बघ ना हा ओवाळणीच घालत नाही" म्हणून तक्रार करायची. मग आई
"वसंता, काय आहे वात्रटपणा" म्हटले की साळसूदपणे
"अरे, माझं लक्षच नव्हतं” असं म्हणून हसायचास. कसं चिडवलं असाच त्यात भाव असायचा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा