लर्न! अनलर्न! रिलर्न!

 -      प्रीती मौक्तिक 

पूर्ण तीन तास झालेत. आता नाही कंबर लागून येत यांची. चार वेळा चहा पिऊन झाला. मी नाही उचलणार, जमू देत अजून दहा कप्स. काय मेलं नवीनच फॅड हे. लॉकडाऊन सुरू झाला, वाटलं होतं आता तरी घरात वेळ देतील. ते रिकामटेकडे सीनियर सिटीझन्स का काय म्हणतात त्यांच्या हाका बंद होतील. जायचं सारखं त्या कट्टयावर. कधी वाढदिवस काय, कधी नाचतात काय तर गातात काय, तर कधी ती मॅरेथॉन काय. उठवळपणा नुसता!  हे काय वय आहे हे सगळं करण्याचं?

तळतळाट, गिरीजा काकूंचा नुसता तळतळाट होत होता. आनंद काका ऑनलाईन ब्रिज खेळत बसले होते भान हरपून, तीन तास झाले. डावामागून डाव रंगत होते. तेवढ्यात बेल वाजली, चला, आली वाटतं मीरा. जरा लेकीशी गप्पा मारल्या की बरं तरी वाटेल. नाहीतर घरात बोलतंच कोण माझ्याशी? “ये गं, हातपाय धू, चहा टाकते. टेरेसमध्ये बसू. मला तुझ्याशी बोलायचंय जरा.”

“आई नको, मी चहा घेऊन आलेय. आता आमच्या मित्रमैत्रिणींची झूम मीट आहे. तासभर चालेल. तू खाली चक्कर मारून ये ना. सगळ्या काकू लोक बसल्या आहेत नीट डिस्टन्स वगैरे ठेवून.”

“काही नको, तुम्हालाच माझ्याशी बोलायला आवडत नाही, मी काय त्या बायकांमध्ये जाऊन बोलणार मग. तुम्ही दोघंही त्या फोन्सला चिकटून बसत जा!” गिरीजा काकूंचा अखेरीस भडका उडालाच.

“अगं आई, का सारखी चिडचिड करतेस हल्ली? तू पण शीक ना गं फोनवरून व्हिडिओ कॉल्स करायला, तुला खाली जायची भीती वाटते ना, तू घरूनच मैत्रिणींना लावत जा ना कॉल्स. तुम्ही पण वेळ ठरवून सगळ्या ऑनलाईन भेटत जा ना. अगदी समोरासमोर बोलल्यासारखं  वाटतं बघ. तुला मी तुझ्या मोबाईल वर कित्ती पुस्तकं डाऊनलोड करून दिलीत ती वाच ना.”

“मला नको त्या मोबाईलच्या नादाला लावूस. तुम्ही दोघे कमी आहात का? तुझं एक ठीक आहे. पण हे काय आचरटासारखे वागतात!”

“अगं आई, बस इथे. काय आचरटपणा आहे त्यात? अल्वीन टोफ्लर म्हणून फिलॉसॉफर आहे. “The illiterate of the 21st century will not be those who cannot read and write, but those who cannot learn, unlearn, and relearn.” असं लिहून ठेवलंय त्याने.

“तेच बाबा करताहेत. कित्ती आऊटडोअरीश आहेत ते, पण जसं लॉकडाऊन सुरू झालं किती पटकन त्यांनी अ‍ॅक्सेप्ट आणि अ‍ॅडाप्ट केलं, ते सकाळी वेळेतच उठतात, तुला आनंदाने चहा देतात, एवढा ऑफिसर माणूस, कामवाली नाही तर तुला मदत म्हणून केर फरशी करतात, भाजी निवडून देतात. शिकलेच ना ते. लर्न!

“दहा माणसं हाताखाली काम करायची. पण घरी आता असं चालणार नाही. जाणीव झाली ना त्यांना? दाखवतात का ऑफिसमधला रुबाब कधी? नाही ना? अनलर्न!

“आणि ओव्हरऑलच त्यांचा स्वभाव कित्ती खेळकर आहे, का सगळयांना हवेहवेसे वाटतात ते? किती डायनॅमिक आहेत ते. तेच का, आपले सगळेच काका लोकं. तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह, हवाहवासा वाटणारा त्यांचा सहवास, सगळया काकांचं नवीन गॅजेट्सचं अद्ययावत नॉलेज. टिपिकल म्हातारी चिडचीड नाही करत ते कोणीच. अमेरिकेतून दादाच्या मुलांनासुद्धा आजोबांचं का एवढं वेड आहे? कारण त्यांनी या पिढीच्या विश्वात घडणाऱ्या नवनवीन गोष्टी पण शिकून घेतल्या आणि पटकन त्या पिल्लांशी कनेक्ट झाले. रिलर्न!

“हे बघ मीरा, मला आता ते इंग्लिश वगैरे नाही लक्षात राहत गं. मग आठवलं नाही की लाज वाटते नातवांसमोर. आणि कामापुरता मोबाईल शिकलेच ना मी.”

“एक्झॅक्टली आई. तेच म्हणायचंय मला. मी आणि बाबा पण पर्याय नाही म्हणूनच मोबाईलवर असतो सध्या. आणि तू मोबाइलवर खेळत बस असं मी म्हणतच नाहीये. पण त्याचा वापर करून तू काय नवीन शिकू शकतेस ते बघ. तू इतका छान स्वयंपाक करतेस, नवीन रेसिपीज करून त्याचे फोटो टाक तुमच्या बहिणभावांच्या ग्रुपवर. परवा नानामामाने त्याचं पेंटिंग टाकलं. नीलामावशी गीतेच्या पाच श्लोकांचे विवेचन करते रोज, कित्ती मन लावून ऐकतात, कौतुक करतात सगळे. कौतुकाचं जाऊ दे, पण फोटो काढून टाकायचा आहे या विचाराने तुझी डिश बनवण्याची प्रोसेस किती इंटरेस्टिंग होईल, तुला वेगळं काहीतरी सुचेल. फोटो काढताना तुझ्या तू हजार गोष्टी शिकशील. किती छान वेळ जाईल. Creative time, me time! You will enjoy the process, trust me!

“तू योगासने करतेस ना आई रोज, शारीरिक स्वास्थ्यासाठी, लवचिकतेसाठी. मग मेंटल फ्लेक्सिबिलिटी पण तितकीच आवश्यक आहे ना. अगदी छोट्या गोष्टीपासून सुरुवात कर मग. रोज करतेस त्याव्यतिरिक्त नवीन आसनं शीक. रोजच्या स्वयंपाकापेक्षा नवीन पदार्थ कर. मध्ये चारुआत्याशी तुझं खटकलं होतं ना, विसर ते, फोन करून बोल तिच्याशी. हम बडे हैं! पटवून दे सगळयांना.”

“कधी विचार केलास का बाबा आणि त्यांच्या सिनियर सिटीझन ग्रुप मधले ते बहुतेक सगळेच काका काकू इतके समाधानी आणि आनंदी का आहेत ते.  कारण  त्यांनी अ‍ॅडाप्ट केलंय, नवीन गॅजेट्सना, वाऱ्याच्या वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीला! आई तू पण बदलायचा प्रयत्न कर ग, फार फार एकटी पडशील नाहीतर. Its high time now!”

“तुझा हॅपीनेस कोशंट वाढवणं फक्त तुला शक्य आहे, बघ जमतंय का तुला. लर्न! अनलर्न! रिलर्न!

“ठीक आहे मीरा. आपण दोघी सुरुवात करूया. माझा मोबाईल आणून दे तेवढा आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं तू बघ आजपासून. Learn, you know! मी जरा अनलर्न करते ते काम. आणि जुने छंद, रेसिपीज रिलर्न करते!” 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज