प्रा. जयंत नारळीकर जेव्हा प्रथम परदेशातून पुण्यात आले तेव्हा इतरांप्रमाणे त्यांचा प्रभाव माझ्यावरही पडला. भारताने त्यांचे स्वागत एखाद्या जगज्जेत्यासारखे केले होते. त्यांच्या वडिलांची ‘सापेक्षता’ या विषयावरची भाषणे मी ऐकली होती. त्यामुळे जयंतरावांबद्दल कुतूहल होते. त्यावेळेला त्यांनी जे काही त्यांच्या संशोधनाबद्दल सांगितले ते तसे डोक्यावरूनच गेले. पुढे मुंबईला आकाशवाणीत विज्ञान कार्यक्रमांची निर्मिती सुरू केली तेव्हा जयंतरावांशी अधिक परिचय झाला, शास्त्रज्ञांची सामाजिक बांधिलकी मानणारे ते असल्याने मनापासून ते विज्ञान प्रसार करतात. मी त्यांचा पुरेपूर वापर करून घेतला. आमचे निमंत्रण त्यांनी कधीच टाळले नाही. आकाशवाणीच्या कार्यक्रमांव्यतिरिक्त मी त्यांच्या बाहेर पाच मुलाखती घेतल्या. इस्लामपूर आणि ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील विज्ञान संमेलनांमध्ये त्यांनी ग्रामीण भागातील श्रोत्यांना समजेल असे विज्ञान समजावून सांगितले. अशा भागामध्ये इतके वलय असलेला शास्त्रज्ञ प्रथमच आलेला. त्यामुळे एखाद्या चित्रपट कलाकाराला बघायला जमावी अशी गर्दी सर्व थरातून झाली होती. श्रोते त्यांच्या सह्या मागत. ते सांगत, मी कोणालाही सही देत नाही. तुम्ही मला पोस्टकार्डावर प्रश्न विचारा मी त्यांची उत्तरे देईन, सहीसकट. कालांतराने मराठी विज्ञान परिषदेने त्या पत्रांची पुस्तके प्रसिद्ध केली ‘पोस्टकार्डांवरील विज्ञान’ या नावाने.
दरवर्षी ग्रंथाली प्रकाशनामार्फत ‘वाचक दिन’ साजरा होतो. एके वर्षी मला जयंतराव आणि सौ. मंगलाताई, ज्या स्वत: गणिती आहेत, यांच्याशी गप्पा मारायला सांगितले. सोबत होत्या प्रसिद्ध साहित्यिका पद्मजा फाटक. आम्ही फारसे संशोधनाबद्दल बोललो नाही. कारण तो श्रोता सर्वसमावेशक होता. परदेशातून भारतात सर्व सुखसोयी सोडून आल्यावर इथे कसे वाटते असे विचारल्यावर ते म्हणाले, “आपल्या घरात अडगळ असली तरी ते आपले घर असते. बाहेर सुखसोयी असल्या तरी ते लॉजसारखे असते.” जागतिक मराठी परिषदेचे पहिले अधिवेशन मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात ऑगस्ट महिन्यात आयोजित केले होते. बाहेर धोधो पाऊस पडत होता, सभागृहात साहित्य, राजकारण, कलाजगत, अशा सर्व क्षेत्रातले ‘क्रीम’ उपस्थित होते. कुसुमाग्रज परिषदेचे अध्यक्ष होते. मंचावर “मराठा गडी यशाचा धनी” हा कार्यक्रम सादर होणार होता. मंचावर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, चतुरस्त्र गायिका आशा भोसले, जयंत नारळीकर, अॅडमिरल जयंत नाडकर्णी, सुनील गावस्कर, जामखेडचे डॉ. रजनीकांत आरोळे असे दिग्गज मुलाखतीसाठी तयार होते. या दिग्गजांच्या मुलाखती घेणारे होते अनुक्रमे डॉ. भा. र. साबडे, कवयित्री शांताबाई शेळके, जयंत एरंडे, ज्ञानेश्वर नाडकर्णी, बापू नाडकर्णी. (डॉ. आरोळे यांची मुलाखत कोणी घेतली ते आठवत नाही.) शंतनूरावांची मुलाखत त्यांच्या सुटाबुटातल्या पोषाखाप्रमाणे चापूनचोपून झाली. आशाताई आणि शांताबाईंची जुगलबंदीच झाली, जणू काव्य आणि संगीताची. मुलाखतीच्या शेवटी आशाताईंनी ‘जिवलगा, राहिले दूर घर’ हे गाणे गायले. प्रेक्षकांनी सभागृह डोक्यावर घ्यायचे उरले होते. आता माझी पाळी होती. माझ्यावर तर प्रचंड दडपण आले होते. कार्यक्रम सुरू झाला, आमच्या गप्पा व्यवस्थित रंगत गेल्या. प्रेक्षकही खूष दिसले. माझ्या शेवटच्या प्रश्नाने मुलाखत संपली. तो प्रश्न होता, “जयंतराव, आपण उभयता गणिती, आपले वडील विष्णुपंत गणिती, आई सुमतीताई संस्कृत पंडिता. या सर्वांचे दडपण तुमच्या मुलींवर येत नाही का?” जयंतराव म्हणाले, “घोड्यांच्या शर्यतीत घोड्याला रेस जिंकायची नसते, घोड्यावरच्या जॉकीला रेस जिंकायची असते.” एवढ्या उत्तरावर प्रेक्षक काय ते समजले आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला त्यातच आमच्या गप्पा संपल्या. मी हवेत गेलो. नंतर तिथे काय झाले ते आता लक्षातच नाही कारण अनेकांचे अभिनंदन स्वीकारत होतो. काही म्हणाले,” आम्हाला वाटत होते की आशाताईंच्यानंतर हे विज्ञानवाले काय करणार? पण तुम्ही जिंकलात”. मी सांगितले की ही जयंतरावांची कमाल आहे.
मौज प्रकाशनातर्फे दरवर्षी ‘चार दिवस मौजेचे’ हा पुस्तकोत्सव आयोजित व्हायचा. एका वर्षी मी त्या उत्सवात गोरेगाव येथे जयंतरावांची मुलाखत घेतली. पुस्तकोत्सव असल्याने आम्ही त्यांच्या साहित्यावर गप्पा मारल्या. इतर अनेक प्रश्न झाल्यावर मी विचारले, “विज्ञान आणि कला या दोन स्वतंत्र संस्कृती आहेत असे समजतात. समीक्षकांचे मत असे आहे की विज्ञान साहित्य हे साहित्य नाही. या दोन शाखा एकत्र येणार की नाही?” ते म्हणाले, “विज्ञान साहित्य हे साहित्य नाही हे मला पटत नाही. विज्ञान प्रसाराचे उत्तम माध्यम म्हणजे विज्ञान साहित्य. साहित्यात विज्ञान आले म्हणजे ते उणावते असे नाही. उलट नामवंत साहित्यिकांनी विज्ञान तंत्रज्ञानाचा मनावर, समाजावर कसा प्रभाव पडतोय ते लिहिले पाहिजे. साहित्यिकाने विज्ञान समजून लेखन केले तर उत्तम विज्ञान साहित्य निर्माण होईल. याचे एक उदाहरण देतो. केम्ब्रिज येथे मी असताना सुप्रसिद्ध साहित्यिक इ एम फॉर्स्टर यांना काही विज्ञान संकल्पना समजावून सांगितल्या. फॉर्स्टर यांनी त्यावर आधारित ‘मशीन STOP’ ही उत्तम विज्ञानकथा लिहिली.”
या मुलाखती घेण्याअगोदर जयंतरावांनी कधीही मला प्रश्न कोणते आहेत ते आगाऊ विचारले नाही. सामान्यपणे मुलाखत ज्यांची घ्यायची आहे त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीची निवड केली जाते. माझ्या सर्व कार्यक्रमांसाठी माझी निवड जयंतरावांनी केली हे मला नंतर सांगण्यात आले. आकाशवाणी पुणे केंद्राने २००२ मध्ये आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला. त्या प्रसंगीच्या स्मरणिकेत त्यांनी रेडिओविषयी आपल्या भावना लिहिल्या. त्या लेखात माझा उल्लेख होता. पण तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्या लेखातला माझा उल्लेख वगळला. हे मला कळले कारण त्या लेखाची एक प्रत त्यांनी माझ्याकडे पाठवली होती. माझ्या ‘आकाशवाणी’ या पुस्तकात त्यांचा उल्लेख थोडासा जुजबी लिहिला गेला. पण त्याबद्दल त्यांनी काही वाटून न घेता पुस्तकाबद्दल चांगला अभिप्राय पाठवला. पुस्तकातल्या आणिबाणीवरील मजकुराला दुजोरा देणारा त्यांचा एक लेखही माझ्याकडे पाठवला. त्यांच्या स्वत:च्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकात, ‘चार महानगरातले माझे विश्व’मध्ये माझ्यामुळे रेडिओ कार्यक्रम त्यांना करता आले असे श्रेय त्यांनी मला दिले हा त्यांचा मोठेपणा लक्षात राहील असाच आहे.
दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळण्यात येतो. राष्ट्रपती असताना डॉ. ए पी जे अब्दुल कलाम २७ फेब्रुवारीला प्रसार माध्यमावरून भाषण करीत. त्यांच्या भाषणाचे ध्वनिमुद्रण दिल्लीत होत असे. ते एकाच वेळेला प्रसारित होत असे पण त्याची संहिता झोनल केंद्रांकडे २६ तारखेला येते. २००४ साली तशी संहिता माझ्याकडे आली. मी वाचायला सुरवात केली आणि पहिल्याच वाक्यात घात झाला. आज ‘सर सी वी रामन यांचा जन्मदिन’ असे लिहिले होते. खरे तर त्यांचा जन्मदिवस ७ नोव्हेंबर असतो. राष्ट्रपतींकडून ही चूक होऊ नये म्हणून मी लगेच दिल्ली आकाशवाणीला फोन लावला. तिथले संचालक म्हणाले “मी तुला राष्ट्रपतीभवनाचे फोन नंबर देतो, तू प्रत्यक्ष बोल, मीही प्रयत्न करतो.” राष्ट्रपतींच्या सचिवांच्या लक्षात चूक आणून दिली. त्यांनी मला पर्याय विचारले. मी सांगितले की एक तर पहिले वाक्य गाळावे किंवा पुन्हा ध्वनिमुद्रण करावे. राष्ट्रपती तेव्हा कोलकत्त्यात होते. सचिवांनी मला त्यांच्याशी बोलून पर्याय सांगायला सांगितले. राष्ट्रपती म्हणाले “मी २७ तारखेला पहाटे दिल्लीत येत आहे, आपण परत ध्वनिमुद्रण करू.” सर्व सोपस्कार पार पडले आणि चूक टळली. प्रा. यशपाल यांच्या सत्कार समितीचा सदस्य म्हणून काही महिन्यांनतर मी दिल्लीत गेलो तेव्हा तिथे राष्ट्रपतींची भेट झाली. मी माझी ओळख सांगितली त्या क्षणी त्यांना भाषणाच्या घटनेची आठवण झाली आणि त्यांनी माझे अभिनंदन केले.
डॉ. होमी भाभा यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी तयार करायचे ठरवले. इतर मुलाखतींशिवाय श्री. जमशेद भाभा यांचे मनोगत ध्वनिमुद्रित करायचे ठरवले. ते होमी भाभा यांचे बंधू आणि टाटा समूहाचे चेअरमन होते. त्यांनी प्रथम गुजरातीत लिखाण तयार केले त्याचे भाषांतर मराठीत करवून घेतले. भाषणाची रंगीत तालीम केली आणि सायंकाळी ध्वनिमुद्रणासाठी स्टुडिओत आले. ध्वनिमुद्रण केले. त्यांच्याबरोबर एन. सी. पी. ए. चे सभागृह अभियंते बिस्वास आले होते. त्यांना भाभांनी स्टुडीओची माहिती घेण्यासाठी सांगितले. आमच्या ध्वनिमुद्रण करणाऱ्या अभियंत्यांशी ओळख करून घेतली. ध्वनिमुद्रण केल्यावर ते त्यांनी ऐकले. मला म्हणाले, “जयंत, माझा आवाज थोडा दमल्यासारखा वाटतोय.” मी म्हटले, “आपण संपूर्ण दिवसभर काम करून आलाय, तो थकवा आवाजात जाणवतोय.” लगेच ते म्हणाले, “मी उद्या सकाळी येतो. तुम्ही किती वाजता येता?” आम्ही सकाळी साडेनऊची वेळ ठरवली. ते वेळेवर आले आणि मनासारखे ध्वनिमुद्रण झाले. चेअरमन पदावरची व्यक्ती परिपूर्णतेसाठी, माध्यमाला किती महत्त्व देते आणि माध्यमातल्या आपल्या प्रतिमेला किती जपते हे बघायला मिळाले. यातूनच टाटा संस्कृती म्हणजे काय ते समजले.
आपल्या देशाने १९८० साली ‘रोहिणी’ या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्या प्रकल्पाचे प्रमुख होते डॉ. वसंतराव गोवारीकर. बातमी समजल्यावर मी त्यांच्या मुलाखतीसाठी पाठपुरावा सुरू केला. ते पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटायला त्रिवेंद्रम येथून, व्हाया मुंबई निघाले. मी त्यांना सांताक्रूझ विमानतळावर गाठले. छोटीशी मुलाखत घेतली. “मीच पहिला.” ते घाईत होते म्हणून म्हणाले की पुण्यात भाचीच्या लग्नासाठी येणार आहे तेव्हा तिथे सविस्तर मुलाखत देतो. नंतर मी त्यांना मंगल कार्यालयातच गाठले. कस्तुरबा मंगल कार्यालयातून पुणे आकाशवाणीवर जाण्यासाठी चालतच निघालो. चालता चालताच मुलाखतीविषयी चर्चा केली. त्या दिवशी आकाशवाणीला सुट्टी असूनही निवांतपणे ध्वनिमुद्रण झाले, मनासारखे. ‘किर्लोस्कर’ मासिकाने ती मुलाखत नंतर प्रसिद्ध केली. तेव्हा जो वसंतरावांशी स्नेह निर्माण झाला तो कायम टिकला. माझ्या निवृत्तीच्या सुमारास ते राजीव गांधी महाराष्ट्र राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे चेअरमन होते. त्यांनी माझी नेमणूक सल्लागार म्हणून तीन वर्षांसाठी केली. कोणकोणते प्रकल्प हाती घेता येतील याची रूपरेषा ठरवली. पण नोकरशाहीमुळे फार प्रगती झाली नाही. पण या काळात त्यांचे दूरदर्शित्व दिसले.
हा साहित्यिकांचे साम्राज्य असलेला अंंक आहे,कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर षट्कार मारणारे संपादकांचे कौशल्य व मुखपृष्ठावरून आत डोकावण्याची उत्सुकता निर्माण करणारा अंक . आणि....
उत्तर द्याहटवाअपार मेहनत घेऊन विनयाची सहजता असणारे अंक सादर करणारे कुशल संपादक मा.गौरी बर्गे, कल्याणी कुलकर्णी , सुभाष नाईक यांचे खूप खूप आभार !!!💐💐💐💐💐💐💐💐💐.
रत्नाकर दिवाकर.
हटवा