-
सौ. शिवानी कुलकर्णी
या
वर्षी २४ मार्च २०२०ला घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सगळे लोक खूप गोंधळून गेले.
अचानक आपल्या बाहेर जाण्यावर बंधन आल्यामुळे लोकांना खूप त्रास होऊ लागला. त्यात
बऱ्याच लोकांचे व्यवसाय बंद पडले. काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या. बऱ्याच लोकांना
पूर्ण पगार मिळत नाहीये. यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागतंय. सगळं काम
आपणच करायचं यामुळे बऱ्याच लोकांची चिडचीड झाली. खूप लोकांना मानसिक त्रास झालाय.
त्याचा परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर पण झाला. पण या सगळ्या प्रकाराचा सगळ्यात
जास्त त्रास झालाय लहान मुलांना.
आपली
लहान मुलं खूप गोंधळून गेली. अचानकच एका रात्री मध्ये शाळा बंद,
ग्राऊंड बंद, खाली मित्रमैत्रिणींबरोबर खेळणं
बंद. चोवीस तास फक्त घरात बसून राहणं या मुलांना किती त्रासदायक असेल याची कल्पना
करू शकतो आपण? बरं आपल्याला माहिती आहे की कोरोना आहे,
हा काय प्रकार आहे. पण या लहान मुलांना तर काहीच कळत नाही. त्यांना
फक्त एकच प्रश्न आहे की कोरोना कधी जाणार? आम्ही खाली मैदानावर
कधी खेळ खेळू शकणार. बर्याच पालक मंडळींची तक्रार आहे की या लॉकडाऊनमध्ये लहान
मुलांना कसं सांभाळायचं हा प्रश्नच आहे.
लहान
मुलं ही प्रचंड अॅक्टिव्ह असतात. त्यांच्यात खूप ऊर्जा असते. त्या ऊर्जेला योग्य
मार्ग मिळाला तर मुलं सकारात्मकतेच्या दिशेने वाढतात. पण तीच ऊर्जा योग्य मार्गाने
वापरली नाही गेली तर मुलं विध्वंसक होऊ शकतात. त्यांच्यात नकारात्मकता निर्माण होऊ
शकते. लॉकडाऊनमुळे ही ऊर्जा कोंडली गेली आहे. त्यामुळे मुलं चिडचीड करत असतील,
लहान लहान गोष्टींवरून रडायचं, हट्टीपणा करायचा
(एरवी करत असतीलच, पण आता त्यात वाढ दिसून येते), व्यवस्थित जेवत नसतील आणि कधी कधी रागाच्या भरात वस्तू फेकत देखील असतील.
तर आता हे सगळे प्रकार थांबवायचे कसे?
काही
पर्याय सुचवते, आचरणामध्ये आणायचा नक्की प्रयत्न करा. हे
पर्याय कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखे आहेत.
v मुलांना
काही तरी करायला द्या. त्यांचं मन गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. ह्या अॅक्टिव्हिटीज
मुलांच्या आवडीप्रमाणे असाव्यात याची काळजी घ्या.
v मुलांना घरातील कामांची सवय लावा. मुलगा असो की
मुलगी घरकाम हे सगळ्यांना यायला हवे. अगदी सगळी कामं त्यांनी करायला हवीत असं
नाही, पण निदान घर आवरणे, स्वयंपाकामध्ये थोडीशी
मदत करणे अशा बारीकसारीक गोष्टी शिकवू शकता.
v मुलं
भरपूर पसारा करत असतील तर करू द्या. नंतर तो पसारा त्यांनाच आवरायची सवय लावा.
आपल्यातल्या स्वच्छतामंत्र्याला थोडं शांत ठेवा.
v मुलांना
शिस्त लावणे गरजेचे आहे हे समजून घ्या. शाळा बंद आहे म्हणून वाटेल तेव्हा उठायचं
आणि रात्री कधीही झोपायचं असं नको करायला. ठामपणे पण शांतपणे त्यांना शिस्त
लावायची. चांगल्या गोष्टी शिकवायची हीच खरी आणि योग्य वेळ आहे.
v मुलांना
कोरोनाबद्दल सांगताना शब्द जपून वापरा. त्यांच्या मनात भीती निर्माण नाही करायची
पण काळजी का घ्यायला हवी हे पटवून द्यायचं आहे.
v मला
पूर्ण कल्पना आहे की आई आणि वडील दोघंही ‘वर्क फ्रॉम होम’ करत असल्याने मुलांना
वेळ देता येत नसेल. पण म्हणून वाटेल तेवढा वेळ टीव्ही,
मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर
अथवा कुठल्याही प्रकारची गॅजेट्स देणं
हे योग्य नाही आणि मुलं काय बघत आहेत यावर लक्ष असू द्या. मुलं कंटाळत असतील तर
कंटाळू द्या. ते स्वतःच स्वतःला गुंतवून ठेवण्याचा मार्ग शोधतील. त्यांना धोकादायक
असतील अशा वस्तू त्यांच्या दृष्टीसमोर नको ही काळजी मात्र नक्की घ्या आणि त्यांना
थोडी मोकळीक द्या. पण सारखा मोबाईल, लॅपटॉप किंवा कुठला तरी स्क्रीन समोर लागणं हे
व्यसन आहे, असे ‘स्क्रीन अॅडिक्शन’ होऊ नये याची कृपा करून काळजी घ्या.
आता एवढं सगळं बघायचं म्हटले की
आधी आपण स्वतः ठणठणीत असणं आवश्यक आहे, नाही का? मग तुम्ही सुद्धा काही मुद्दे लक्षात ठेवा:
v सुपरमॅन
किंवा सुपरवुमन ही एक कपोलकल्पित कथा आहे. सगळं काम एका
दिवसात व्हायलाच हवं असा आग्रह धरू नका. याचा त्रास तुम्हाला तर होतोच पण तुमच्या
कुटुंबाला सुद्धा होतो. एखाद्या दिवशी भांडी घासायचा कंटाळा आला तर राहू द्या. काही
हरकत नाही. उगाच स्वतःला ढकलून सगळी कामं करणार आणि मग त्या सगळ्याचा स्वतःला
मानसिक किंवा शरिरिक त्रास होतो त्याची चिडचीड होणार.
v सतत
टीव्हीवरील बातम्या बघून उगाच चिंता वाढते, मन अस्वस्थ
होतं आणि त्याचा परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होतो. बातम्यांमध्ये नकारात्मक
गोष्टी जास्त दाखवल्या जातात. जगात सकारात्मक गोष्टीदेखील घडत आहेत. तुम्हाला अगदी
जगात काय चालत आहे जाणून घेण्याची इच्छा असेल तर ऑनलाईन बातम्या वाचा.
v घरातली
कामं सदस्यांमध्ये वाटून घ्या. सगळी कामं एकाच व्यक्तीने करायला हवीत असा कुठेही
नियम नाही. कामाचं वाटप केल्याने कोणालाच ताण येणार नाही.
v राग
आला किंवा संताप आला तर सगळी कामं बाजूला ठेवून शांत बसा. घरातला एक कोपरा पकडून
शांत बसा. आवडेल असा काही छंद जोपासा. एखादे आवडत असेल अस गाणं ऐका,
टीव्हीवर काही बघू शकता, चित्र काढू शकता,
नाच करू शकता, पाककला करू शकता, जे मनात असेल ते करा. छंद जोपासण्यासाठी वयाची काहीही मर्यादा नसते.
v कोणाशीतरी
बोला. आपलं मन मोकळं करा. जितकं मनात साठवून ठेवाल तेवढा त्रास जास्त होतो आणि एक
दिवस मग मोठ्या विस्फोटासारखं सगळं मनातलं बाहेर पडतं. त्यापेक्षा कोणी एक अशी
व्यक्ती असूद्या जिच्याजवळ तुम्ही मन मोकळं करून बोलू शकाल.
मला खात्री आहे की हे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या
प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि काही तरी मार्ग सापडला असेल. आपण पहिल्यासारखे
मनमोकळेपणाने जीवनात परत वाटचाल करू शकू, सध्याचे
लॉकडाऊनचे दिवस पण जातील हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण जगू या !!
chan lihlay.
उत्तर द्याहटवा