आज
कधी नव्हे ते ती गाढ झोपली होती. अगदी आजूबाजूला कायं घडतय याची शुध्द
नसल्यासारखी.
खरं
तर आज वसुबारस म्हणजे रूढार्थाने दिवाळीचा पहिला दिवस. नेहमीच्या सवयीने आनंदा
आवाज देत आत खोलीत डोकावला. “ताई, अगं आज तू अजूनही कशी काय झोपलीस? नाही तर सण
म्हटलं की तर तुझी कोण घाई असते! उलट आम्हा सगळ्यांना दटावत असतेस किती
उशीरापर्यंत सणालाही लोळता म्हणून.” त्याच्या या साऱ्या बडबडीचा परिणाम होऊन वसुधा
खाड्कन उठली.
“अरे
आनंदा,
आज असं कसं झालं? मला अजिबात जागच आली नाही रे, बरं आता मात्र पटापटा आवरलं पाहिजे. माईंची केअर टेकर येईल त्या आधी सर्व
उरकलं पाहिजे. अन् परत आण्णांना चहाला उशीर झाला तर ते ओरडत सुटतील. चल बाजूला हो.
काय शुंभासारखा बघतोस? आवरू दे मला, आधीच उशीर झालाय! तुझे भावजी कुठे गेले रे
एवढ्या सकाळचे?”
आनंदा
अजूनही तसाच उभा होता. तिला निरखीत, न्याहाळीत... इतक्यात
छोटी चिनू खोलीत येत म्हणाली, “आई, मी बाबांशी कट्टी आहे...
बाबा मला न घेताच गेले फिरायला... अन् तू ही उशीरा उठलीस... आबाही माझ्याशी गप्पा
मारायला तयार नाहीत... अन् आजीच्या खोलीत जायचं नाही.. अशी बाबांनी कालच ताकीद
दिली मला!”
वसुधा दोन मिनिटं स्तब्ध झाली. बेडवर बसली. आनंदा म्हणाला, “ताई, तुला काय होतंय?” तशी छोटी चिनूही तिला बिलगली... “आई, तुला काय झालं?” वसुधाचा चेहरा कसनुसा झाला. डोळे आसवांनी भरुन आले. काय झालं हे? आता तर आई आपल्याला कधीच दिसणार नाहीत... असं कसं आपण सारं विसरलो... एवढी कशी शुद्ध हरवली आपली? वसुधा स्वत:वरच नाराज झाली. अन् आनंदाला म्हणाली, “आनंदा, चिनूला थोडीशी गाडीवरून चक्कर मारुन आण. येताना एखादं चॉकलेट पण घेऊन दे... मला जरा घरातली आवराआवर करू देत.” आनंदाने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन चिनूला कडेवर उचलून घेतलं अन् तिच्याशी तिच्याच बोबड्या भाषेत बोलत खोलीबाहेर पडला.
इतक्या
वेळ दाबून ठेवलेला हुंदका वसुधाच्या तोंडून बाहेर पडला अन् ती भिंतीला डोके टेकून
बसली. जुन्या साऱ्या आठवणींचा पट तिच्या डोळ्यासमोरून सरकू लागला. ती या घरात माप
ओलांडून आली त्या दिवसाची तिला प्रकर्षाने आठवण झाली. माईंनी तिला पहिल्याच दिवशी
सांगितले होते... “हे बघ, तुझ्या अन् आमच्या घरच्या पद्धती वेगवेगळ्या असणार, पण
आता या घरातल्या साऱ्या पद्धती अंगी बाणवून घ्यायच्या. आपलं घर म्हणजे पाहुण्यांची
रेलचेल असणारं मोठं खटलं आहे. आता हे तुला सारं पुढं असंच चालू ठेवायचंय ह्याची
खूणगाठ मनाशी ठेव सदैव... तुला वाटेल, हे पहिल्याच
दिवशी आपल्या सासूने काय चालू केलं... परंतु माझ्या मते माणूस जितक्या लवकर मानसिक
तयारी करतो अन् वास्तव स्वीकारतो ना, तितकं त्यालाच सारं सोपं जातं...”
तसं
तर माईंचा स्वभाव खूप परखड होता, पण तितकाच मायाळू. तशा त्या फारश्या गप्पिष्ट
नव्हत्या पण कुणाची स्तुती करायची म्हटली की त्यांच्या जीभेवर सरस्वती नाचे...
त्यात जर ती कोणा आपल्या माणसाची असेल तर विचारूच नका... माई स्वत: उत्तम स्वयंपाक
करायच्या. इतक्या की अन्नपूर्णेने
त्यांना जन्माला घालताना सढळ हाताने दान दिले असावे या गृहिणीला. काटकसर अन्
निगुतीने संसार करणं कोणी त्यांच्याचकडून शिकावं... त्यामुळेच ही मामी आणि काकू
साऱ्या भाच्यांची, पुतण्यांची फार लाडकी होती.
तसं
तर माईंना सदाशिव हा एकुलता एक. पण मुलगी नाही याचं शल्य उदरात बाळगण्यापेक्षा माईंनी
ती मुलीची माया आपल्या दोन पुतण्या अन् तीन भाच्या यांच्यावर निछावर केली होती...
मुलगी
नसल्यामुळे त्यांनी वसुधालाही मुलीच्याच तोडीचं प्रेम दिलं.. खूप काही गोष्टी
वसुधा त्यांच्याच कडून शिकली... वसुधालाही आई नसल्यामुळे तिनेही माईंना आईचाच
दर्जा मनात आणि जनमानसातही दिला होता...
सदाशिव
नावाप्रमाणेच भोळा सांब होता. साऱ्या जगताला मदत करायला सदैव तत्पर. त्यामुळे
बरेचदा त्याचे वसुधाशी खटके उडायचे, पण माई सांभाळून घ्यायच्या अन् आण्णाही त्यावर
मलमपट्टी करायचे.
आण्णा
तसे खूप करारी होते. पण वसुधा या घरात आल्यापासून ते बरेचसे निवळले अन् चिनू
झाल्यावर तर त्यांचे विश्वच बदलले. ते तिच्या साऱ्या बाललीलात आपलं बालपण शोधू
लागले.
खरं तर या घराने वसुधाला स्वत:चं असं वेगळं अस्तित्व दिलं, एक प्रकारचा आत्मसन्मान दिला अन् या सर्वांत माईंचा मोठा हात होता. त्यामुळेच वसुधाला आज माईंची पोकळी जाणवत होती.
सहा
महिन्यांपूर्वी नेहमीप्रमाणेच आण्णा माई सकाळी फिरायला बाहेर गेले... येताना अचानक
माईंना चक्कर आली.. त्या उठू शकेनात.. अण्णांच्याही अंगातलं एकदम त्राण
गेल्यासारखे झाले... नशीबाने तेथूनच जाणाऱ्या एकाने पाहिले अरे हे तर आपल्याच
बिल्डिंगमधले... सदाशिव काकांचे आई वडील... म्हणून लगेच सदाशिवला फोन केला गेला...
सदाशिव पोचले... आईला इतरांच्या मदतीने गाडीत बसविले... हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले,
इकडे वसुधा अण्णांना घेऊन घरी आली... अण्णा पार भेदरून गेले होते...
असं कसं होत्याचं नव्हतं झालं हीच भावना त्याचं मन जाळीत होती...
त्यानंतरचे
ते दवाखान्यातले दिवस मग माईंचं खुब्याचं ऑपरेशन... नंतर फिजिओथेरपीवाला डॉक्टर ...एक
ना दोन,
हजार भानगडी... नाही म्हणायला एरवी सदाशिवच्या जनसंपर्कावर चिडणारी
वसुधा आता मात्र पूर्णच गप्प झाली होती.. कारण या लोकांमुळेच आधी वेळेत माईंना ॲडमिट
करता आलं होतं अन् नंतरही सारी बाहेरुन लागणारी औषधं, ऑपरेशनच्या
वेळी लागणारं रक्त सारं तर यांनीच व्यवस्थित मॅनेज केलं
होतं.. नंतर सुद्धा माई घरी आल्यावर लागणारी केअर टेकरसुध्दा यांच्यातल्याच
कुणाच्यातरी नात्यातील होती...
सारं
केलं पण माईंना स्वत:लाच आपणं परावलंबी झाल्याचं फार दु:ख झालं होतं. त्यामुळेच
त्या खंगत गेल्या... वास्तविक त्यांच्या लाडक्या भाच्या,
पुतण्या सुध्दा माईंसाठी वरचेवर येत. त्याचं मन रिझविण्याचा प्रयत्न
करीत. पण वसुधा अन् सदाशिवच्या साऱ्या प्रयत्नांना फोल ठरवत दोन महिन्यांपूर्वी
माईंनी या ईहलोकाचा निरोप घेतला. एवढे दोन महिने झाले पण वसुधा मात्र माई आपल्यात
आता नाहीत हे काही स्वीकारू शकली नव्हती.
आठवड्याभरापूर्वीच तिच्या दोन्ही चुलत नणंदा तिला येऊन सांगून
गेल्या होत्या, “वहिनी, तू काही फराळाचं करू नकोस. आम्ही सारं काही देणार आहोत.”
अन् दुसरी आत्येनणंद तर मोठी. तिने हक्काच्या जरबेने सांगितले होते, “वसुधा तू
काहीच करू नकोस. पाडवा, भाऊबीज आमच्याकडेच जेवायला या तुम्ही सारे. चिनूलाही जरा
माझ्या नीलांबरीशी खेळता येईल.”
वसुधाला
सारं आठवत होतं पण वळत नव्हतं. माई नसताना दिवाळी कशी साजरी करायची हेच तिला समजत
नव्हतं. अन् अशा कातर क्षणी सदाशिव नसावेत हे तर तिला फारच क्लेशकारक वाटत होतं.
तरीही स्वत:ला सावरत ती उठली. अण्णांच्या खोलीत गेली. अण्णा माई गेल्यापासून बोलायला महाग झाले होते. तरीही स्वत:ला त्यांच्यासमोर बळे बळे नेतं वसुधा म्हणाली, “अण्णा, आजच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशीसुध्दा ह्यांचा पाय घरात टिकू नये! बघा तुम्हीच. जरा आले की बोला यांच्याशी. चांगली समजच द्या त्यांना.” ती हे म्हणायला अन् बेल वाजायला एकच गाठ पडली. दार उघडताच दारात साक्षात् सदाशिव अन् बेबीआत्या! आत्यांना पाहून तिचा सारा चढलेला पारा एकदम शांत झाला. ती म्हणाली, “अरेच्चा, आत्या तुम्ही! बरं झालं आलात. आता जरा सणासुदीला घरात माणसं आहेत असं तरी वाटेल.”
बेबीआत्या
म्हणाल्या, “मला माहीतच होतं, वहिनी नाही म्हणल्यावर
तू काही करायची नाहीस. पण अगं, भरलेल्या घरात असं कोणी करतं
का? छोट्या चिनूसाठी तरी जरा मनाची उभारी धर. अन् फार काही नको तर घर म्हणून चार
शकुनाच्या करंज्या तेवढ्या करू. मी आहे तुझ्या मदतीला. तू काहीच न करता दिवाळी
घालवलीस तर वहिनीला सुध्दा वर कसंसं वाटेल. चल उठ! कामाला लागू या. जरा
अण्णाच्यापण मनाला तरतरी येईल.”
वसुधा
उठली. आधी बेबीआत्यांना आणि अण्णांना तिने चहा केला. परत सदाशिवला चहा देणार तर तो
गायब. ती काहीच बोलली नाही. इतक्यात आनंदा आणि
चिनू आले. चिनूची चिवचिव चालूच होती. ती बेबीआत्यांना आजी आजी करत बिलगली. म्हटल्याप्रमाणे
दोन्ही चुलतनणंदा सारा फराळ घेऊन दुपारीच हजर झाल्या. बेबीआत्याला आलेली पाहून म्हणाल्याही,
“चला आता जरा वहिनीला बरं वाटेल, अगदी घर भरल्यासारखं!” आत्यांच्या म्हणण्यानुसार
वसुधाने शकुनाच्या म्हणून थोड्या करंज्या, थोडे बेसन लाडू
केलेच.
दुसऱ्या
दिवशी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी होते. नरकचतुर्दशीला पहाटे उठताना
परत वसुधाला माईंच्या आठवणीने बेचैन व्हायला झाले. संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या
वेळेस तर चिनूने रडून गोंधळ घातला. “मला आजी हवीये!” सारे कसनुसे झाले. मग
बेबीआत्याच पुढे आल्या अन् म्हणाल्या, “चिनू बाळा,
इकडे ये! मी तुला गंमत सांगते.” मग त्यांनी तिच्या बोबड्या भाषेत तिला माई तिकडे
परगावी गेल्यात असं पटवून दिलं. तिसरा दिवस बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. सकाळीच
आत्या सदाशिवला म्हणाल्या, “आज वसुधाला काहीतरी फक्कड ओवाळणी
घाल हो!” सदाशिवने नुसतीच मान डोलावली.
दुपारी
बेल वाजली, तर नेहमीप्रमाणेच सदाशिवची मित्रमंडळी दरवाजात दत्त म्हणून उभी. पण या
वेळेस त्यांच्या हातात मोठं खोकं होतं. ती काही बोलणार इतक्यात सदाशिवने आनंदास
हाक मारली, “अरे आनंदा, ही दोन खोकी आमच्या
खोलीत नेऊन ठेव जरा!” त्यानेही भावजींचा मान ठेवून खोकी आत नेऊन ठेवली. वसुधा
चमत्कारिक चेहऱ्याने सारे बघत होती. तिला काही गोष्टींचा उलगडाच होत नव्हता.
सकाळची
जेवणं झाली. झाकपाक झाली. आता वसुधाने सदाशिवकडे मोर्चा वळविला. “काय हो, आता कुणाला
मदत करताय? कसली खोकी आहेत?” तसं सदाशिवने नेहमीप्रमाणेच उडवाउडवीचे उत्तर दिले
अन् वामकुक्षीसाठी खोलीत गेला. वसुधाची उत्सुकता तिला शांत बसू देईना. ती खोक्याला
हात लावणार इतक्यात आनंदाने आवाज दिला, “ताई चिनू रडतीये... लवकर ये!”
अशातच संध्याकाळ झाली, दिवेलागण झाली. पणत्या लावल्या. आत्या म्हणाल्या, “सदाशिवा, आता कुठे बाहेर जाऊ नकोस रे. वसुधा, ओवाळण्याची तयारी कर अन् ओवाळ त्याला.” इतक्यात बेल वाजली. तिन्ही नणंदा दारात हजर! वसुधाला कोडे उलगडेच ना... भाऊबीज तर उद्या, अन् घरचा पाडवा सोडून या इथे कशा?
वसुधाने सदाशिवला नेहमीप्रमाणेच संयमितपणे ओवाळले. सुपारी त्याच्या हातात दिली अन् ताम्हण देवापाशी नेऊन ठेवले. नाहीतरी आजतागायत सुपारी दिली की सदाशिव ओवाळणी देईल की नाही याची तिने कधीच प्रतीक्षा केली नव्हती. माईंना तिच्या या स्वभावाचे फार अप्रूप वाटायचे. किती तो निरिच्छ स्वभाव! आजही तिने तसेच केले खरे. पण घडले वेगळेच - सदाशिवने सुपारीबरोबर तिच्या हातात एक पुस्तक सोपवले. कुणाचे पुस्तक? अन् बघते तर काय... ‘मनातील मोरपीस’, लेखिका - सौ. वसुधा सदाशिव कारखानीस! वसुधाच्या अंगावर ते पाहून काटाच उभा राहिला. तिला काय बोलावे तेच कळेना. ती एवढंच बोलू शकली, “अहो...”
सदाशिव
म्हणाला, “जाण्याच्या तीन दिवस आधी माईने तुझी ही कथांची डायरी मला दाखविली. म्हणाली,
मी या आजारातून नाही वाचणार. पण माझी शेवटची इच्छा आहे, की माझ्या
वसुधाच्या या कथांना मूर्त रुप द्यावं. सदाशिवा, एवढं करशील ना? मी माईला वचन दिलं
होतं, की या कथांना मूर्त रूप देणार. अन् या खोक्यात याच पुस्तकाच्या प्रती आहेत.
याचं प्रकाशन आणि मुद्रण, अन् आता
वितरण सुध्दा माझी मित्र मंडळीच करणार आहेत!”
आता
साऱ्या नणंदानी तिला घेरलं. “काय वहिनी.. कशी काय पाडवा ओवाळणी?”
वसुधाच्या
चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता. आपल्या कथांना मूर्त रूप मिळाल्याचं एक वेगळंच
समाधान तिला मिळालं होतं. तिच्या डोळ्यात आसवं जमा झाली होती. एका बाजूला आपल्या
कथांना मूर्त रुप मिळाल्याची कृतकृत्यता, तर दुसरीकडे या आपल्या एवढ्या मोठ्या आनंदात
माई नसल्याची खंत. त्यामुळे तिला वाटलं, आपला एक डोळा या अनोख्या पाडवा भेटीने
हसतोयं अन् दुसरा मात्र आपल्या आयुष्यातील एवढ्या मोठ्या क्षणी आईच्या जागी
असलेल्या माई आज नाहीत म्हणून अश्रू ढाळतोय... काय हा नियतीचा विचित्र खेळ!
एक
मात्र तिला जाणवत होतं, नवऱ्याच्या ज्या मित्रांचा आपल्याला तिटकारा आहे, तीच मंडळी
खरं तर कायम आपल्या मदतीस धावून येतात. चांगल्या क्षणी अन् वाईट प्रसंगात सुद्धा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा