आणि प्रिन्स्टन किल्ला अभेद्यच राहिला...

 मूळ इंग्रजी कथा "The Fallen Knight"

मूळ कथा लेखक: अमेय नितीन कुलकर्णी

अनुवाद: सौ. सई नितीन कुलकर्णी

सुमारे सात आठ शतकापूर्वीचा काळ असावा, युरोपमध्ये एक प्रचंड मोठा आणि अभेद्य असा भुईकोट किल्ला दिमाखात उभा होता. मजबूत अशी तटबंदी, आठही दिशांना भले मोठे दगडी बुरुज व चहू बाजूंनी भल्या मोठ्या खंदकाने वेढलेला असल्याकारणाने त्यावर झालेली अनेक आक्रमणे त्याने सहजपणे परतवून लावली होती. किल्ल्याच्या आत एक मोठे शहरच वसलेले होते, अन्नधान्य व इतर गरजेच्या सर्व वस्तूंची निर्मिती आतच होत असल्याकारणाने ते बाहेरील जगावर अवलंबून नव्हते. आतील प्रजा ही सुरक्षित व सुखी होती. राजा चार्ल्स दुसरा व राणी ईडिथ खूप प्रेमळ व प्रजावत्सल होते. राजाने त्याच्या तरुणपणी खूप मर्दुमकी गाजवली होती, पण आता तो सत्तरीकडे झुकत चालला होता. दोघांचे दाम्पत्य जीवन खूप सुखात गेले होते, फक्त एकच खंत होती की त्यांना मुलबाळ नव्हते, राज्याला वारस नव्हता. त्या राजाला ही सल कायम सलत होती. ह्या किल्ल्याची सत्ता परकीयांच्या हाती गेली तर प्रजेचे हाल होतील ही खंत त्या उभयतांना अस्वस्थ करीत होती. तसे हे राज्य सोपवण्यासाठी त्या दोघांच्या मर्जीतील एक व्यक्ती होती, त्यांचा सेनापती हेन्री डिक्सन. हेन्री उंचापुरा व पिळदार शरीराचा होता. त्याच्या युद्धनिपुणतेच्या व शौर्याच्या गाथा दूरवर पसरलेल्या होत्या. तोही त्याच्या राजा सारखाच सगळ्या युद्धांमधे अपराजितच होता. त्याचे सैनिकांवरील प्रेम व राजावरील निष्ठा पराकोटीची होती. त्याच्या ह्याच सर्व गुणांमुळे तर तो राजाला खूप प्रिय होता.

हेन्रीचा एक धाकटा भाऊ फ्रेडरिक, त्याच्या पत्नी व मुलासह त्याच किल्ल्यात राहत होता. त्याचा मुलगा, एडवर्ड, चौदा पंधरा वर्षांचा चुणचुणीत, चाणाक्ष व हुशार मुलगा होता. फ्रेडरिकला लढाई ह्या प्रकारात फारशी गती नव्हती पण त्याला पोलादाची, लोखंडाची व शस्त्रनिर्मितीची खूपच चांगली जाण होती त्यामुळे त्याला राजाने शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्याचा प्रमुख म्हणून नेमले होते.

 डेव्हिड नावाचा हेन्रीचा घनिष्ट मित्र होता. सेनेत तो हेन्रीच्या लगेचच खालच्या हुद्द्यावर होता. तो खूप शूर, लढवैय्या होता पण कानाचा जरा हलका होता. डेव्हिड व हेन्री हे तसे समवयस्क, दोघेही एकाच वेळेस सेनेत रुजू झाले होते पण हेन्री सेनापती झाला ह्याची डेव्हिडच्या मनात थोडी सल होतीच.

प्रिन्स्टनची सेना आठ भागात विभागलेली होती, त्याचे आठ मुख्य कॅप्टन होते व त्या प्रत्येकाला एका बुरुजाची जबाबदारी दिलेली होती.

जवळच्या राज्यात रॉबर्ट नावाचा अतिशय क्रूर, धूर्त व स्वार्थी राजा होता. प्रिन्स्टनचा राजा आता वयस्कर झाला आहे व तो निपुत्रिक आहे हे माहित असल्यामुळे रॉबर्टचा सतत ह्या राज्यावर डोळा होता. त्याची राज्यविस्ताराची हाव पराकोटीची होती. त्याला हे मान्य होते की हेन्रीच्या सेनेपुढे त्याच्या सेनेचा टिकाव लागणे शक्य नाही. म्हणून साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरून हा किल्ला हस्तगत करण्याच्या संधीची तो वाट पाहत होता.

एकदा रॉबर्टची सेना प्रिन्स्टन किल्ल्यावर चालून आली. हेन्रीने दुर्बिणीतून पाहून त्या सेनेचा अंदाज घेतला, ते संख्येने फार कमी वाटले म्हणून हेन्रीने राजाशी मसलत करून निर्णय घेतला की ह्या सेनेशी किल्ल्याच्या आतून जास्त काळ लढत रहाण्यापेक्षा त्यांच्याशी मैदानात जाऊनच मुकाबला करावा म्हणजे लवकर सोक्षमोक्ष लावता येईल. रात्रीतून किल्ल्याचे द्वार उघडले गेले, खंदकावरचा तात्पुरता पूल लावण्यात आला व सेनेच्या चार तुकड्या बाहेर पडल्या. डेव्हिड सगळ्यात पुढे राहून, दोन तुकड्यांचे नेतृत्व करीत होता, सेनेच्या उरलेल्या दोन तुकड्यांचे नेतृत्व स्वत: हेन्री करीत होता. असा अंदाज होता की रात्रीतून हल्ला करून सकाळपर्यंत विजय मिळवून किल्ल्यात परतता येईल. पण अंदाज चुकला, कारण समोर दिसत होते त्यापेक्षा दीडपट सैन्य जवळच्या झाडीत लपून बसलेले होते व लढाई चरमसीमेवर असताना तीन दिशांनी त्या ताज्या कुमकीने प्रिन्स्टनच्या सैन्यावर हल्ला चढवला, त्यात डेव्हिड जखमी होऊन खाली पडला. ही खबर सैन्यात पसरताच प्रिन्स्टनचे सैन्य जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. युद्ध जिंकण्याची शक्यता नसल्यामुळे हेन्री उरलेल्या सर्व सेनेसह किल्ल्यात परतला. अनावधानाने डेव्हिड मात्र जखमी अवस्थेत बाहेरच राहून गेला.

डेव्हिड दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आला तेव्हा तो कुठे आहे हे त्याला समजेना. युद्ध आपण हरलो की काय असा प्रश्न त्याला सतावू लागला. डेव्हिड शुद्धीवर आल्याचे पाहून रॉबर्ट पुढे आला व त्याने मित्रत्वाचा हात पुढे केला व म्हणाला की, “तू ज्याला तुझा मित्र मानतोस तो हेन्री तुला त्या रणभूमीत मरायला सोडून गेला होता, तो तुला सहज वाचवू शकला असता.” रॉबर्ट पुढे सांगू लागला की, “तुझा विश्वास असेल तर तू इथून पुढे मला आपला मित्र समजू शकतोस”. डेव्हिडचा चेहरा निर्विकारच होता. रॉबर्टचा धूर्त व कावेबाज स्वभाव आता डोके वर काढत होता. रॉबर्टने डेव्हिडच्या मनात हेन्रीबद्दल द्वेषाचे बीज पेरायला सुरुवात केली. डेव्हिडच्या मनात इतके दिवस सुप्तावस्थेत असलेली सेनेत मिळालेली दुय्यम स्थानाची सल आता द्वेषाचे, इर्ष्येचे रूप घेत होती. रॉबर्टने  त्याच्या समोर एक प्रस्ताव मांडला की, “आपण दोघे एकत्र आलो तर प्रिन्स्टन किल्ल्यावर आपला अधिकार होऊ शकतो. तुझ्यासारखा शूर सेनापती लाभला तर हे राज्य तर आपण हस्तगत करूच पण त्याशिवाय आणखीही राज्याचा विस्तार करता येईल. माझ्या राज्यात तुझ्यासारख्या शूर व हुशार सेनापतीचा अभाव कायम जाणवत राहिला आहे.” ह्या प्रशंसेने डेव्हिडही हुरळून गेला व रॉबर्टला त्याच्या प्रस्तावाची मान्यता दिली. त्यांची एक गुप्त योजना ठरली व त्याप्रमाणे डेव्हिड प्रिन्स्टन किल्ल्यामध्ये गेला. किल्ल्यामध्ये गेल्यावर त्याने असा बनाव केला की, शत्रूच्या सैन्याने त्याला बंदी बनवून ठेवले होते पण तो कसा तरी निसटून परत आला.

ठरल्याप्रमाणे डेव्हिड, हेन्रीचा भाऊ फ्रेडरिक याच्या घरी गेला व वेळ साधून त्याने फ्रेडरिक व त्याच्या बायकोला भोसकून मारून टाकले. त्यांच्या मुलाला, एडवर्डला बेशुद्ध करून पळवून रॉबर्टच्या राज्यात घेऊन गेला.

हेन्रीला हे कळताच तो घटनास्थळी गेला व तेथील दृष्य बघून संतप्त झाला.  धाकट्या भावाचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून त्याचे मन व्यथित झाले. तो ज्याला आपला जवळचा मित्र समजत होता त्या मित्राने, डेव्हिडने असे करावे ह्याचा त्याला जास्त राग आला होता. आपसूकच त्याचे शिवशिवणारे हात त्याच्या तलवारीच्या मुठीवर गेले. आपल्याच हाताने फ्रेडरिकचे डोळे मिटत त्याने प्रतिज्ञा केली की, “तो डेव्हिड जरी पाताळात लपला असेल तरी त्याला मी शोधून काढीन व त्याला ठार मारीन.” फ्रेडरिकच्या हत्येची बातमी घेऊन हेन्री राजा कडे गेला व त्याने थोडे सैन्य घेऊन डेव्हिडच्या मागावर जाण्याचा आपला विचार राजापुढे मांडला. राजाने हेन्रीला समजवण्याचा प्रयत्न केला की, हे शत्रूचे कटकारस्थान असू शकते व तो बाहेर पडताच शत्रू किल्ल्यावर आक्रमण करेल. अशा वेळी राज्याची सुरक्षा ही महत्त्वाची असावी. राजा म्हणाला की, “तुझ्या पुतण्यापेक्षा आज किल्ला महत्त्वाचा आहे, तुझी प्रतिज्ञा नंतरही पूर्ण होऊ शकते. तेव्हा मी तुला सैन्य घेऊन डेव्हिडच्या मागे जाण्याची परवानगी देऊ शकत नाही.” हेन्रीने एक गौप्यस्फोट केला की, “एडवर्ड हा फ्रेडरिकचा मुलगा नसून माझा स्वत:चा मुलगा आहे, त्याच्या जन्माच्या वेळी त्याची आई म्हणजे माझी पत्नी वारली. त्याचे संगोपन चांगले व्हावे व मला राज्यसेवेत पूर्ण वेळ देता यावा म्हणून मी एडवर्डला, माझ्या मुलाला फ्रेडरिकच्या हाती सोपवले होते.” पण ह्या त्याच्या सांगण्याचाही काही परिणाम राजाच्या निर्णयावर होत नाही हे पाहून हेन्री निराश होऊन राजगृहातून बाहेर पडला खरा पण त्याचे पुत्रप्रेम व त्याने घेतलेली शपथ त्याला स्वस्थ बसू देईना. हेन्रीने निर्णय घेतला व तो एकटाच घोड्यावर स्वार होऊन डेव्हिडच्या शोधात निघाला. दरम्यान, डेव्हिड जाऊन रॉबर्टला भेटला.

कॅप्टनकडून, हेन्री एकटाच डेव्हिडच्या मागावर गेल्याची खबर राजाला मिळताच, राजाने हेन्रीला देशद्रोही घोषित करून त्याला पकडून आणण्यासाठी सेनेच्या चार तुकड्या रवाना केल्या.  सेनेचे नेतृत्व करणार्‍या चारही कॅप्टनना हेन्रीबद्दल खूप सहानुभूती होती. राजाज्ञेचे पालन करण्यापूर्वी एडवर्डला सोडवून आणावे व मग हेन्रीला राजाच्या स्वाधीन करावे असा विचार करून त्यांनी डेव्हिड व रॉबर्टच्या विरुद्ध युद्धात हेन्रीला मदत केली. हेन्री एडवर्डला सोडवण्यात सफल झाला, त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला राज्यात घेऊन आला. राजा आपल्यावर रुष्ट आहे याची त्याला रुखरुख होती. त्यामुळे तो राजाला भेटायला गेला. तेव्हा राजा हेन्रीला म्हणाला की, "तू देशद्रोही आहेस. तू राजाज्ञेचे पालन केले नव्हतेस. तुला ह्या राज्यात राहण्याचा आता काहीही अधिकार राहिलेला नाही. तेव्हा तू राज्याबाहेर निघून जाणेच योग्य आहे. तुझ्या शोधार्थ मी सेनेच्या चार तुकड्या पाठवल्या होत्या. त्याही आता तुझ्यामुळे मृत्यूच्या दाढेत अडकल्या आहेत!"

राजाच्या ह्या निर्णयामुळे हेन्री क्षुब्ध झाला.  तो राजाला म्हणाला, "आपल्या आज्ञेनुसार मी हे राज्य सोडून निघून जात आहे. पण माझ्या मुलाचा ह्या सर्व प्रकारात काहीच दोष नाही. कृपया त्याला ह्या राज्यात राहू द्यावे व त्याच्या पालनाची जबाबदारी आपण स्वीकारावी." राजाने एडवर्डची जबाबदारी स्वीकारली. हेन्रीला देशद्रोही घोषित केले गेले असले, तरी त्याच्या मनात प्रथम आपल्या राज्याच्या सेनेच्या मदतीला धावून जाण्याचा निश्चय होताच. त्याप्रमाणे किल्ल्याबाहेर पडताच तो तडक युद्धभूमीत सेनेच्या मदतीसाठी गेला.

युद्धात हेन्रीने पराक्रमाची शर्थ केली. त्याच्या सफल नेतृत्वामुळे हरत आलेली बाजी जिंकून दिली. युद्धात डेव्हिड व रॉबर्ट दोघेही मारले गेले, पण प्रिन्स्टनने युद्ध जिंकण्याची आपली परंपरा कायम ठेवली.  प्रिन्स्टन अभेद्यच राहिला पण त्याचा सिंहासारखा लढवय्या सेनापती हेन्री धारातीर्थी पडला. चारही कॅप्टन युद्ध जिंकून परत आले पण सर्वांचेच चेहरे उतरलेले होते. राजाला हेन्रीच्या वीरमरणाची वार्ता समजली. त्याने लगेचच विजयोत्सव थांबवला. ढोल नगारे शांत झाले. राजाला अंतिम समयी हेन्रीवर रुष्ट होण्याचा पश्चाताप झाला. राजाने घोषणा केली की, “हेन्री तुझे हे बलिदान प्रिन्स्टन कायम लक्षात ठेवेल, मी हेन्रीला मरणोपरांत 'नाईटहूड' बहाल करतो. इथून पुढे लोक तुझ्या नावाचा उल्लेख 'सर हेन्री डिक्सन' असा करतील. आज मी घोषणा करतो की आज पासून तुझा एडवर्ड हा माझा पुत्र म्हणून मी त्याची जवाबदारी स्वीकारेन, प्रिन्स्टन राज्याचा तो वारस होईल. आज मी त्याला प्रिन्स्टनचा युवराज घोषित करतो, शिवाय हेही जाहीर करतो की ह्या किल्ल्याच्या मुख्यद्वाराजवळ सेनापती सर हेन्री डिक्सनचे एक भव्य स्मारक उभारण्यात येईल, जे त्याच्या शौर्याचे व युद्धकौशल्याचे प्रतीक असेल. ते पुढच्या पिढीला सांगेल की ह्याच वीरामुळे आजतागायत आपला प्रिन्स्टन फोर्ट अभेद्य राहिला." 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज