-
सौ. अर्चना टी. साठे
सुधाताई झोपाळ्यावर बसून विचार करत होत्या. घटना कशी घडली असेल याची मनात जुळवाजुळव करत होत्या. त्यांची प्रकृती कायम खराब व्हायला तीच घटना कारणीभूत ठरली होती.
अचानक
त्यांची प्रकृती बिघडली होती. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. फारच त्रास
व्हायला लागल्यामुळे त्यांनी सुधाकररावांना सांगितले. सरस्वतीबाई कायमच त्यांच्याच
घरी काम करायला राहत होती. नवरा, मुले बाळ, कोणीच नसल्याने ती घरातलीच झाली होती व तिला खूप काळजी वाटू लागली. मुलगा
व मुलगी दोघेही कॉलेजात गेली होती. बाईने लगेच नेहमीच्या फॅमिली डॉक्टरला बोलावून
आणले, त्यांनी मेडिकल कॉलेज (नागपूर) मध्ये अॅडमिट करायला सांगितले. खालीच त्यांचा घरात भाड्याने करुणा
देहनकर राहत होती. काय झाले कशाची धावपळ आहे म्हणून वर पाहायला आली. मुलगा व मुलगी
पण कॉलेजातून घरी आले. सगळे जण सुधाताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. बरे वाटल्यावर
तीन दिवसांनी डिस्चार्ज मिळून त्या घरी आल्या. किती बरे वाटले त्यांना घरी
आल्यावर. आल्याबरोबर त्यांनी मुलीला हातातल्या सोन्याच्या बांगड्या कपाटात ठेवायला
दिल्या. तिने दागिन्यांच्या पेटीवर ठेवून दिल्या व कपाट बंद केले. घरी आल्यावर
त्यांनी त्यांच्या आईला नाशिकला बरे नव्हते म्हणून कळवले. त्यांची आई देखील
लेकीच्या काळजीने लगेचच नागपूरला आली.
महिनाभराने
जरा बरे वाटू लागल्यावर माय-लेकी निवांतपणे गप्पा करत बसल्या. सुधाताईंना आठवण
झाली व त्यांनी आईला सांगितले की अग, तुझ्या
ओळखीच्या कमलाबाई आहेत न, त्यांनी माझ्या कडून ५०० रुपये
उसने मागितले व पैसे देईपर्यंत चांदीचे तुपाचे भांडे माझ्या जवळ ठेवून दिले आहे.
(त्या वेळी स्वस्ताई होती त्यामुळे सोन्या चांदीचा भाव ४०० रुपये तोळाच होता)
सुधाताईनी सुवर्णाला म्हणजेच आपल्या मुलीला हाक मारून अलमारीतले तुपाचे भांडे
आजीला दाखवायला सांगितले. तिने बरे म्हणून कपाट उघडले. “आई, कुठे
ठेवलेस तू?”
आई
म्हणाली, “अग, कपाटाच्या लॉकरच्या कप्प्यातच तर आहे.”
“अग
आई,
नाही गं, तुपाचे भांडे नाही इथे!!!”
“काSSSSय? नीट बघ!”
“अगं
बघितलं,
नाहीये तिथं.”
सुधाताईं
म्हणाल्या, “हॉस्पिटलमधून घरी आल्यावर माझ्या बांगड्या ठेवल्यास न?”
“हो!
मी दागिन्यांच्या डब्यावर ठेवून दिल्यात. त्या बांगड्या आहेत गं पण तुपाचे भांडे
नाही.”
सुधाताईंच्या
अंगात शक्ती नव्हती तरी त्या धडपडत उठल्या व कपाटातला दागिन्यांचा डबा त्यांनी
काढला. तर काय? दागिन्यांचा डबा तसाच ठेवलेला, पण आत
दागिने नाहीत, त्यांनी बाकीचे पण उपसले. हे काय चांदीची सुबक
परडी नाही, तीन चांदीच्या वाट्या गायब. त्यांना भोवळच आली. त्या
भीतीने थरथर कापू लागल्या, खूप मोठा धक्का बसला त्यांना.
कपाटात बाकी सर्व जसेच्या तसेच ठेवले होते.
सुवर्णा
त्यांची मुलगी सोन्यासारखीच सुंदर देखणी होती. त्याच दिवशी बिचारीने काळ्या साडीची
कॉलेजात जातांना घडी मोडली होती. ती तशीच अंगावर होती. सुधाकरराव पण आत आले,
मुलगा तुषार पण आला, सर्वांनीच शोधले. पण
कपाटातल्या वस्तू जागेवर जशाच्या तशा ठेवून सर्व दागिने (४० तोळे नक्की होतेच) लंपास
केले. कोणीतरी माहितगार व्यक्तीच असेल. सुधा ताईंना मोठाच धक्का बसला. त्यांची व
करुणाताईंची बऱ्यापैकी मैत्री होती. त्या बरेचदा वर यायच्या, तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या पुतणीचे त्यांनी डोहाळजेवण केले होते
तेव्हा सुधाताईनंकडून त्यांनी चांदीचे ताट, वाटी, तांब्या भांडे मागून नेले होते. सुधाताईंनी त्यांच्या समोरच कपाटातले
काढून त्यांना दिले होते.
सुधाताई
नाजूक, सुंदर आणि श्रीमंत होत्या, कुठेही लग्न कार्याला
जायचे असले की कायमच त्या दागिने घालून जायच्या. सहा पदरी चंद्रहार, गोठ, तोडे, पाटल्या, बांगड्या सर्व दागिने घालून जायच्या. त्यावेळी तशीच पद्धत होती.
करुणाताईंचे डोळे त्यांचे दागिने पाहून फाटून जायचे. सुधाताई मुळातच सुंदर,
दागिने घालून आणखी तेज यायचे.
सुधाताईंनी
पुन्हा घटना जुळवायला सुरुवात केली. त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले तेव्हा
त्यांच्याबरोबर त्यांची बाई, मुलगा, मुलगी व सुधाकरराव सगळे आले होते. करुणाताई तिथेच घरी होत्या. भांडी
घासायची राहिली होती, तुषार म्हणाला की आम्ही कोणी घरी
आल्यावर बाईकडून भांडी घासून घेऊ. करुणाताई म्हणाल्या, “तुम्ही
आईची काळजी घ्या, मी माझ्या बाईकडून भांडी घासून घेईन! फक्त
मधले
जिन्याचे दार
उघडे ठेवा.” तुषार बरं म्हणाला, त्याने जिन्याचे दार
उघडे ठेवले. जाताना कपाटातूनच पैसे काढल्यामुळे सर्व वस्तू मौजूद होत्या हे त्याने
पाहिले होते. रात्री, तुषार सुवर्णा व बाई घरी आले, तर भांडी घासत असलेली दिसत होती. कोणीच विशेष लक्ष दिले नाही. पुन्हा
सकाळी मुलगा व बाई हॉस्पिटलला गेले. पण सुवर्णा घरीच होती, थोड्याच
वेळात सुधाकरराव पण घरी आले, तिसऱ्या दिवशी सुधाताईंना
हॉस्पिटल मधून घरी आणले, घरी आल्यावर कुणी ना कुणी असायचेच.
म्हणजे घटना घडली ती ह्या तीन दिवसातच. चोर असता तर सर्व उचकापाचक करून गेला असता.
सर्व सामान जसेच्या तसे ठेवले नसते. नंतर करुणाताई सुधाताईंची विचारपूस
करायलासुद्धा आल्या नाहीत पण त्यावेळी हे कुणाच्या लक्षातच आले नाहीं. सुधाताईंची
आई आल्यावर तुपाचे भांडे दाखवायला गेल्या म्हणून चोरी झाली हे उघडकीस आले. परंतु
ह्या घटनेला दोन महिने उलटून गेले होते. नंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात
आली, पोलीस घरी आले, प्रथम तर
नेहमीप्रमाणे पहिला संशय सरस्वती व दुसऱ्या काम करणाऱ्या मोलकरणीवर घेतला पण
पोलीसांच्या लक्षात आले, की मोलकरणी चोर नाहीत. त्यांनी आणखी
कोणावर संशय आहे का म्हणून विचारले. सुधाकररावांनी घटनेची सर्व माहिती दिली, पण
करुणाताईंवर संशय घेण्याची हिंमत झाली नाही. प्रतिष्ठित बाईवर संशय कसा काय
घ्यायचा? ते चुपचापच राहिले.
करुणाताईंच्या
मुलाचे लग्न ठरले होते, मुलाच्या बायकोच्या
अंगावर भरपूर सोने घातलेले दिसले, करुणाताईनी स्वतःसाठी पण
चांगले सोन्याचे दागिने करून घेतलेले दिसले. अचानक इतका पैसा कुठून आला असेल?
पुतणीच्या डोहाळजेवणासाठी चांदीची भांडी मागून नेली होती. मग इतके पैसे कुठून आले?
नंतर त्यांनी महिन्याभरातच नवऱ्याला दूर गोव्याला बदली करून घ्यायला लावली व
गेलेसुद्धा.
त्यांच्यावर
संशय होता तो सगळ्यांच्या मनात पक्का झाला. पण वेळ निघून गेली होती,
त्याच वेळी ठामपणे संशय
घेतला असता तर त्यांची चोरी उघडकीला आली असती. त्या बदलून गेल्यानंतर आणखी काही
ओळखीच्या बायकांनी व करुणाताईंच्या नवर्याच्या ऑफिसमधल्या लोकांनी ती बाई
(करुणाताई) हाताळ होती. त्यामुळे त्यांना आम्ही घरी कधीच बोलवत नव्हतो म्हणून
सांगितले. वस्तू आवडली की त्यांना चोरी करायची सवय होती. त्यांचे यजमान सज्जन होते,
त्यांच्या लक्षात आले की ते वस्तू त्या व्यक्तीला वापस करून त्यांची
माफी मागायचे. पण हा खूपच मोठा डल्ला होता, बहुदा
घरातल्यांनाही मोह आवरला नसेल!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा