मधमाशीचा वेल

 

-     नीलम कर्ले


आपल्या सोसायटीच्या बागेत या वेळी लॉकडाऊनमध्ये भर उन्हाळ्यात सगळी झाडे पाण्याअभावी मलूल दिसत होती. त्याच दरम्यान तिथे एक छोटासा वेल जन्माला आला. सुदैवाने सोसायटीच्या  माळ्याला सुट्टी असल्याकारणने हे तण 😊 उपटले गेले नव्हते. आश्चर्य म्हणजे एवढ्या दुष्काळातही हा वेल झपाट्याने वाढला, आणि महिनाभरातच असा फुलांनी बहरला.


एखाद्या लोलकासारखी दिसणारी ह्याची फिकट पिवळी फुलं कुठल्याही शोभिवंत झाडाच्या फुलांपेक्षा नक्कीच कमी नाहीत. याच्या फुलांचा मंद गोड वास वातावरणात पसरला होता. सर्वत्र छोट्या, मध्यम आणि मोठ्या अशा तीन प्रकारच्या मधमाश्या मध पिण्यात गुंग होत्या. आपल्या सोसायटीच्या बागेत मधमाश्यांची एवढी झुंबड मी फक्त आपट्याच्या झाडावर पाहिलेली आहे.  म्हणूनच याला मधमाशीचा वेल हे नावच समर्पक आहे 😊. मधमाशीचे अवयव, प्रकार जर मुलांना प्रत्यक्ष दाखवायचे असतील तर हा मधमाशीचा वेल मुलांना जरूर दाखवा.

    याचं मराठी नाव उतरण किंवा उतरंड. याच्या पानांची रचना मडक्यांच्या उतरंडीप्रमाणे असल्यामुळे हे नाव पडलं असावं. मराठीमध्ये मेंढा दुधी असं देखील म्हणतात. कदाचित त्याचे पान तोडल्यावर जो दुधट चीक निघतो त्यामुळे हे समर्पक नाव पडले असावे. रस्त्याच्या कडेलाही वाढणारा म्हणजे जास्त काळजी घ्यायची गरज नसलेला हा वेल आहे.

माझ्या मुलीला हा वेल दाखवायला मी मुद्दामच घेऊन गेले होते, तर तिनेही अशा बर्‍याच गोष्टी मला दाखवल्या, ज्या मलाही दिसल्या नसत्या. लहान मुलांचं निरीक्षण आपल्यापेक्षा नक्कीच चांगलं असत हे मला कळून चुकलं.

उतरंडीच्या देठावर अनेक अतिसूक्ष्म अ‍ॅफिड पर्णरस शोषत बसले होते. एक छोटासा खादाड सुरवंट त्याचं काम करत होता... स्थानिक वेल असेल तर एका छोट्याश्या वेलावर सुध्दा किती जैववैविध्य आढळते! आता ह्या वेलाचा विस्तार खूपच वाढला आहे. कर्टन म्हणून लावायला हा वेल बेस्ट आहे!

लॉकडाऊननंतर एक पंधरवड्याने खाली उतरले, उतरंडीच्या वेलाला फळे आली आहेत का ते बघायला. ती अखेरीस नजरेस पडली - कावळीच्या फळांसारखी देठाच्या दोन्ही बाजूला चिकटलेली उतरंडीची फळं! काटेरी वाटली तरी हिचे काटे खूप मऊ लागले हाताला.

ही फळे पिकली की उकलल्यावर हिच्या म्हातार्‍या वार्‍यावर उडत बीजप्रसाराचं काम करतात. वेल फांदी लावूनही येतो असा काही ठिकाणी उल्लेख आहे. जरी रस्त्याच्या कडेला येणारे हे तण असले तरी आयुर्वेदामध्ये ह्यापासून बनणार्‍या अनेक गुणकारी औषधांचा उल्लेख आहे.


सप्टेंबरच्या मध्यावर ह्या वेलाची बोंडं फुटून बाहेर पडलेल्या अनेक म्हातार्‍या उडण्यासाठी तयार झाल्या. पुढच्या मोसमात कुठे हा वेल जर रुजून आला, तर नक्की ओळखूया आणि निसर्गत: हे देशी झाड येत असेल आणि आपल्या सोसायटीच्या बांधकामाला त्याचा काही अपाय नसेल तर येऊ देऊया.

काही महिन्यांच्या खंडानंतर जेव्हा म्हातोबा टेकडीवर गेलो, तेव्हा म्हातोबा मंदिराच्या अगदी पायथ्याशी एक फूल वार्‍याबरोबर उडून आले, आणि वर बघितलं तेंव्हा हाच वेल दिसला. साम्राज्यला हा वेलरूपी प्रसाद म्हातोबानेच दिलाय ह्याची खात्री पटली!

‘साम्राज्य’च्या निसर्गप्रेमींनी एक ग्रुप बनवलाय ‘साम्राज्य नेचर ग्रुप’ म्हणून. ह्या ग्रुपमधील निसर्गप्रेमींनी म्हातोबावर दिसणार्‍या निसर्गावर लेख लिहायला हल्लीच सुरुवात केलीय. तुम्हाला ह्या सर्व लेखांचा आनंद घ्यायचा असेल तर त्याची लिंक इथे देत आहे:

https://mhatobatekdi.blogspot.com/

उतरंड:

Common name: Pergularia

मराठी नाव : मेंढा दुधी, उतरण, उतरंड

वेलाविषयी अधिक महितीसाठी ह्या लिंक्स :

https://en.wikipedia.org/wiki/Pergularia

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Pergularia.html


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज