मुलगी

 

-      माया जाधव

 

शेजारच्या काकू मला त्यांच्या दारामध्ये उभ्या दिसल्या. पण आज त्यांचा चेहरा मला नाराज दिसत होता. नेहमी हसतमुख आनंदी असणाऱ्या काकूंचा असा चेहरा पाहून मी न राहवून विचारले की, "काकू, काय झाले? तब्येत ठीक आहे ना? चेहरा उतरलेला दिसतोय तुमचा?" तेवढ्यात पाठीमागून काका आले. ते म्हणाले, "काही नाही गं, आज सकाळी प्रियाची (त्यांची सून) डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगी झाली. प्रियाला दुसरी मुलगी झाली म्हणून ती जरा नाराज आहे." मला एक क्षण आश्चर्यच वाटले, इतके शिकलेले लोक, दुसरी पण नात झाली म्हणून इतकी नाराजी? का कोणास ठाऊक मी घरात आले आणि विचार करू लागले.

मला जेव्हा मुलगी झाली त्यावेळी माझ्या मुलीचे स्वागत खूप आनंदाने व उत्साहाने झाले होते. मुळात आम्हा दोघांनाही मुलीची प्रचंड आवड. का कोणास ठाऊक, पण मला खात्री होती की मला मुलगीच होणार आणि मुलीचे नाव पण डिलिव्हरीच्या आधीच ठरवून ठेवले होते 'शिवानी'. आमच्या आयुष्यात तिच्या जन्मामुळे नवे चैतन्य निर्माण झाले होते. आम्ही दोघेही नोकरी करणारे असल्याने व माझी प्रेग्नन्सीमध्ये रजा झालेली असल्यामुळे मला लवकर ऑफिस जॉइन करावे लागणार होते. त्यामुळे तिच्या सोबतचा अडीच ते तीन महिन्यांचा वेळ कसा गेला हे लक्षातच आले नाही. माझी ऑफिस जॉइन करण्याची वेळ आली. घरी कोणीही तिला सांभाळायला नसल्यामुळे तिच्यासाठी मधल्या कालावधीत चांगले पाळणाघर शोधून काढले. तिला तिथे ठेवून आमचे ऑफिस रुटीन सुरु झाले. सुरुवातीला तिला तिथे सोडून निघताना प्रचंड यातना व्हायच्या, वाईट वाटायचे पण पर्याय नव्हता. पाळणाघरामुळे ती खूप स्वावलंबी व समजूतदार झाली. कधीकधी तिला पाळणाघरात जायचा मूड नसायचा. ती आशाळभूतपणे आमच्याकडे पाहायची. त्यामुळे तिचा मूड बघून आम्ही दोघांपैकी एक सुट्टी घ्यायचो आणि तिच्या सोबतच घरी राहायचो. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असायचा. तिचा बाबा जेव्हा तिला फिरायला घेऊन जायचा, तेव्हा तो म्हणायचा, "ज्या बोटाला पकडून माझी मुलगी चालते, ते बोट पाहून माझ्या हाताची बाकीची बोटे जळतात!"

ती जशी शाळेत जायला लागली तशी दर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघेही एक महिना सुट्टी काढायचो आणि तिला मस्त फिरवून आणायचो. संपूर्ण वेळ तिच्यासोबत घालवायचो. ती खूपच समजूतदार असल्यामुळे तिला तेवढेही पुरेसे असायचे. पाळणाघराचा एखादा दिवस कंटाळा आला आणि आम्हा दोघांनाही सुट्टी काढणे शक्य नसायचे तेव्हा माझी मोठी बहीण तिला तिच्याकडे घेऊन जायची. दीदी आणि दादा सोबत तिचा दिवस मस्त जायचा.



जेव्हा शिवानीची शाळेत अ‍ॅडमिशन झाली तेव्हापासून आम्ही तिच्याकडे बारीक लक्ष देऊन होतो. तिला अभ्यासाची खूप आवड नाही हे हळूहळू आमच्या लक्षात येऊ लागले. आम्हाला हे तसे शॉकिंग होते, पण बाकी ॲक्टिविटीजमध्ये ती अगदी पुढे असायची हे पण आम्ही पाहिले. डान्स, नाट्यछटा, नाटक तिला खूप आवडायचे. तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवले होते. आम्हाला तिची आवड लक्षात आली, पण आम्ही दहावी व बारावी होईपर्यंत तिचे लक्ष डायव्हर्ट करायचे नाही असे ठरवले होते. जेव्हा तिने बारावीची परीक्षा दिली तेव्हा आम्ही तिच्या भविष्याचा विचार करण्यास सुरुवात केली. तिच्या आवडीच्या क्षेत्रात तिला करिअर करू द्यायचे असे ठरवले. त्यापूर्वी आम्ही श्वेता जुमानी (अंकशास्त्र तज्ञ) यांची भेट घेतली आणि ती कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकेल याची खात्री करुन घेतली. आम्हाला एकच मुलगी असल्यामुळे केवळ आंधळेपणाने सपोर्ट करून आपला निर्णय चुकीचा ठरायला नको असे आम्हास वाटले.




बारावीनंतर करिअरसाठी डॉक्टर, इंजिनिअर, वकिल हेच पर्याय नसून स्वतःचे कौशल्य वापरून सुद्धा एखादी व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकते. आम्ही तिला एकच गोष्ट सांगून ठेवली होती - यश मिळवण्याचा प्रयत्न सातत्याने कर. आमची अशी अपेक्षा नाही की आम्ही म्हातारे झाल्यावर तू आम्हाला सांभाळावेस, आम्हीही तुला जन्मभर पोसणार नाही. तेव्हा तुला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे ते तू मन लावून कर आणि त्यामध्ये यशस्वी हो. अशाप्रकारे आमच्याकडून तिला छान सपोर्ट मिळाला. बारावीच्या परीक्षेनंतर तिला आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी दक्षिण कोरियाला जायची संधी मिळाली. पुणे महानगर पालिकेकडून पण १५ ऑगस्ट रोजी इतर कलाकारांसोबत तिचा सत्कार करण्यात आला. आम्ही दोघांनी तिला सपोर्ट केला पण एक गोष्ट तिला ठामपणे सांगितली होती, की पदवी घेणे तुझ्यासाठी बंधनकारक असणार आहे. तिने ते मान्य केले.

त्यानंतर शिवानीची खऱ्या अर्थाने करियरला सुरुवात झाली. ती 'मिस गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र' (Miss Gorgeous Queen of Maharashtra) झाली. त्यांनतर तिला 'मिस इंटरनॅशनल पॉप्युलर' (Miss International Popular) अवॉर्ड मिळाले. गेल्या वर्षी तिला अनेक मानाच्या गणपतींची आरती करण्याचा मान मिळाला. आपला तिच्या बाबतीतला निर्णय चुकला नाही याचे आम्हाला समाधान वाटले व तिच्याबद्दल खूप अभिमान वाटायला लागला. त्यानंतर तिला दुबई इथे एका वेडिंग प्लॅनर ब्रँडसाठी मॉडेलिंग करण्याची संधी मिळाली. अनेक लोकांनी याबाबत उलटसुलट चर्चा केल्या. व या क्षेत्राबद्दल शंका उपस्थित केल्या. परंतु या क्षेत्रामध्ये आम्हाला खूप चांगली माणसे भेटत गेली. त्यामुळे आम्ही दोघेही तिच्यामागे खंबीरपणे उभे होतो. माझ्या सासू-सासऱ्यांनी देखील या गोष्टींसाठी कधी विरोध केला नाही. विशेष सांगायचे तर आमच्या घराण्यात मुलगा कोणालाच नाही. माझ्या आईवडिलांना आम्ही दोघी मुली, माझ्या दिरांना दोन मुली व माझ्या चुलत सासूबाईंना देखील दोन मुली. म्हणजे आमच्या वंशाचे दिवे हे आमच्या मुलीच आहेत व आमच्या मुलीच आमचे नाव पुढे नेणार आहेत.

मला या सगळ्यातून एकाच सांगावेसे वाटते की मुलगी झाली म्हणून कोणी नाराज होऊ नये. तिला तिच्या मनाप्रमाणे उमलू द्यावे, उडू द्यावे. कारण ‘मोगऱ्याचे फूल ओंजळीत घेतले की त्याचा सुगंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो. तसेच काहीसे मुलीच्या बाबतीत आहे.' आजही या क्षेत्रात मुलींना पाठवायला पालक तयार नसतात, म्हणजे त्यांचा विश्वासच नसतो. घरातून पाठिंबा नसल्यामुळे आयुष्यात मुली फसतात. आपल्या मुलींमधील स्पार्क / आवड पालकांनी ओळखली पाहिजे व त्यासाठी तिला सपोर्ट केले पाहिजे. आमची मुलगी आमच्यासाठी लकी चार्म आहे. माझी लेक माझी मैत्रीण जास्त आहे. त्यामुळेच मी नेहमी म्हणते –

'I asked God for a best friend, He sent me my daughter'.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज