अशी असायची पन्नास वर्षांपूर्वी लग्नाची तयारी...


-      मनोरमा परांडेकर

माझं लग्न ७० साली ठरलं. त्यावेळी लग्नाचं कंत्राट द्यायची आणि आपण स्वस्थ बसण्याची मुभा नव्हती. भरलेले धान्य निवडायला, पापड-कुरडया वगैरे करायला माझ्या धाकट्या बहिणीच्या मैत्रिणी आईच्या मदतीला येत. (माझ्या मैत्रिणी लग्न होऊन सासरी गेल्या होत्या ना ☺️☺️☺️) नात्याने दूरच्या पण प्रेमाने जवळच्या अशा मावश्या, आत्या रूखवत करायला सरसावल्या होत्या. पिस्त्याच्या कवचाच्या फ्रेम, इंजेक्शनच्या छोट्या बाटल्यांचे देऊळ, बटनांनी भरतकाम केलेले ससे, सिगारेटच्या पाकिटांचे प्राणी, मोत्याचे नारळ-सुपारी, लोकरीची हिरवी पाने, झेंडूची पिवळी फुले यांचे तोरण अशा कितीतरी वस्तू रूखवतासाठी तयार झाल्या. मुंबईला जाऊन नव्याने संसार उभारायचा होता म्हणून मी सर्वांना सांगितले होते की मला शोभेच्या वस्तू भेट देऊ नका, संसारोपयोगी भांडीकुंडी द्या. संसार मांडताना खरंच जवळजवळ सर्व भांडी मला भेट मिळालेली होती. तवा, कढई, पोळपाट-लाटणं एवढंच विकत घ्यावं लागलं. अजूनही त्यातली कितीतरी भांडी, चहा-साखरेचे डबे, मिसळणाचा डबा, झारे, डाव, पळ्या, इतकंच काय काचेच्या लेमन सेट मधला जग, टी सेटमधली किटली असं काचेचं सामान गेली ५० वर्षं मी प्रेमाने वापरते आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज