संपादकीय

      जानेवारी - फेब्रुवारी मध्ये वॄत्तपत्राच्या कोपर्‍यातल्या छोट्या बातमीत दिसणारा ‘करोना’ मार्चमध्ये पहिल्या पानावर पोहोचला, आणि थेट कुठेतरी वुहान – इटली – अमेरिका नाही तर थेट पुण्यातही अवतरला. एक दिवसाचा बंद झाला, उत्साहाने थाळ्या वाजवून, दिवे लावून झाले, आणि हळूहळू सगळ्यांच्याच लक्षात आलं की हा दोन चार दिवसात निघणारा पाहुणा नाही. आपल्या ‘बळवंतपुरम साम्राज्य’मध्ये तर भाजी, किराणा, पिठं, औषधं सगळं घरपोच मिळण्याची व्यवस्था झाली – अगदी एटीएमसुद्धा सोसायटीच्या आवारात अवतरलं आणि सोसायटीची दारं बंद रहायला लागली. सगळ्याच रहिवाश्यांनीही चांगली साथ दिली आणि करोना बाहेर ठेवण्यात आपण यशस्वी झालो. शाळा - अभ्यास घरातच, ऑफिस घरातच, घरकाम सगळं घरच्या घरी, व्यायाम घरच्या घरी असं एक वेगळंच आयुष्य आपण जगायला शिकलो - अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळेच. १८९६च्या प्लेगच्या वेळचा कायदा लागू करून २०२०चे लॉकडाऊनचे दिवस चालले होते. पण त्या आणि आजच्या वातावरणात एक मोठा फरक होता. तेव्हा लोक गावाबाहेर झोपड्यांमध्ये राहायचे. आपण आपल्या घराच्या सुरक्षिततेत आहोत, मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडलेलेही आहोत.

    ‘साम्राज्य’मध्ये आपण दहीहंडीपासून ते होळीपर्यंत सगळेच सण उत्साहात एकत्र साजरे करत असतो. ज्येष्ठ नागरिक, बालगोकुलम, सांस्कृतिक मंडळ, योगासनं, रनिंग, सायकलिंग करणारी मंडळी यांचे नेहमी काही ना काही उपक्रम चालू असतात. एकत्र भेटायचं नाही म्हटल्यावर हे सगळंच टाळणं आलं. ‘दिवाळी पहाट’ नाही, ‘जल्लोश’ची तयारी नाही अशी दिवाळी तर अगदीच सुनीसुनी वाटणार. मग आपण डिजिटल दिवाळी अंक बनवूया का? आपल्याकडे इतके कलाकार आहेत, लेखकही असतीलच. त्यांना शोधूया. ‘जल्लोश’प्रमाणेच इथेही फक्त जुनेजाणतेच नाही, तर नव्या कलाकारांनाही संधी मिळेल असं पाहूया. प्रत्यक्ष नाही, तरी डिजिटल माध्यमातून तर भेटूया. अशा विचाराने हा अंक करायचं ठरलं. कल्याणीशी बोलले तर तिच्या मनातही ही कल्पना होती. अंक करायचा म्हटला, तरी आमचं लेखन ब्लॉगपुरतं. लेखक, संपादक, प्रकाशकांना तोंड देण्याचा अनुभव शून्य. नाईक काकांना पत्रकारितेतला अनुभव मोठा. लागेल ती सगळी मदत आणि मार्गदर्शन करायला ते लगेच तयार झाले आणि आम्ही ती मदत घेतलीच. संपादक मंडळात नाईक काकांचा समावेश झाल्याने हा नुसत्या हौश्या-नवश्यांचा प्रयत्न ठरणार नाही याची खात्री झाली.
अंकासाठी लेखन किंवा अन्य काही मदत करू शकणार्‍यांनी नावं नोंदवा म्हणून पहिला मेसेज पाठवला आणि अंजली (डॉ. अंजली मरकळे) सापडली. तिला डिजिटल अंकाच्या संपादनाचा भरपूर अनुभव असल्यामुळे कधी, काय, कसं करावं लागेल, काय अडचणी येऊ शकतात याच्या टिप्स अगदी सुरुवातीपासूनच मिळाल्या. अमृताला (अमृता क्षीरसागर) साहित्याची किती जाण आणि आवड आहे हे माहित असल्यामुळे फारसा चॉईस न देता तिला मदतीला ओढलंच.

अंकाला हातभार लावणार्‍यांमध्ये आवर्जून कौतुक करायला हवं ते कौस्तुभ सातपुतेचं. कौस्तुभ सुंदर चित्रं काढतो. त्याला मुखपृष्ठासाठी चित्र, लोगो करून देशील का म्हणून कल्याणीने विचारलं, आणि तो लगेच कामाला लागला. आवड म्हणून चित्रं काढणं वेगळं, आणि असं कुणी दिलेल्या कल्पनेवर काम करणं वेगळं. तो अजून शिकत असला तरी त्याचं काम बघून आपण खरोखर एका प्रोफेशनल आर्टिस्टकडून काम घेतोय असंच वाटलं. आपल्या इ-अंकाची सुरुवातच कौस्तुभने एकदम खास करून दिली. बालविभागातल्या वैष्णवीच्या कवितेसाठीही त्याने एक मस्त चित्र काढून दिलं.

आदिती भोसलेने बाल विभागाचं चित्र आणि कॄष्णाचं चित्र दिलं. सारिका कोकर्डेकरने बालविभागासाठी काही कोडी आणि ‘गुंगारा’ कथेसाठी चित्र काढून दिलं. आपले बहुतेक सगळे बाललेखक चित्रकारही आहेत. त्यामुळे आपापल्या लेखनासाठी त्यांनी स्वतःच सुंदर चित्रं काढली. आर्यन नाईकच्या गोष्टीसाठी अन्वय कुलकर्णीने मस्त चित्र काढून दिलं. अमेय कुलकर्णी यांच्या “The Fallen Knight” या कथेचं सौ. सई नितीन कुलकर्णी यांनी अंकासाठी भाषांतर केलं, त्या कथेसाठीचं चित्र सौ. पूर्वा अमेय कुलकर्णी यांनी काढून दिलं. सौ. सीमा पेशवाने ‘देव तारी त्याला कोण मारी!’ या कथेसाठी चित्र काढलं. ‘असेही एक सीमोल्लंघन’ या नितीन कुलकर्णी काकांच्या ऑडिओ कथेसाठी निनाद नितीन कुलकर्णी यांनी चित्र काढलंय. वैशाली जोशी नगरकरने वेळ अगदी थोडा असताना ‘श्रावण मासी’ या कवितेसाठी आणि ‘कीर्तन’ कथेसाठीही चित्र काढून दिलं. याव्यतिरिक्त सर्व चित्रं आणि फोटो हे लेखकांनी स्वतः दिलेले आहेत.

मराठी डिजिटल मुद्रितशोधन (म्हणजे आपलं प्रूफरिडिंग) करायला जरा अवघड जातं, कारण मराठी व्याकरणाची, मुद्रितशोधनाची जाण आणि कॉम्प्युटरवर हे करता येणं या दोन्ही गोष्टी एकत्र मिळणं जरा विरळाच. त्यात वर्ड्च्या ‘स्पेलचेक’ची सवय झाल्यावर मराठीसाठी स्पेलचेक नसल्यामुळे अजून पंचाईत होते. आणि खरं सांगायचं, तर सध्या शुद्धलेखनाविषयी सगळीकडेच इतकी बेपर्वाई दिसते की इतकं बारकाईने नीट वाचणारेच दुर्मीळ झालेत. पण निशाताईंनी (निशा किर्लोस्कर) मी मुद्रितशोधन करून देईन म्हणून सांगितलं, सीमा पेशवानेही मुद्रितशोधनाची जबाबदारी उचलली. त्यामुळे अगदी हायसं वाटलं.

आपण डिजिटल अंक करतो आहोत, तर या माध्यमातल्या शक्यतांचा विचार करून छोटा का होईना, ऑडिओ विभाग करावा असा आमचा विचार होता. या विभागासाठी वैशाली नगरकर आणि नितीन कुलकर्णी काकांनी आपापल्या कथांचं सुंदर अभिवाचन उपलब्ध करून दिलं.

आपल्या ‘साम्राज्य’मधल्या वेगळ्या वाटा चोखाळणार्‍या काही जणांच्या मुलाखती घ्याव्यात अशी आमची इच्छा होती. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ म्हणतात तसं आपले शेजारी किती काय काय करत असतात हे या अंकाच्या निमित्ताने समजलं.त्याप्रमाणे गार्गी गुजरने पळसापुरे काकांची मुलाखत घेऊन त्यांची चित्रकलेची रंगभरी दुनिया आपल्यापुढे मांडली. मणिपूरमधील दुर्गम भागातल्या शाळेमध्ये शिकवण्याच्या सानिया किर्लोस्करच्या अनुभवांविषयी उज्ज्वला वाघने गप्पा मारल्या. अंजलीताई मालकर यांचा शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रातला प्रवास निशाताई किर्लोस्करांनी उलगडून सांगितला. मुलाखतीचं ध्वनिमुद्रण करणं, ते लिहून काढणं, पुन्हा दाखवून खात्री करून घेणं, काही बदल असतील तर त्याप्रमाणे दुरुस्ती – असं सगळं दहावीतल्या गार्गीनेसुद्धा अगदी नेटकेपणानं केलं, तिचा इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो.

अंकाच्या सजावटीसाठी काही दिवाळीच्या रांगोळ्या हव्या होत्या. स्मिता विजापूर, भाग्यज्योती उदगिरी, माधवी कुलकर्णी यांनी त्यांच्या सुंदर रांगोळ्यांचे फोटो यासाठी उपलब्ध करून दिले. मनोरमा परांडेकर काकूंनी त्यांच्या आठवणींचे काही किस्से पाठवले होते, त्यांनीही काही चौकटी सजल्या. काहीही मदत लागली तर सांग म्हणून प्रीती मौक्तिकने सांगितलं होतं. तिनेही असे किस्से पुरवले.

‘साम्राज्य’चा हा पहिलाच डिजिटल दिवाळी अंक. संपादकही नवखेच. कसा प्रतिसाद येईल, पुरेसं लेखन मिळेल ना अशी थोडी शंका होती सुरुवातीला. पण आपल्या या पहिल्याच प्रयत्नाला लेखकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच लिहिणारे ते अनुभवी लेखक असे सगळ्याच श्रेणींमधले, सगळ्याच वयोगटातले लिहिते झाले, त्यामुळे आपला अंक बहुरंगी होऊ शकला. येणार्‍या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा अंक तुमच्यापुढे ठेवताना खूप समाधान वाटतंय.

अंकावर तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया या सगळ्या धडपडीमध्ये सहभागी असणार्‍या सगळ्यांचाच हुरूप वाढवतील. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया samrajyaeank@gmail.com या मेल आयडीवर जरूर कळवा.


 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज