हॅपी पेरेंटिंग

 

-      विभावरी इनामदार

सध्याच्या आधुनिक काळात पालकांना आपल्या पालकत्वाच्या शैलीमध्ये थोडा बदल करावा लागतो. तर मंडळी, हा किस्सा आहे साधारण दोन वर्षांपूर्वीचा; माझा आणि माझ्या लेकीचा. मला ऑफ़िसच्या कामासाठी परदेशात एका कॉन्फरन्ससाठी जायचं होतं. रोजच्या कामाबरोबर पेपर प्रेझेंटेशनची तयारी काही दिवस अगोदर जोरात चालू होती त्यात मुलीकडे म्हणजे सानूकड़े दुर्लक्ष होत होते आणि खूप अपराधीपणाची भावना मला सतावत होती. शेवटच्या मिनिटाची खरेदी, पॅकिंग आणि प्रेझेंटेशनची तयारी याने जरा डोकं भणभणत होतं. त्यात सानूने एक डायलॉग टाकला: “आई, तू मला का गं जातेस सोडून ऑफिसच्या कामासाठी? संध्याआज्जी (माझी आई) जायची का तुला सोडून? मी खरं खरं उत्तर दिलं, “नाही गं, आज्जी मला सोडून कधीच जात नव्हती.” सानू: “मग तू का जातेस?”

मी निःशब्द. 😔😔

माझ्या पोटात कालवाकालव झाली, पण मी निर्णय घेतला: not going on any more guilt trips at this moment. I need to act smart. मग थोडा विचार करून उत्तर दिलं, “अगं, मी कुठे तुझ्यासारखी एवढी शहाणी आणि गोड मुलगी होते लहानपणी? तू तर खूप लहान असल्यापासूनच समंजस आहेस. मला कितीतरी वेळा ऑफ़िसमधून घरी यायला उशीर होतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जावं लागतं. तू राहतेस नेहमी, अगदी तीन ३ वर्षांची असल्यापासून दोन्ही आजी - आजोबांबरोबर, अगदी न रडता, न त्रास देता. मी नव्ह्ते ना तशी. मी खूप रडकी होते, सारखी ‘आई, आई’ करायचे म्हणून संध्याआजी नाही जाऊ शकली कुठे.” 

हे ऐकल्यावर तिचा आविर्भावच बदलला. एकदम डोळ्यात चमक आली. आपण अतिशय जबाबदार आणि शहाणी मुलगी आहोत असं वाटू लागलं,😊😊 आणि मग पटापटा मला मदत करू लागली. “हे घेतलं का? ते घेतलंस का?” वगैरे. आता तिचा भाव असा होता, की माझी कॉन्फरन्सची तयारी ही तिचीच जबाबदारी आहे.

 हे बघून माझी मलाच शाबासकी द्यावीशी वाटली, पाठ थोपटाविशी वाटली. घरातून निघताना जरा डोळे पाणवले, तर म्हणाली, “अग आई, एवढी मोठी झालीस तरी कशी अजून रडकी? कधी शहाणी होणारेस?” हे ऐकून मला हसू आलं आणि मी आनंदाने गाडीत बसून एअरपोर्टला निघाले !  😊😊

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज