कथा- स्व. शैला र. दिवाकर.
कथन- रत्नाकर दिवाकर.
नमस्कार,
ही
कथा माझ्या पत्नीची, सौ.शैला देशपांडे - दिवाकर
हिची आहे. मी फक्त शब्दांकन केले आहे.
दहा-
बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, मी कुटुंबाबरोबर गावी
गेलो होतो.माझं गांव कोरेगांवच्या थोडेसे पुढे. एक दिवस सौ. शैला म्हणाली, “बरेच दिवस आपण गोंदवल्याला गेलेलो नाही. इथून जवळच तर आहे,जाऊ या का?” गोंदवले तिचे श्रध्दास्थान. कारण महाराजांची त्यांच्या कुटुंबावर खूप कृपा. तिच्या आजीची म्हणजे
वडिलांच्या आईची गोंदवल्याच्या महाराजांवर खूप भक्ती. आजोबा सोन्याबापू देशपांडे
गोमेवाडी (आटपाडी) पंचक्रोशीतील प्रसिद्ध सावकार. अगदी ग. दि. माडगूळकरांनीसुद्धा
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिलेले आहे,
आजीची
गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाची तळमळ, तर आजोबांना
वेळ काढता येत नव्हता. आजीची अशीच तगमग चालली होती. मग आजीने ठरवलं, महाराजांचे दर्शन होईपर्यंत जेवायचंच नाही. नुसत्या पाण्यावर तिचा उपवास!
झालं! दोन दिवस झाले, चार दिवस झाले, आजोबांच्या
मागे टुमणं लावलं होतं, गोंदवल्याला जाऊ या! पण त्यांचं
उत्तर, “जाऊ या नंतर!” असं चाललं होतं. सात दिवस झाले,
आणि आठव्या दिवशी अचानक दुपारी खुद्द गोंदवलेकर महाराज
सोन्याबापूंच्या दारात उभे.
महाराजांना
पाहून सोन्याबापू गडबडले. म्हणाले, “महाराज, इकडे
कुठे?” महाराज म्हणाले, “भल्या गृहस्था!
घरात तुझी बायको उपाशी आहे, ते माहिती आहे का?” बापू गडबडले. म्हणाले, “महाराज, महाराज!! क्षमा करा. आधी आंत या!! बसा!
गूळ-पाणी घ्या, मग सांगतो.” महाराज म्हणाले, “अगोदर तुझ्या बायकोला बोलाव!” आजी बाहेर आली, उंबर्यातूनच
खुद्द महाराजांना पाहून तिला खूप आश्चर्य, आनंद झाला, तिनं
तिथंच साष्टांग दंडवत घातला आणि महाराजांचे पाय तिच्या
अश्रूंनी ओले ओले झाले. महाराजांनी आपल्या जवळचा शिर्याचा प्रसाद तिला दिला
म्हणाले, “अगोदर खाऊन घ्या.” बापूंना म्हणाले, “बापू! ही माझ्या दर्शनासाठी आठ दिवस उपवास करते आहे आणि तुला तिला
गोंदावल्याला आणायला वेळ नाही? तिकडं अन्नछत्र चाललं आहे आणि
इथं माझा भक्त उपाशी?” कारण आजी उपवास करतेय ते आजोबांना
माहित नव्हतं. आजोबा गडबडले. “म्हणजे मला माहीत नव्हतं
महाराज, मला क्षमा करा!” म्हणून महाराजांचे पाय धरले. महाराज आजीला बोलावून
म्हणाले, “तुझा आता उपास
सुटला!! आता आम्ही सगळे तुझ्या हातचं भोजन करून जाणार आहोत. आता स्वयंपाक करा!”
आजीच्या
आनंदाला पारावार उरला नाही. एवढे मोठे महाराज, आपल्यासाठी
इतक्या लांब आले! आपल्या हातचं जेवणार! लाखांना जेवूं घालणारा परमेश्वर आपल्या
हातचं जेवणार! आजीला परमावधीचा आनंद झाला. आजी भराभरा
स्वयंपाकाला लागली सर्वांचे भोजन झाले. मग महाराज
म्हणाले, आम्हीही आता निघतो. जाताना म्हणाले, “सौभाग्यवतीला
बोलाव! हे बघ तुला माझ्या दर्शनाला नेहमी येता यायचं नाही असं दिसतंय, तेव्हा तुझ्या वाड्यातच श्रीरामाचे मंदिर बांध! मी रामाच्या मूर्ती
पाठवून देतो म्हणजे माझ्या रामाचे तुला रोज दर्शन घेता येईल. काय बापू! मंदिरात
रोज पूजा करा. मी तिथेच आहे असं समजा!!” अशी ती हकीगत.
गोमेवाडीला
सौ.च्या वाड्यात लक्ष्मण सीतासहित श्रीरामाचं
देऊळ अजूनही आहे. संपूर्ण गोमेवाडी रामाच्या दर्शनासाठी तेथे जाते आणि गोंदवले
गावांत महाराजांच्या घरी जेथे महाराजांचा घोडा बत्ताशाची प्रतिकृती आहे तेथे देशपांडे कुटुंबाचा फोटोसुद्धा आहे.
तर
अशा महाराजांच्या दर्शनाची ओढ सौभाग्यवतीला होती. मी म्हणलो, अगं, आपण गावी आलोय! इथं पुण्या-मुंबईसारखे जायला वाहन मिळणार नाही. एसटीने जावं
लागेल. तेवढ्यात माझा भाऊ म्हणाला, “अरे, एक जीप आहे, मी
बघतो रिकामी आहे का. आपण जीप घेऊन जाऊ.” ठरलं. जीप रिकामी मिळाली आणि जायचं ठरलं.
आम्ही
आठ वाजेपर्यंत सगळं आवरलं आणि गोंदवल्याला जायला निघालो. गोंदवले तिथून साधारणपणे
पंचवीस एक किलोमीटर असेल. आम्ही दुपारच्या आरतीच्या दृष्टीने निघालो. वाटेत
सेवागिरीच्या महाराजांचे दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. गोंदवल्याला पोहोचेपर्यंत
तिकडे आरती झाली होती. दर्शन घेऊन आम्ही
प्रसादाच्या खोलीत गेलो. पाहतो तो पंगती
उठल्या होत्या आणि प्रसादही संपला होता.
![]() |
फोटो
विकिपिडियावरून साभार |
सौ.ला अतिशय दुःख झाले. इतक्या लांब आलो आणि महाराजांचा प्रसादही मिळाला नाही. असं कसं झालं? आम्ही तसेच मुदपाकखान्याकडे गेलो. माझ्या सौ.चा भाऊ सुद्धां निवृत्त झाल्यावर गोंदवल्यातच सेवेसाठी राहत होता. त्याची चौकशी केली तर तो आटपाडीला गेला होता. मग इकडे तिकडे चौकशी केली, सर्वांनी सांगितले, की प्रसाद संपला आहे. आम्ही खूप नाराज झालो. तरी पण एकदा प्रयत्न म्हणून आत डोकावलो तर आतून एक माणूस लॉबीमधून बाहेर आला व म्हणाला काय हवं आहे ताई! सौ. म्हणाली, बघा! प्रसाद संपला आहे म्हणतात. महाराजांच्या दारातून अशी कशी परत जाऊ! तेवढ्यात तो माणूस म्हणाला, ताई मी बघतो आत मध्ये काही आहे का? तुमच्याकडे एखादा डबा किंवा प्लास्टिकची पिशवी आहे का? सौभाग्यवतीच्या पर्समध्ये एक मोठी पिशवी होती, त्यातून तिनं दोन पिशव्या काढून दिल्या. गृहस्थ म्हणाले, येथेच थांबा. आतमध्ये येऊ नका. आणि त्यांनी खरोखरच एका पिशवीत आमटी, एका पिशवीत भात दिला आणि म्हणाला “ताई, खास तुमच्यासाठी ही भाकरी.” बायकोच्या आनंदाला पारावार उरला नाही! ती म्हणाली, “मी म्हटलं नव्हतं महाराज प्रसाद देणारच, रिकामे पाठवणार नाहीत.” आम्ही पिशव्या घेतल्या व दोन पावलं पुढे चाललो. आनंदात त्या गृहस्थांचे आभार मानायला विसरलो म्हणून मागे वळून पाहिले तर त्या सबंध लॉबीमध्ये ते गृहस्थ दिसले नाही. इकडे तिकडे पाहिले, कुठेच दिसले नाहीत. बायको म्हणाली, महाराज तुम्ही दर्शन दिलं पण साधं पायासुद्धा पडतां आलं नाही! तिची भक्ती व हा प्रसंग पाहून माझ्याही डोळ्यातून पाणी वाहूं लागलं. आम्ही गाडीत आलो. आम्ही सात जण होतो पण आम्हां सगळ्यांनाच भात आमटी कशी कोणास ठाऊक पुरेशी झाली. आम्ही पोटभर जेवलो. असे ते गोंदवलेकर महाराज. आजही बऱ्याच जणांना असा अनुभव येत असेल.
आम्ही बाहेर पडणार तेवढ्यात आश्रमात एक ट्रक आला. ड्रायव्हर म्हणाला गुळाच्या ढेपा उतरून घ्या. तिथल्या माणसाने विचारलं, “कुठून आलाय बाबा?” ड्रायव्हर म्हणाला, “माहीत नाही. मला या ढेपा पोचवायला सांगितले आहे.” असं महाराजांचं अन्नछत्र चालतं. कुठून तिथे धान्य वस्तू येतात कोणालाही कळत नाही. धन्य ते महाराज! आजच्या काळातही अशा काही गोष्टी घडत असतात, मात्र तेथे श्रद्धा जरूर हवी.
सौभाग्यवती
माझ्या भावांना प्रसादाची हकिगत मनोभावे सांगत होती व मला तिच्या जागी तिची आजी
दिसत होती. श्री. गोंदवलेकर महाराजांनी माझा ताबा घेतला होता आणि जीपमधील सीडी
गुंजत होती, श्री राम जयराम जयजयराम !!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा