पैसा पैसा पैसा...

 

-      शिल्पा येवलेकर

 

क्या बात है क्या चीज़ है पैसा?

पैसा पैसा करती है क्यूँ पैसे पे तू मरती है?

क्या बात है क्या चीज़ है पैसा?

‘साम्राज्य’च्या दिवाळी अंकासाठी काय लिहावे या विचारात असतानाच रेडिओ वर “क्या चीज़ है पैसा” हे गाणे वाजू लागले तसे मा‍झ्या विचारांचे चक्र देखील पैशाभोवती फिरू लागले. गाणे संपता संपताच पैसा हा लेखाचा विषय होऊ शकतो हे उमगले आणि छोटेखानी प्रमाणात का होईना मला देखील आर्किमिडीजचा ‘युरेका’ क्षण अनुभवता आला. समोर जेवणाचे ताट वाढले होते पण माझी गत आर्किमिडीज सारखीच झाली.. त्याला कपड्याचे भान राहिले नाही आणि मला जेवणाचे. मग काय क्षणाचीही दिरंगाई न करता कागद आणि पेन घेतलं आणि लेखन सुरू केलं.

पैसा हा विषय तसा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आणि परिचयाचा आहे. त्याचे प्रत्येकाशी एक अतूट, घट्ट नाते आहे तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान देखील आहे. चांगले जगण्यासाठी पैसे आवश्यक हे रूढार्थाने एक प्रकारचे सत्यच झाले आहे. परंतु त्याविषयी नवे काय सांगावे असा प्रश्न मात्र अजिबातच पडला नाही. कोवळ्या, अजाणत्या वयातच “येरे येरे पावसा तुला देते पैसा” हे गाणे गातांना उमगलेले पैशाचे महत्व मात्र गेल्या दोन वर्षात एका वेगळ्या दृष्टीने पाहता आले, ते स्वयंप्रेरणेने ‘अर्थक्रांती’ या एन.जी.ओ. मध्ये पूर्ण वेळ स्वयंसेवक म्हणून काम करताना, अगदी दमडीचाही मोबदला न घेता. ‘अर्थक्रांती’ ही संस्था भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरूत्थान तसेच जागतिक पटलावरील समस्यांवर व्यवस्थात्मक उत्तरे मांडणे हे आपले उत्तरदायित्व मानते. आपण सर्वांनी अनुभवलेली नोटबंदी हा अर्थक्रांतीच्या मूळ प्रस्तावाचाच एक छोटासा भाग होता.

        पांढरपेशा कुटुंबात वाढताना चांगले उत्पन्न मिळणाऱ्या जॉबचे एक साधन म्हणून इंजीनियरिंगचे शिक्षण ओघानेच मा‍झ्या आयुष्यात आले. मग आली ती सॉफ्टवेअरमधली मोठ्या पगाराची नोकरी. पैसे मिळवण्याचे साधन म्हणजे नोकरी नंतर आपोआप साध्य कधी बनली ते कळलंच नाही. काही वर्षांपूर्वी आवड म्हणून अर्थक्रांतीमध्ये आर्थिक विषयांवर काम करताना पैशाचा एक महत्त्वाचा गुणधर्म समजला – पैसा हे विनिमयाचे एक साधन आहे. (Money is a Medium of Exchange.) आणि त्यामुळे लक्षात आले की पैसा साधन आहे, साध्य नाही. ही समज आयुष्याला कलाटणी देणारी ठरली आणि नंतर रोजचे जगणे म्हणजेच एक उत्सव झाला.

या संस्थेत काम करताना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पडला. जगण्यासाठी नेमका किती पैसा हवा? याचे उत्तर अचानक सहज होणार्‍या गप्पागोष्टींमधून एक उदाहरणाने उलगडले. जगायला ऑक्सिजन लागतो. अगदी मरेपर्यंत. म्हणून तो आपण काही साठवून ठेवत नाही परंतु उंच डोंगर चढताना किंवा खोल समुद्रामध्ये गेल्यास ऑक्सिजन सिलेंडर लागतोच. तसेच काहीसे पैशाचे स्थान देखील आपल्या आयुष्यात आहे. पैसे मिळविण्याच्या नादात हा पैशाचा सिलेंडर इतका मोठा होतो, की आयुष्यच पैशाच्या सिलेंडरभोवती वेढले जाते व छान आयुष्याचा अनुभव घेणे अशक्यप्राय होते. या उदाहरणाने किती पैसा हवा हे काहीसे लक्षात आले. पण मग हा सिलेंडर किती मोठा असावा हा पुढचा प्रश्न पडला व त्याचे उत्तर देखील परत एकदा छान रंगलेल्या गप्पांमधूनच उलगडले.

शाळेत असताना अनेक शास्त्रीय प्रयोग केले. त्यात आधी ध्येय ठरे आणि त्याप्रमाणे प्रयोगासाठी साधन सामुग्री गोळा केली जाई. तसेच काहीसे मानवी आयुष्याचे देखील हवे. ध्येयाप्रमाणे पैसा साधन म्हणून हवा. म्हणजे गरजेप्रमाणे सिलेंडरचे आकारमान हवे. पण प्रत्यक्ष आयुष्यात घडते ते नेमके उलटे. आधी पैसे मग त्याप्रमाणे ध्येय असे काहीसे होते.

“तुमचे आयुष्याचे ध्येय काय?” असे विचारल्यास बहुतेकांचे उत्तर असते ते म्हणजे समाधानाने जगणे आणि आनंदी राहणे. यासाठी किती बरे पैसा लागतो? काय आकारमानाचा सिलेंडर हवा? समाधान आणि आनंद नेमका कशात दडला आहे?

समाधान आणि आनंद या माणसाच्या मानसिक अवस्था आहेत. समाधानी माणूस नेमका कोण? या प्रश्नाचे उत्तर समाधानी माणसाची लक्षणे सांगून देता येईल. जो कधीही तक्रार किंवा आरोप करीत नाही तो समाधानी. पण असा समाधानी माणूस सापडणे महा कठीण. समाधानी होण्यासाठी फारसे पैसे लागत नाहीत. आनंद ही देखील एक मानसिक अवस्था आहे. तसेच ही अवस्था आपल्याला मिळणाऱ्या सोयी आणि सुविधांशी (Comfort आणि Convenience शी) देखील जोडली आहे. म्हणजेच आनंद हा भौतिक सुखाशी देखील निगडीत आहे. त्यासाठी लागतो तो पैसा. म्हणून गरजा आणि यथायोग्य भौतिक सुखाला लागेल एवढाच पैसा मिळविणे हा आदर्श उद्देश होय.

पैशाव्यतिरिक्त अजून काही प्रकारच्या संपत्तीची देखील माणसाला आवश्यकता भासते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य, आपली सपोर्ट सिस्टीम म्हणजेच कुटुंबव्यवस्था, मित्रमंडळी व शेजारी; अनुभव, आत्मसात केलेलं कौशल्य, ज्ञान, आत्मविश्वास, सामाजिक शांती तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती हे देखील आयुष्यातील संपत्तीचे महत्त्वाचे प्रकार आहेत. त्यावर देखील आपण काम करणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच ही साधन संपत्ती वाढविणे आणि जोपासणे महत्त्वाचे कार्य आहे. यातील कुठल्याही घटकाची कमतरता पैशाप्रमाणेच आयुष्यामध्ये कमी निर्माण करते हे आपण सर्वांनीच लॉकडाऊनमध्ये अनुभवले आहेच. प्रश्न एवढाच उरतो की पैसे मिळविण्याच्या नादात आपण ही संपत्ती खरेच काळजीपूर्वक जोपासतो का? पैसे महत्त्वाचेच पण ही बाकीची संपत्ती नसेल तर आयुष्य जगणे केवळ अशक्य.    
‘अर्थक्रांती’च्या निमित्ताने वेगळ्या वाटा चोखाळणारे अनेक लोक भेटले. त्यांचे कार्य व त्यातून त्यांना मिळणारा आनंद आणि समाधान जवळून पाहता आले. ते पाहून लक्षात आले की जे लोक पैशाकडे साध्य नव्हे तर साधन म्हणून पाहतात ते अधिक आनंदी आहेत, समाधानी आहेत. या कामाच्या निमित्ताने मला देखील काही अंशी आनंद आणि समाधान अनुभवता आले. या समाधानाने जगणे एक सुंदर गाणे झाले, आयुष्याला एक दिशा मिळाली आणि या ई-अंकाच्या निमित्ताने मला हे पैशाबद्दलचे माझे विचार मांडण्याची एक छान संधी लाभली.         

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज