संसाराचा साथीदार आणि साक्षीदार

 

-      मनोरमा परांडेकर


लग्न होऊन मी चेंबूरला आले, तेव्हा मुंबईतली बाजारपेठ कुठे माहीत होती. पुण्याला काही कारणाने आलेली असताना छोटा पाटा-वरवंटा आणि खलबत्ता तुळशीबागेतून खरेदी करून फळांच्या लहान करंडीत पॅक करून ती करंडी लहान बाळासारखी कडेवर घेऊन गाडीने चेंबूरला आले. तेव्हा पुणे - मुंबई बसने प्रवास करून चेंबूरला बसमध्ये उतरून घरी जाता येतं, याची कल्पनाच नव्हती गं. चेंबूरहून दादर गाठून ट्रेनने शिवाजीनगरला उतरून रिक्षाने घर गाठणे, हा द्राविडी प्राणायाम वाशीला येईपर्यंत करत होतो. नंतर ट्रेन विसरून गेलो. ७८-७९ नंतर मुंबई - पुणे ट्रेनचा प्रवास अरिंजयच्या आग्रहाखातर २००९ मध्ये ३० वर्षांनी केला. असो, मी पाटा-वरवंट्याबद्दल सांगत होते. नवीन संसारात तेव्हा मिक्सर, फ्रीज, गॅस शेगडीची पण अपेक्षा नव्हती; कारण यांच्याशिवाय सगळी कामे सुरळीत होत तेव्हा. तात्पर्य काय, पाटा-वरवंटा, खलबत्ता घेणं आवश्यक होतं आणि ती बाळं मी पुण्याहून आयात केली. वाशीला येईपर्यंत घरात मिक्सर, फ्रीज, गॅस सगळ्या सोयी आल्या असल्या तरी वाटण घाटणाची हौस संपली नव्हती म्हणून नवीन चांगला मोट्ठा पाटा-वरवंटा घेतला. (जागा भरपूर असल्याचा एक फायदा) तो हौसेने अधून मधून वापरत होते, पण वाशी सोडून पुण्याला लहान घरात येताना मला नवरा, मुलं आणि त्यांच्या वरचढ सुनांनी पाटा-वरवंटा बाईला द्यायला लावला आणि वाद घालून हट्टाने खलबत्ता तेवढा मी बरोबर आणलाच आणि अजून तो वापरते. पुढच्या वर्षी त्याची सुवर्णजयंती होईल. तो माझ्या संसाराचा इतक्या वर्षांचा साथीदार आणि साक्षीदार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज