-
सौ. माया देशपांडे
त्या
दिवशी तारीख होती २६ जून २००८! आता या घटनेला एक तप उलटून
गेले आहे तरी आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो!
तेव्हा
मी व माझे पती कर्वेनगरला राहत होतो. मुलगी लग्न होऊन सासरी होती आणि मुलगा
नोकरीनिमत्त मुंबईला राहत होता. दुमजली आठ खोल्यांच्या बंगल्यात आम्ही दोघेच असू!
आम्ही दोघेही नोकरी करत होतो त्यामुळे दिवसभर बंगला बंदच असे. संध्याकाळी घरी येऊन
जेवणे करून झोपेपर्यंतच बंगल्यात जाग असायची.
२६
जूनला गुरुपुष्य होते. गुरुपुष्याच्या दिवशी "श्री गजानन विजय" या
शेगावच्या गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करायचे हा माझा कित्येक वर्षांचा नेम
आहे. त्या दिवशी मी बॅंकेतून येतानाच १० ग्रॅम सोने विकत घेतले. घरी आल्यावर
देवापुढे ते वळे ठेवून पूजा केली व पोथी वाचायला बसले. नेहमीप्रमाणे साडेतीन तासात
माझी पोथी वाचून झाली. नंतर जेवण करून आम्ही झोपायला गेलो. पहाटे उठावे लागत
असल्याने लगेच दोघांना गाढ झोपही लागली.
माझी
झोप जरा जास्तच गाढ असते. झोप पूर्ण झाल्याशिवाय मला कशानेही जाग येत नाही.
(पुण्यात एकदा भूकंप होऊन तेव्हा घरातील भांडी खाली पडून केवढातरी आवाज झाला तरी
मला जाग आली नव्हती!)
पण
आजची रात्र काहीतरी वेगळीच असावी! पहाटे अडीच वाजता मला अचानक जाग आली - अगदी
पूर्ण झोपेनंतर माणूस टक्क जागे होईल तसे. आमच्या बंगल्याची रचना अशी होती की खाली
हॉल व किचन आणि चार पायऱ्या चढल्यावर जिन्याच्या दोन्ही बाजूंना दोन बेडरूम्स...
तिथून झोपल्या झोपल्या हॉल दिसत असे.
मला
जाग आली आणि बघते तर हॉलमध्ये कोणीतरी दिवा लावला! मी तत्क्षणी ह्यांना उठवले,
"अहो, कोणीतरी आहे हॉलमध्ये!" हे
अजून झोपेतच होते त्यामुळे नुसतेच "हं!" म्हणून
परत झोपायला लागले. आता मात्र मी त्यांना जोरजोराने हलवून "हॉलमध्ये दिवा
लागला आहे, पहा -" असे हाताने
इशारा करून सांगितले. त्याबरोबर हे उठले आणि पायात स्लिपर्स सुद्धा न घालता
"वॉचमन, वॉचमन! पकडो, पकडो!"
असे जोरात ओरडत पायऱ्या उतरायला लागले.
हॉलमध्ये
चार आडदांड माणसे चोरीच्या उद्देशाने इकडेतिकडे बघत होती. पण हे इतक्या आवेशाने
खाली धावले (तेव्हा इतके बळ अंगात कसे आले कोण जाणे!) की ते चौघे अक्षरशः
कंपाऊंडवरून उड्या मारून पळून
गेले. मी खाली
उतरून येईपर्यंत ते फक्त पाठमोरे पळताना मला दिसले, आणि मग आम्हाला वास्तवाची जाणीव झाली. आता मात्र खरी भीती वाटायला लागली.
आम्ही दोघेही हॉलमध्ये नुसतेच उभे राहिलो. चारजण पळाले, पण
अजून वरच्या मजल्यावर तर कोणी नसेल ना? खालची दोन्ही दारे
(एक लोखंडी ग्रिलचे व एक लाकडी) चोरट्यांनी फोडल्यामुळे सताड उघडी होती. अंधारात
बाहेर जायची भीती वाटायला लागली, आणि घरात थांबायचा धीर
होईना.
आपल्यावर
काही वेळापूर्वीच काय प्रसंग ओढवला होता याचे आता हळूहळू भान यायला लागले.
चोरट्यांनी दोन्ही दारे फोडली म्हणजे ते सशस्त्र होते. बंगल्यात आम्ही दोघेच,
आमची वयेही साठीच्या आसपास.... खरंच त्यांनी आमच्यावर हल्ला केला
असता तर ही घटना लिहायला आज मी या जगातच राहिले नसते! क्षणार्धात हा प्रसंग घडून
गेला. मोठी वावटळ यावी आणि सगळं उध्वस्त करून जावी तसे आम्ही सैरभैर झालो होतो.
इतका
आवाज ऐकून शेजारी धावून आले. सगळ्यांनी चोरटे पळून गेले त्या दिशेला जाऊन
शोधण्याचा प्रयत्न केला. कोणी पोलिसांना फोन केला. गस्तीवरचे पोलीस लगेच आले,
पण चोरटे काही सापडले नाहीत.
जीवावर
बेतणे म्हणजे काय याचा अनुभव आम्ही त्या रात्री घेतला. नंतर अनेकांचे मत पडले की
असे चार हट्टेकट्टे चोर समोर असताना एकट्याने त्यांच्या अंगावर धावून जाणे हे
खरेतर वेडेपणाचे होते! ते लोक पळाले म्हणून बरे. नाहीतर एकट्याने काय केले असते?
(अर्थात हेही खरंच आहे म्हणा!) पण तेव्हा मात्र कुठून एवढी ताकद आली
देवच जाणे!
नंतर
मी आत येऊन देवापुढे उभी राहिले. गजानन महाराजांची पोथी तिथेच होती. देवापुढे
ठेवलेले सोन्याचे वळेही तसेच होते. मनात एक विचार पक्का होत गेला... प्रत्यक्ष
गजानन महाराजांनीच मला येऊन उठवले होते. मला जर जाग आलीच नसती तर! त्या भक्तवत्सल
महात्म्यानेच आमचा जीव वाचवला. आमच्या घरातील सर्वजण गजानन महाराजांचे भक्त आहेत.
पण या प्रसंगानंतर तर आमचा महाराजांवरील विश्वास आणि श्रद्धा अधिकच दृढ झाली आहे.
शेवटी म्हणतात ना, "देव तारी त्याला
कोण मारी!"
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा