-
माधव शंकर नेने
माझी
आई गंगाबाई शंकर नेने हिचा जन्म १९०२ साली झाला. त्या वेळची कुटुंबव्यवस्था व स्त्रियांची
सामाजिक स्थिती कशी होती ह्या विषयी ह्या लेखात उहापोह केला आहे. त्या काळात एकत्र
कुटुंब पद्धती होती. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा होता. एक कुटुंब प्रमुख व इतर
सदस्य अशी मोठी कुटुंबे होती. कमावणारा एक व खाणारे अनेक असत. त्या काळात
कुटुंबनियोजन हा प्रकार नसल्यामुळे किती जणांना जन्म द्यावयाचा याच्यावर बंधन नव्हते. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची
असावयाची. त्या काळात मॅट्रिक परीक्षा पास होणारा म्हणजे उच्चशिक्षित समजला जायचा.
नोकरी लागण्यास अडचण नव्हती. स्त्रियांचे शिक्षण जेमतेम लिहिण्यावाचण्याएवढे होते.
स्त्रियांची लग्ने बारा ते पंधरा वयापर्यंत व्हायची, व त्यांच्यावर घर चालवण्याची
जबाबदारी यायची. मुलांचे संगोपन, शिक्षण व त्यांच्यावर चांगले संस्कार ही स्त्रीची
जबाबदारी होती.
आमच्या आईचा दिवस पहाटे पाच वाजता सुरु होत असे. घराची साफसफाई, केरवारे ही कामे
लवकर उरकावी लागत असत. आजच्या सारखी नाश्ता वगैरे पद्धत नव्हती. घरात दूध शिल्लक
असेल तर सर्वांना थोडा चहा मिळायचा. वडील सकाळी १० वाजता कामाला जायचे. ते
संध्याकाळी ६ वाजता घरी यावयाचे. ब्रिटिशकालीन सरकारी नोकरी असल्यामुळे भरपूर काम
करावे लागत असे. रविवारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा भरपूर काम करावे लागत असे. मुले देखील
घरगुती कामात आईला मदत करत असत. रांधा, वाढा, उष्टी काढा व मुलांचे संगोपन या
बरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार आईने केले. आईकडून सर्वांना समान वागणूक
मिळायची. डावे उजवे असा प्रकार नसायचा.
मुलांना
चांगल्या नोकऱ्या लागल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती सुधारली. सणासुदीला गोड
पदार्थ खायला मिळू लागले. आई वयाच्या सत्तरीच्या सुमारास आजारी पडल्यामुळे वाईट
काळ सुरू झाला. असाध्य रोगामुळे दहा वर्षे तिचे फार हाल झाले. व ती वयाच्या ८०व्या वर्षी स्वर्गवासी झाली.
नोकरी
निमित्त सर्व मुलांच्या बदल्या झाल्यामुळे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी गेले. आईमुळे
सर्व घर एकत्र बांधलं गेलं होतं. म्हणूनच आजही आम्ही दूर असलो तरी एकत्र आहोत.
एकत्र जमतो. आईने सर्व सुनांना सारखी वागणूक दिली. कधी एकीचे दुसरीला सांगणे असले
काहीही नाही. तिने सर्वांना आपले मानले, वस्तूंना नाही. आकाशात सूर्य प्रकाशत
असतो. त्याच्यामुळे जगातील सर्व बरेवाईट व्यवहार चालू असतात. परंतु तो स्वतः काहीच
करत नाही. अकर्ता असतो. तसे आईचे अस्तित्व आम्हाला पुरेसे आहे. कपबशी फ़ुटायचीच तसा
हा देह विनाशी आहे हे जाणून तिने दोन मुलांचा वियोग व पतिवियोग यातून स्वतःला
सावरले असावे. कशाची अपेक्षा नाही म्हणजेच निष्काम. मी केले असा अहंकार नाही.
म्हणजेच निरहंकारी वृत्तीने तिने आपले कर्तव्य पार पाडले. गीता तरी वेगळे काय
सांगते?
गीता न वाचताच तिला ती कळली होती. खरोखर गीताच ती जगत होती. तिला
नक्कीच मुक्ती मिळाली असणार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा