या चिमण्यांनो...

 -      निशा किर्लोस्कर

चिमण्या कमी झाल्यात? नाही...  आमच्याकडे तर भरपूर आहेत.

अवतीभवती असल्यावाचुन, कोलाहल तुमचा

उरक न होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा

या बाळांनो, या रे लौकर, वाटा अंधारल्या

या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या

जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या...

या ग. दि. माडगूळकर यांच्या गाण्याची आठवण उन्हाळ्यात जास्त होते, जेव्हा कडक ऊन असताना काही दिवस चिमण्या अजिबात दिसत नाहीत.

चिमणीला बऱ्याच गीतकारांनी आपल्या गाण्यामध्ये समाविष्ट केलं आहे. “चिमण्यांची शाळा” असा एक मराठी चित्रपटही आहे. लहान मुलांच्या गोष्टीत तर तिला मानाचं स्थान आहेच. एक घास चिऊचा एक घास काऊचा असा वरण भाताचा घास खाण्यापासून लहानपणी चिमणी आपल्या आयुष्यात आली, पुढे चिव चिव चिमणी गाते अशी बडबड गाणी म्हणत ती आपल्या आयुष्याचा भाग बनली. “बिन भिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु,” ह्या ग. दि. माडगूळकर यांच्या आणि “उठा उठा चिऊताई”  ह्या कुसुमाग्रज यांच्या गाण्यांमधून आपल्या अगदी मोठेपणीसुद्धा त्या आठवणीशी जोडली गेली आणि आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसली.

आपल्याला माहितच आहे की १६ सेंटीमीटर लांबीचा, जगात बऱ्याच ठिकाणी आढळणारा  हा पक्षी दोन्ही पायावर उड्या मारत चालतो. तिच्या चोचीजवळ पिवळा पट्टा असतो. चिमणी बऱ्याच वेळा वाड्यात, घराजवळ राहते. ती जंगलात किंवा माळरानावर सहसा राहत नाही. म्हणूनच तिला House Sparrow म्हणतात. पक्षीनिरीक्षण करताना किंवा Ornithology (पक्षीशास्त्र) चा अभ्यास करताना एखाद्या पक्ष्याचे वर्णन चिमणीपेक्षा लहान किंवा चिमणीपेक्षा मोठा असे केले जाते. २० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजराही केला जातो. डॉ. सालीम अली यांनी चिमण्यांचा अभ्यास केला आहे.

आठ वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही पौड रोडच्या ‘साम्राज्य’ सोसायटीत राहायला आलो तेव्हा गावापासून जरा दूर आलो असं वाटलं होतं. पण इथे आल्यावर समोरचे आडवे डोंगर आणि प्रत्येक खिडकीतून दिसणारी हिरवाई पाहिल्यावर मन एकदम हरखून गेलं. सोसायटीच्या मेन गेटच्या समोर वाढलेल्या झाडाझुडपात तर विविध प्रकारचे पक्षी सहज दिसायचे. त्यामध्ये टिटवी, ग्रे हॉर्नबिल, पोपट, मैना, भारद्वाज, प्रीनिया, सूर्यपक्षी (sunbird), बुलबुल वगैरे तर अजूनही रोजच दिसतात. तिथेच माझ्या मुलीला सानियाला एक दिवस पाण्याच्या प्रवाहाजवळ सुगरणीच्या घरट्यांचा सुगावा लागला. मग सुटीच्या दिवशी सकाळी उठून आमची फौज घेऊन निघाली पक्षी निरीक्षणाला. सुगरण घरटं बांधत असताना झाडात शांत बसून बघण्याचा आनंद काही वेगळाच होता. नंतर शोध घेतला तेव्हा अशी असंख्य घरटी आजूबाजूला बघायला मिळाली. आता ती जागा कोणीतरी विकत घेतली आहे. मग आम्ही नाद सोडून दिला, पण घरात सगळेच पक्षीप्रेमी असल्याने नेहमीच आम्ही कुठेतरी पक्षी निरीक्षणासाठी जातो.

एकदा आम्ही घराचे इंटिरीअर करताना सुताराकडून एक छोटे घरटे करून घेतलं होते. बरेच दिवस वाट बघून त्यात चिमणी काही वस्तीला येईना. मग लक्षात आलं की घरटयाचं चिमणी जाण्यासाठी केलेलं भोक (hole) आणि एकूणच आकार जरुरीपेक्षा मोठा झालाय. त्यामुळे इतर मोठे पक्षी त्यामध्ये डोकावण्याचा, हल्ला करण्याचा धोका आहे.

नंतर एक दिवस वाईच्या माझ्या भावाकडे चिमणीचे कुटुंब लाकडी कृत्रिम घरट्यात राहताना पाहिलं आणि तशीच घरटी (की ज्याच्या छोट्या होलमधून फक्त चिमणीच आत जाऊ शकेल) आमच्या घराच्या सर्व खिडक्याच्या बाहेरच्या बाजूला आणि टेरेसमध्ये लावली. टेरेसमध्ये आधीच विविध प्रकारची फुलांची झाडे होतीच. त्यांच्या छोट्या फांद्यांचा त्यांना उपयोग (perching साठी) झाला. तिथेच पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला लागलो. त्यात साळुंखी, बुलबल, रोज पाणी पिण्यासाठी, खरं तर अंघोळीसाठी यायला लागले. 

आता घरट्यामध्ये चिमणी आणि चिमणा आलटून पालटून येतच राहिले. हळूहळू त्यांची संख्या वाढायला लागली. त्या घरातून सगळीकडे बागडू लागल्या. मग त्यांच्यासाठी बर्ड फीडरही आला. त्यामध्ये बारीक कणी आणि बाजरी असं भरून ठेवू लागलो. त्यामुळे खुशीत चिमण्या धान्य खाऊन मजेत राहू लागल्या. आता हेच घरटं योग्य हे नक्की झालं. अशी बरीच घरटी करून घेतली आणि काही मित्रमैत्रिणीना भेट म्हणूनही दिली. अशातच केळ्याचा किंवा कोणत्याही फळाचा तुकडा घातला की बुलबुल हमखास येतोच याचा शोध लागला. अशा रितीने मग रोज चिमण्यांच्या किलबिलाटाने आम्हाला जाग यायची आणि आमचा दिवस आनंदाने सुरू व्हायचा. बरेच दिवसांनी एक दिवस बारीक नाजूक अशी चिवचिव ऐकू आली. हा चिमण्यांचा नेहमीचा आवाज नव्हता. म्हणून बाहेर बघितलं तर चिमण्याच नव्हत्या. मग आवाज कुठून येतोय याचा कानोसा घेतला आणि नवीनच शोध लागला. त्या घरट्यातून हा आवाज येत होता. मग थोड्या वेळाने चिमण्याचे घरट्याकडे सारखे हेलपाटे सुरु झाले, तेव्हा लक्षात आलं की हा घरट्यातल्या पिल्लासाठी सगळा आटापिटा चाललाय. मग पिल्लांची चिवचिव ऐकायचा नादच लागला. त्यांच्यासाठी नारळाची शेंडी, कापूस ठेवला की तो तडक घरट्यात जाऊ लागला. काही दिवसांनी पिल्लं बाहेर डोकावू लागली. चिमणी त्यांना अळ्या, किडे भरवायला आल्यावर त्यांचा आवाज एवढा वाढतो की “Crying baby gets milk” ही इंग्रजी म्हण सार्थ ठरते.

चिमण्यांच्या आवाजावरून हा कशाचा कॉल आहे हे आता आम्हाला समजू लागलं. एकदा चिमण्यांचा जोरात चिवचिवाट ऐकू आला म्हणून बघितलं तर कावळा झोपाळ्यावर बसला होता. हा आवाज पिल्लांना सावध करण्यासाठी होता हे नंतर लक्षात आलं. लहानपणी आई, आजी गोष्ट सांगताना नेहमी चिमणी कावळ्याची गोष्ट हमखास असे. त्यामध्ये चिमणीच्या घरट्याची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. कावळा चिमणीची पिल्लं खाण्यासाठी आला की चिमणी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून कावळ्याला हाकलून द्यायची हे गोष्टीतलं तर सगळ्यांना माहितच आहे. पण त्याची इथेही प्रचिती आली. इतर कुठलाही पक्षी म्हणजे कबुतर, बुलबुल आला तर चिमणीला काही फरक पडत नाही. पण कावळा मात्र आलेला चालत नाही.

भात किंवा तांदूळ खायला नसेल तर ह्या चिमण्या वेगळा आवाज करतात आणि लहान मूल जसं भूक लागल्यावर खायला मागतं तसं त्या अगदी भात सांडला असेल तर जेवणाच्या टेबलावरही येतात. आमच्या घरात त्यांचा इकडून तिकडे संचार चालू असतो. आम्ही त्यांच्या पिढ्या जपतोय. आमचं घर म्हणजे चिमण्यांसाठी प्रसूतिगृह झालंय. पिल्लं थोडी मोठी झाल्यावर त्यांना उडायला शिकवतानाही आम्ही बघितलं आहे. आत्तापर्यंत आमच्याकडे बऱ्याच चिमण्या पिल्लांना जन्म देऊन गेल्या. अजूनही हे काम चालूच आहे. निसर्ग संवर्धन, जैवविविधता हा खूप मोठा विषय आहे. त्याचा अभ्यास चालू असताना चिमण्या वाढवण्याचं काही कणभर तरी काम आम्ही करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे.  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज