अति तेथे माती

 

(हंगेरियन लोककथेचा स्वैर अनुवाद)

 

कांचनपूर नावाच्या गावात एक रामदास नावाचे खूप श्रीमंत शेठ राहत होते. त्यांना तीन मुले होती - मनीष, हरीश व सतीश. रामदास शेठकडे खूप पैसा अडका असल्यामुळे ती तीनही मुले आळशी झाली होती, काही कामधंदा करत नव्हती.

हळूहळू रामदास शेठचे वय वाढत गेले तसे त्यांना मुलांची काळजी वाटू लागली. आपली मुले स्वतः तर पैसे काहीच मिळवत नाहीत, पण मी कमावलेले पैसे तरी ते नीट सांभाळू शकतील का, असे त्यांना वाटू लागले.

ह्या मुलांनी घराबाहेर जाऊन स्वतः काम केल्याशिवाय पैसे मिळवायला किती कष्ट पडतात ते त्यांना समजणार नाही, असे वाटून रामदास शेठनी मुलांना सांगितले, "मुलांनो, तुम्ही आता मोठे झाले आहात, म्हणून आता स्वतः कष्ट करून पैसे कमावून आणा." मुले म्हणाली, "बाबा, आम्हाला तर कुठलेच काम येत नाही." रामदास शेठ म्हणाले, "ठीक आहे, मग आधी एखादी कला शिकून घ्या. एक वर्ष शिका, पैसे कमवा व तुम्ही कशात तरबेज झालात ते मला दाखवा." तीनही मुले एका वर्षानी परत यायचं कबूल करून बाहेर पडली.

मनीषने राजाच्या घोडदळात नोकरी सुरू केली. तिथे त्याने घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकून घेतली. हरीशने तेथेच घोड्यांची निगा राखण्याचे काम केले. सतीशला तर काहीच काम जमेना म्हणून त्याने एका न्हाव्याकडे राहून केस कापण्याचे काम शिकून घेतले. पण ते तिघेही आळशी होते, त्यामुळे त्यांनी नीट कुठलेच काम केले नाही. फक्त नवीन नवीन थापा मारण्यात मात्र चांगलेच पारंगत झाले!

एका वर्षानंतर तिघेही घरी परतले. ते वडिलांना, म्हणजे रामदास शेठना भेटले तेव्हा शेठ म्हणाले, "आता सांगा बरे तुम्ही काय काय शिकलात?" मनीष म्हणाला, "अहो बाबा, मी घोडेस्वारी आणि तलवारबाजी यात इतका निपुण झालो आहे की एकदा भर पावसात घोड्यावरून जाताना मी डोक्यावरून इतक्या भरभर तलवार फिरवत होतो की एक थेंब पाऊस माझ्या डोक्यावर पडू शकला नाही!"

आता हरीश कसा मागे राहणार? तो म्हणाला, "मी तर घोड्यांची निगा इतकी सराईतपणे राखतो की एकदा मी धावत्या घोड्याच्या चारही पायांना नाल ठोकून दिली! त्या घोड्याला काही कळलं सुद्धा नाही!"

आता सतीशला तर त्यांच्याहून जास्त बढाई मारण्याची संधी मिळाली. तो सांगू लागला, "आता मी कोणाचेही केस भरभर कापण्यात तरबेज झालो आहे. एकदा तर मी पैज लावून पळणाऱ्या सशाचेही केस कापून दाखवले आहेत!"


रामदास शेठ आपल्या मुलांच्या उगाच मारलेल्या बढाया आणि थापा ऐकून खूप चिडले. त्यांच्या लक्षात आले की यांना काही कामधंदा करायची अजिबात इच्छा नाही, उलट आयता पैसा मिळाला तर हे नुसते उडवत बसतील. रामदास शेठना आपला कष्टाने मिळवलेला पैसा असा वाया घालवायचा नव्हता. त्यांनी विचार केला की मुलांना इतका पैसा दिला तर ते अजूनच आळशी बनतील. त्यांनी मनाशी निर्णय घेतला आणि मुलांना म्हणाले, "अरे व्वा! तुम्ही तर आपापल्या कामात अगदीच निष्णात झाला आहात. मग आता तुम्हाला पैसे मिळवायची काही काळजीच नाही. त्यामुळे तुम्ही आपापले पैसे कमवायला लागा. माझा सगळा पैसा मी गरीब लोकांना दान करणार आहे!"

हे ऐकून तिघेही भाऊ चांगलेच पस्तावले. उगाच खोटे बोलण्यामुळे आणि बढाया मारल्यामुळे त्यांचीच फजिती झाली. 

म्हणूनच म्हणतात, "अति तेथे माती!"






- सारा देशपांडे





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

पैसा पैसा पैसा...