रंगरेषांची दुनिया

 मुकुंद पळसापुरे यांची गार्गी गुजरने घेतलेली मुलाखत


आपल्या ‘साम्राज्य’ सोसायटीतील श्री. मुकुंद पळसापुरे हे फार मोठे चित्रकार आहेत. त्यांनी चित्रकलेतील निसर्गचित्रण (Landscape painting) ही कला सुंदर पद्धतीने आत्मसात केली आहे. त्यांनी खूप म्हणजे अक्षरशः शेकडो सुंदर चित्रे काढली आहेत. साम्राज्य ज्येष्ठ नागरिक मंचाचे ते सदस्य आहेत. आपल्या दिवाळी अंकासाठी गार्गी गुजरने पळसापुरे काकांची घेतलेली ही मुलाखत.

गार्गी: तुमची नेहमीची चित्र काढण्याची जागा कुठली, घरी की बाहेर स्टुडिओत?

पळसापुरे: मी इनडोअर आणि आऊटडोअर चित्र काढतो



गार्गी: बरं, आपण काढलेली काही चित्रं दाखवू शकाल का?

पळसापुरे: हो... ही पहा मी काढलेली काही चित्रं आहेत. जेजुरी या स्थळाची काही केलेली ही चित्रं आहेत.

गार्गी: वा खूप सुंदर चित्रं आहेत! या चित्रांसाठी तुम्ही कुठला पेपर वापरलात?

पळसापुरे: मी सर्व चित्रांसाठी हँडमेड पेपर वापरतो.

गार्गी: तुम्ही आधी रफ स्केचेस करता का?

पळसापुरे: हो, आधी एक बेसिक स्केच पेन्सिलने करतो आणि मग त्यात रंग भरतो.

गार्गी:  प्रत्येक चित्राला अंदाजे किती वेळ लागतो?

पळसापुरे: प्रत्येक चित्राला मला जवळपास तास - दीड तास लागतो.

गार्गी: रोज अशी आपण किती चित्रं काढता?

पळसापुरे: मी रोज एक-दोन चित्रं काढतो. प्रसंगी जास्तीतजास्त पाच ते सहा चित्रं काढली आहेत.


गार्गी: आपण सवडीच्या वेळात चित्रं वगळता अजून काय करता? तुमचे इतर छंद?

पळसापुरे: एरवी स्वाध्याय करतो. मी अजून इतर वाचन सुद्धा करतो. सध्या अध्यात्मिक वाचन.

गार्गी: या चित्रांना तुम्ही काच का नाही लावली?

पळसापुरे: चित्रांना काच नाही लावत कारण चित्रं ओलसर होतात आणि त्यांना बुरशी लागू शकते. 

गार्गी: बरं. तुम्ही चित्रं केव्हापासून काढायला सुरुवात  केली ?

पळसापुरे: मी आधी पुण्याला होतो. नंतर  वडिलांची मालवणला ट्रान्सफर झाली. तिथे शाळेत पाचवीपासून आम्हाला चित्रकला हा विषय होता पण आठवीमध्ये एक चांगले कला शिक्षक मला भेटले. माझ्या वर्गात दोनच असे विद्यार्थी होते की ज्यांना ड्रॉइंग चांगलं जमत होतं आणि चित्रकलेची आवड होती. माझ्या शाळेत चित्र काढायचे असेल किंवा मॅगझिनसाठी चित्रं लागणार असतील तर आम्हीच हे काम करायचो.

गार्गी: आपले शिक्षण कुठे झालं आहे?

पळसापुरे: माझं शालेय शिक्षण मालवणला टोपीवाला हायस्कूल येथे झालं आहे. कॉलेजला एक वर्ष शिकलो मग तिथूनच सोडलं. एम. कॉम. झाल्यानंतर बँकेत नोकरीला लागलो.

गार्गी: मग तुमच्या चित्रकलेची आवड पूर्ण करण्यासाठी तुम्ही कुठले एक्स्ट्रा क्लासेस केले होते का?

पळसापुरे: आर्टचे कुठले क्लासेस केले नाहीत पण छंद वर्गात गेलो.

गार्गी: तुम्ही या छंद वर्गांना कोणाकडे जायचात?

पळसापुरे: नागपूरला असताना श्री. नामदेव डिखोले (आर्टिस्ट) यांच्याकडे मी जात असे.

गार्गी: बॅंकेची नोकरी चालू असताना तुम्ही चित्र काढणे चालू ठेवले की बंद केले?

पळसापुरे: बी. कॉम. झाल्यावर मी केंद्र सरकारच्या नोकरीला लागलो. मी सरकारी नोकरीत हिंगणघाटला कामाला लागलो. हिंगणघाट नागपूरपासून ६० ते ७० किलोमीटर अंतरावर आहे. तिथे मी दीड वर्षं नोकरी केली. नोकरी करता करता एम. कॉम. पूर्ण केलं. पण त्या नोकरीत मन रमले नाही म्हणून पैसे जमवले आणि नोकरी सोडली. नागपूरच्या 'चित्रकला महाविद्यालया' तून १९७५ मध्ये 'बेसिक फाउंडेशन कोर्स' केला. मी हा चित्रकलेचा कोर्स करावा हे वडिलांना पसंत नव्हते पण मी म्हणालो जमेल तितक्या पैशातून शिकेन. मी तिथे फर्स्ट आलो आणि गव्हर्मेंट स्कॉलरशिपसुद्धा मिळवली. पण पुढे पूर्णवेळ शिकणे शक्य नव्हते आणि नोकरीची गरज होती. त्यामुळे बॅंकेतली नोकरी धरली.

गार्गी: तुम्हाला गव्हर्मेंट स्कॉलरशिप सोबत अजून काही बक्षीसे मिळाली का?

पळसापुरे: हो, एक गव्हर्मेंटचं प्राईज मिळालं आणि 'नेचर ड्रॉइंगसाठी कॅम्लीन कंपनीचं अवॉर्ड सुद्धा मिळालं.


गार्गी: बरं आता परत आपण तुमच्या चित्रकलेकडे वळूया. मला एक प्रश्न पडतो, की चित्र काढायला सुरूवात केली, न थांबता सलग वॉटर कलरिंग करावं लागतं का ?

पळसापुरे: हो, अजिबात वेळ न घालवता वॉटर कलरिंग करावं लागतं. कारण, रंग वाळल्यावर तिथे परत रंग करतांना डाग पडतात.

गार्गी: तुम्ही कुठले ब्रश वापरता?

पळसापुरे: हल्ली मी नायलॉनचे ब्रश वापरतो.

गार्गी: तुम्ही निसर्गचित्राव्यतिरिक्त आणखी कोणत्या प्रकारची चित्रं काढता?

पळसापुरे: सध्या मी 'फिगर ड्रॉइंगचा अभ्यास करतो आहे.

गार्गी: बरं. तुम्ही आत्तापर्यंत कोणाला शिकवलं आहे का?

पळसापुरे: मुलांना शिकवण्याचा प्रयोग एकदा केला होता. जी मुले एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षांना बसतात त्यांचा क्‍लास घेतला होता. २५ ते ३० विद्यार्थी आले. पण माझा स्वभाव स्वतः चित्रं काढण्याचा आहे, बाकीच्यांना ते सांगणे अवघड.

गार्गी: तुम्ही काही कमर्शियल प्रोजेक्ट केले आहेत का?

पळसापुरे: बॅंकेत नोकरी करत असताना मी काही कमर्शियल काम केलं. जास्त नाही, कारण मी जेव्हा नोकरीला बँकेत लागलो तेव्हा आमच्या बँकमध्ये कॅलेंडर बनवण्याची सुरुवात झाली. त्याला एक कव्हर असायचं. त्याच्या डिझाईनसाठी मी ड्रॉईंग करायचो. तीन-चार ऑप्शन्समधून एक फायनल व्हायचं आणि मग नागपूर झोनल ऑफिसची ऑर्डर आल्यावर मी पूर्ण महाराष्ट्रात त्या कव्हरचं बँकेचं पॉकेट कॅलेंडर छापून पाठवून द्यायचो.

गार्गी: हे कॅलेंडर फक्त महाराष्ट्राच्या शाखांसाठी होते का?

पळसापुरे: नाही. मी मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ विभागांसाठीदेखील कॅलेंडर बनवायचो. पहिल्यांदा मी नागपूरसाठी पाचशे कॅलेंडर केली. हे कॅलेंडरचे काम पंधरा वर्षं केलं. पाचशे कॅलेंडरपासून मी सव्वा लाख कॅलेंडरपर्यंत पोहोचलो. घरीच पत्नीच्या नावावर स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय होता. सुरुवातीला घरी आम्ही दोघंच प्रिंटिंगचं काम करायचो. दिवाळी, नवीन वर्षाची ग्रिटिंग्ज बनवायचो. त्यातून मग बॅंकेला कॅलेंडर बनवून देण्याची कल्पना सुचली. पुढे काही मुलीही कामाला ठेवल्या. पण काम वाढल्यावर ऑफसेट छपाईसाठी बाहेर द्यायला सुरुवात केली. असा व्यवसाय १५-२० वर्षे केला.

गार्गी: वा! वेळ आणि कष्टांमुळे तुम्ही कुठून कुठे पोहोचलात! तुमच्या कमर्शियल कामाला सुरुवात

कशी झाली याविषयी सांगाल का?

पळसापुरे: हो. मी चित्रकला महाविद्यालयात होतो. परीक्षा संपल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत 'नागपूर महिला बँक'चे ग्राफ्स बनवायचे काम मिळाले आणि मला माझे पहिले एक हजार रुपये मिळाले.


गार्गी: आपण रिटायरमेंट कधी घेतली?

पळसापुरे: मी २००७ मध्ये स्टेट बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली, म्हणजे सहा वर्षे आधीच.

गार्गी: इथे आल्यावर तुम्ही काही पोर्ट्रेट बनवली का?

पळसापुरे: हो आधी मी 'हिचे' फोटो काढले आणि मग पोर्ट्रेट बनवली.

गार्गी: वा फार सुंदर चित्रं काढली आहेत तुम्ही काकूंची! मला एक प्रश्न पडला आहे, तुमचे ड्रॉइंग कधी बिघडले आहे का?

पळसापुरे: हो, बरेचदा. माझेच नव्हे तर मोठ्या मोठ्या कलाकारांचीसुद्धा चित्रं बिघडतात.

गार्गी: तुमच्या कोणत्या चित्राला तुम्ही ‘मास्टर पीस’ म्हणाल?

पळसापुरे: हे एक गुलमोहराचं झाड आहे. हे चित्र मी पंधरा मिनिटात काढलं आहे. ह्याचा फोटो मी चालत्या कारमधून घेतला होता आणि मग त्याचे चित्र काढले. मी हे रंग कागदावर सोडले आणि मग त्यांना त्यांचे रूप घेऊ दिले आणि त्यातून हे चित्र साकार झालं !



गार्गी: खूप सुंदर चित्र झालं आहे. मला फार आवडलं. तुमच्यामध्ये बालपणापासूनच चित्रकार होता असं वाटतं.

पळसापुरे: हो, लहानपणी जेव्हा सगळे नदी, डोंगर, सूर्य आणि पक्षी काढायचे तेव्हा मी वेगळे चित्र काढायचो. याचा अजून एक किस्सा सांगतो, मी आठवीमध्ये असताना ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. हत्ती आणि सात आंधळ्यांचं चित्र काढायचं होत. तेव्हा सर्वांचं प्रपोर्शन चुकलं आणि माझं बरोबर आलं त्यामुळे मी पहिला आलो.

गार्गी: हो तुम्ही एक खरंच थोर चित्रकार आहात. तुम्हाला भेटून मला खूप खूप आनंद झाला. तुम्ही ‘साम्राज्य’ मध्ये राहता याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो.


(मुलाखतीसोबतची सर्व चित्रे पळसापुरे काकांनी काढलेली आहेत.)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज