-
अभिजीत ठेंगोडकर
लहानपणी, शाळेच्या सुट्टीत बऱ्याचदा आम्ही पुण्यात येत असू. सुरुवातीला वडिलांच्या कामानिमित्त. तेव्हा, पुणे म्हणजे डेक्कनचे नंदनवन हॉटेल, तिथून दिसणारी फर्ग्युसनची टेकडी, संभाजी पार्क, तिथली भेळ, कमला नेहरू पार्क, दर्शन हॉटेल आणि संतोष बेकरीची पिळाची खारी हे समीकरण ठरलेले. मामा पुण्यात शिफ्ट झाले आणि तेव्हापासून, पुणे म्हणजे कोथरूड आणि तिथली टेकडी हे नवीन समीकरण जुळले. मामांना ट्रेकिंगची आवड आणि त्यामुळे टेकडी फारच प्रिय. तेव्हा मामांच्या घराच्या गच्चीवरून एआरएआयची टेकडी दिसायची. तेव्हाचे (साधारण १९८५ - १९९२च्या सुमारास) टेकडीचे स्वरूप म्हणजे उंचावरील गवताळ माळरान आणि तुरळक झाडं. मुंबईतील लहानपण बोरिवली नॅशनल पार्कशेजारी गेले. तिथलं जंगल खूपच वेगळं होतं, घनदाट आणि धीरगंभीर. त्यामानाने टेकडी फारच ओसाड वाटे. परंतु, टेकडीवर येणारे लहानथोर, शाळा-कॉलेज मधील मुला-मुलींचे घोळके, टेकडीवरील सुसाट वारा ह्या सगळ्या वातावरणाने लहानपणीच भुरळ घातली. मामांकडे आलो की टेकडीवर जाणे हे ठरलेले. 'आपला मारुती' आणि 'वेताळ टेकडी' ही माझी आणि मामांची आवडती ठिकाणे. तिथेच मोर डॅम हेही एक ठिकाण होते जिथे मोर हमखास दिसायचे. एकदा, एकटाच लहान मामेभावांना घेऊन टेकडीवर गेलो होतो. थोडं आडवाटेला गेल्यावर एक रान-ससा आम्हाला घाबरून (आणि घाबरवून) लांब पळत गेल्याचे आठवते. मामांकडून त्यांनी टेकडीवर लावलेल्या झाडांच्या गोष्टी ऐकणे हाही एक आवडता कार्यक्रम असे. कसा खड्डा खणायचा, उताराच्या दिशेने कसा बांध करायचा ह्याचे वर्णन अगदी सगळं स्पष्ट आठवतंय.
![]() |
| माणसाने खैराचे कापलेले झाड आणि त्याला फुटणारी नवीन पालवी |
पुढे
इंजिनीरिंगला पुण्यात आलो. कोथरूडला आलो की टेकडीवर जाणं ठरलेलं.
तेव्हा टेकडीवर जाण्यामागे टेकडीवरील हिरवळ हेही
एक महत्वाचं कारण असावं, कदाचित :-) मामांच्या चाणाक्ष नजरेतून ते नक्कीच सुटले नसेल!
तोपर्यंत, टेकडी हिरवी होऊ लागली होती. ग्लिरिसिडिया, पतंगी अशी विदेशी झाडं
मोठी होऊ लागली होती. कॉलेज नंतर मुंबई आणि नंतर बाहेरगावी गेलो परंतु मनात
टेकडीची जागा तशीच खोलवर रुजून होती.
![]() |
मोईच्या झाडाला लगडलेल्या बिया |
मुंबईची
गर्दी आणि पुण्याबद्दलचे प्रेम ह्यामुळे पुण्यात स्थायिक होण्याचे ठरले. पत्नीचे
काका कोथरूडमधील आणि शिक्षण ही पुण्यातले त्यामुळे त्यांनाही टेकडी तशीच प्रिय. घर
घेण्याचे ठरले तेंव्हा कोथरूड ही स्वाभाविक निवड होती,
टेकडी जवळ असेल तर फारच उत्तम. ह्या विचाराने घर नक्की झाले. साधारण एक वर्षाने
पुण्यात शिफ्ट झालो. अजून बिल्डिंग पूर्ण व्हायची होती त्यामुळे सुरुवातीला ६-७ महिने
दादाच्या फ्लॅटमध्ये राहू
लागलो. ती बिल्डिंग म्हातोबा टेकडीला लागूनच
होती आणि घरातून म्हातोबा टेकडीचा देखावा फारच सुंदर दिसे. तीच
म्हातोबा टेकडीशी पहिली ओळख.
![]() |
टेकडीच्या
पायथ्याशी फुललेला बहावा |
रात्री
दिवे लावले आणि खिडक्या उघड्या राहिल्या की खूप वेगवेगळे किडे घरात येत असत. म्हातोबा
टेकडी एआरएआयच्या
टेकडीशी जोडलेली. परंतु ही टेकडी थोडी वेगळी वाटायची.
का कोण जाणे सुरुवातीला खूप प्रसन्नं नाही वाटायचं. म्हातोबा टेकडीवर जाणे म्हणजे दुधाची
तहान ताकावर भगवण्यासारखे वाटायचे. हळुहळू ओळख वाढत गेली. म्हातोबा टेकडी, तिथले
पक्षी, पावसाळ्यातील ओढे, एआरडीच्या (डीआरडीओ) हद्दीतील
लपलेला छोटासा झरा, तेथील सुगरणीची घरटी, पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारा पावश्याचा
(Brain-fever bird) आवाज सगळे आपलेसे वाटू लागले. शक्य होईल तसं आलटून पालटून एआरएआयची
टेकडी आणि म्हातोबा टेकडीवर जाणे सुरूच होते.
पक्षी
निरीक्षणाची
आवड असल्यामुळे 'Basic Ornithology' चा कोर्स केला. त्यातून पक्षी, पक्ष्यांचा अधिवास,
टेकडी ह्याकडे बघण्याचा एक दृष्टीकोन मिळाला. त्यातूनच पुढे टेकडीवरील
झाडांकडे लक्षं गेले. गवताळ टेकडी ही एक
परिसंस्था आहे हे लक्षात आले. इथे दिसणारे (बऱ्याचदा नुसता आवाजच ऐकू येणारे) ग्रे
फ्रँकोलीन हे ह्या गवताळ टेकडीचे मूळ रहिवासी हे लक्षात आले. ह्या कोर्सच्या निमित्तानेच
ढोले काकांची ओळख झाली आणि त्यांच्या झाडं लावण्याच्या उपक्रमाबद्दल माहिती मिळाली.
मामांबरोबर ही झाडा-फुलांच्या गप्पा सुरूच होत्या. त्यातूनच, आपणही थोडेफार का होईना
झाडांविषयी काम करावे हे मनात रुजत होते. त्यातूनच पुढील २-३ वर्षात देशी झाडांच्या
बिया पेरणे, लहान रोपांना दगडांचे छोटेसे कुंपण करणे असे उद्योग सुरु झाले.
![]() |
| निसर्गाचे कॅलेंडर. पावसाच्या काही दिवस आधी उगवणारे हे विशिष्ट कंदाचे फुल |
निसर्गाविषयी शास्त्रीय माहिती घेऊन
पुढे जाऊन काहीतरी भरीव काम करावे ह्या उद्देशाने, २०१६ साली इकॉलॉजिकल सोसायटीचा एक
वर्षाचा 'Ecology & Sustainability' या विषयाचा डिप्लोमा केला आणि त्यातून निसर्गाकडे
बघण्याचा पूर्णच नवा दृष्टिकोन मिळाला. तो आयुष्यातला एक 'टर्निंग पॉइंट' म्हणावा लागेल.
खूप नवीन वाटा दिसू लागल्या. समविचारी तसेच वेग-वेगळ्या विषयातील जाणकारांशी ओळख झाली.
आमची पहिलीच फील्ड-ट्रिप एआरएआयच्या टेकडी वर होती. इतकी वर्षं अनुभवलेल्या
टेकडीची, तेथील झाडांची नव्यानेच ओळख झाली. निसर्गाचे विवध पैलू, जसे की
'succession', जमिनीचे प्रकार, geo-climatic zones' ह्या नवीन संकल्पना समजल्या. आपली
टेकडी ही 'पश्चिम घाट' आणि सोलापूर जिल्ह्यातील गवताळ प्रदेश ह्याला जोडणाऱ्या
'Transition Zone' च्या सुरुवातीला आहे हे समजले. चांदणी चौक हा 'पश्चिम घाट' आणि टेकडीला
जोडणारा किती महत्वाचा दुवा आहे हे लक्षात आले. जशी काही उत्तरे उलगडली तसेच मनात खूप
नवीन प्रश्न निर्माण झाले. टेकडीवर खड्डे करून नवीन झाडे लावण्याचा अट्टाहास करावा
की नाही? की
गवताचे साम्राज्य अबाधित राहू द्यावे? टेकडीचे
हजार वर्षांपूर्वी-दहा हजार वर्षांपूर्वीचे स्वरूप कसे
असेल? असे
बरेच नवीन प्रश्नं. एक नक्की समजले, निसर्गात self -healingची जबरदस्त ताकद आहे
त्यामुळे मानवनिर्मित दबाव कमी केले, की
निसर्ग स्वतःच बहरतो आणि स्वतःचें अपेक्षित रूप धारण करतो. ह्या सगळ्या विचारात टेकडी
नव्याने कळली. एक मात्र घडले; हे सगळे विविध पैलू अनुभवताना टेकडीवर
फिरण्याचा वेग मंदावला!
जमिनीतील
पाणी याबद्दल नेहमीच एक उत्सुकता होती, की
जमिनीत पाणी कसे साठवले जाते. त्याच उत्सुकतेतून `ACWADAM’ संस्थेचा
'Ground Water Science and governance in India' हा कोर्स केला. त्यातून काही कोडी
उलगडली. खडकांचे विवध प्रकार, 'Groundwater recharge zone -discharge zone' ह्या संकल्पना
समजल्या. टेकडीकडे बघण्याचा हा अजून एक नवीन दृष्टीकोन मिळाला. जिवंत झऱ्यांकडे
लक्षं गेले, टेकडीवरील काही भागात असेलेल्या दाट झाडांमागील रहस्य काहीसे उलगडले. जमिनीत
पाणी मुरण्यामागे गवताची, जमिनीच्या प्रकाराची भूमिका समजली. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या
विहीरी-झरे ह्यामागील टेकडीची भूमिका प्रकर्षाने लक्षात आली.
![]() |
| लहानपणी
लागलेल्या आगीवर मात करून खंबीरपणे उभे असलेले चारोळीचे झाड. मुळापासून आलेले तीन फुटवे
ह्याचीच साक्ष देतात. |
ह्या
सगळ्यातून एक दिशा नक्की झाली: नेटिव्ह झाडांच्या बिया गोळाकरून त्या टेकडीवर पसरवणे
व निसर्गाला ठरवू देणे की कोणती व किती झाडे जागवावी. हा उपक्रम हळुहळू जोर
धरू लागला. ह्याच दरम्यान सोसायटीमध्ये निसर्ग फोटो प्रदर्शन झाले आणि त्यातूनच
'Nature Group'ची स्थापन झाला. निसर्गाविषयी जागरूक
असणारे, समविचारी जण एकत्र येऊ लागले आणि तेही ह्या उपक्रमात सहभागी झाले. लहान मंडळीही
बिया गोळा करणे, शेंगा फोडणे ह्यात सर्वात पुढे असतात. सोसाटीतील मित्र-मैत्रिणी टेकडी
बद्दलचे अनुभव-फोटो-निरीक्षणे यांची देवाणघेवाण करू लागले. ह्यातून
नव-नवीन पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरे, झाडे ह्या बद्द्लची माहिती वाढतच आहे. आता
टेकडी ही एक जागा न राहता आम्हा सर्वांसाठी जणू एक विद्यापीठ'च
झाली आहे.
![]() |
| माणसाने खैराच्या झाडावर घाव केला. त्यातूनही ते आपल्याला डिंक देते. हाच आहे निसर्गाचा उदात्त भाव. |
लहानपणी 'मामाच्या गावातील' टेकडीशी
जुळलेले हे नाते दिवसेंदिवस अजूनच दृढ होत आहे आणि हा प्रवास असाच सुरु रहावा!
टेकडीवर फिरण्याचा आनंद मी मनमुराद घेत आहे,खरंतर इतक्या जवळ निसर्गाच्या कुशीत शिरायची संधी मिळतेय,हे आपले भाग्य आहे!
उत्तर द्याहटवाखूप छान लेख!!!
खुप छान!
उत्तर द्याहटवा