अल्बर्ट आईन्स्टाईन

 -  डॉ. हिम्मतराव देवरे 

अल्बर्ट आईन्स्टाईन हे जगाच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रज्ञ. त्यांचे विज्ञान व सैद्धांतिक भौतिकशास्त्र यामधील योगदान हे केवळ अद्वितीय आहे. प्रत्येक जण त्यांना ‘E = mc²’ या समीकरणाचे जनक म्हणून ओळखतो. आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद आज जगातील असंख्य विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना परिचित आहे.

विश्वाची रचना कशी आहे, विश्वाची निर्मिती कशी झाली आणि विश्वाचा अंत कसा होईल इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आईन्स्टाईनने भौतिकशास्त्रामध्ये लावलेल्या शोधांचा वापर शास्त्रज्ञांनी केला. याशिवाय आपल्याला काळ आणि अवकाश या संकल्पनांचे मापन एका नव्या आणि विस्मयकारक पद्धतीने करता आले.

आईन्स्टाईन हे अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ तर होतेच पण ते एक थोर विचारवंतही होते. स्वातंत्र्य, न्याय, समता या संकल्पना मानणारे होते. प्रसंगी आपल्या जीवाला धोका पत्करूनही जीवनाच्या या मूल्यांविषयी बोलण्याचे धाडस त्यांच्यामध्ये होते.

आईन्स्टाईन यांचा जन्म १४ मार्च १८७९ ला दक्षिण जर्मनीच्या उल्म या गावी एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात झाला. बालपणी डोक्याचा आकार मोठा व मागे निमुळता होता. छोटा अल्बर्ट उशिरा बोलायला लागला. तो मतिमंद आहे की काय ही शंका आली. पुढे तो बळकट व निरोगी बनला. तो नेहमी एकटाच खेळत बसायचा. ठोकळे रचणे, कोडी सोडविणे यात रमायचा. पत्त्यांचे १४ मजली उंच बंगले रचण्यात तासनतास घालवत असे. त्याचा स्वभाव खूप रागीट होता. तो जेव्हा रागवायचा, तेव्हा पूर्ण चेहरा पिवळा पडायचा व नाकाचा शेंडा पांढरा व्हायचा. स्वतःवरील ताबादेखील सुटायचा. एकदा त्याने आपला संताप व्हायोलिन शिकविणाऱ्या शिक्षिकेच्या अंगावर खुर्ची फेकून व्यक्त केला, तर एकदा लहान बहिणीवर खुरप्याने हल्ला केला. त्यावेळी शालेय शिक्षण पद्धती विचार करायला व कल्पकतेला वाव न देणारी होती. अल्बर्टला घोकंपट्टी करायला आवडत नसे. तो नेहमी शाळा बुडवायचा. जर शाळेत आला, तर मागे बसायचा व हसायचा. त्यामुळे तो शिक्षकांना अप्रिय होता.

आईन्स्टाईन लहान असताना वडिलांनी त्याला होकायंत्र दिले. त्यामध्ये बाह्य जगतापासून पूर्ण अलिप्त असलेली सुई सुरक्षित पण अदृश्य शक्तीने बांधलेली होती. म्हणून उत्तर दिशा दाखवत होती. हे लक्षात आल्यावर अल्बर्ट उत्तेजित झाला. त्याला कंप सुटला व अंग गार पडले. त्यावेळेस त्याला जाणवले की वस्तूच्या पलीकडे अदृश्य असे काहीतरी दडलेले असते. त्या गूढ शक्तीची उकल करण्याचा ध्यास घेतला. या साध्या भेटीमुळे त्याच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. तसेच एकदा भूमितीचे पुस्तक हाती लागले तेव्हा त्याची सृजनशीलता वाढीस लागली.

फोटो विकिपिडियावरून साभार

स्वित्झरलँडमध्ये झुरिच येथून पदवी घेतल्यानंतर बर्न येथे त्यांनी पेटंट ऑफिसात कारकून म्हणून सात वर्षे नोकरी केली. या कालावधीत बरेच शोधनिबंध प्रकाशित केले. पीएच.डी.चा प्रबंध पूर्ण केला आणि भौतिकशास्त्राची दिशा बदलली. त्यांच्या ‘E = mc²’ या समीकरणाने सिद्ध केले की लहानशा वस्तुमानाचे प्रचंड ऊर्जेत रूपांतर होते. सापेक्षतावादाचा सिद्धांत त्यांनी मांडला. प्रकाशविद्युत परिणामांच्या (फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट) शोधासाठी १९२१ चे नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आले.

त्यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत असे भाकित करतो की, एखादी वस्तू जितक्या वेगाने प्रवास करते, तितक्या प्रमाणात तिच्यासाठी काळ मंद गतीने जातो. म्हणून एखादा अंतराळवीर जर प्रकाशाच्या गतीने अवकाशात गेला आणि दुसरा मनुष्य पृथ्वीवर राहिला तर अंतराळवीरासाठी काळ अधिक मंद  गतीने जाईल. जेव्हा तो अंतराळवीर पृथ्वीवर परत येईल, तेव्हा तो पृथ्वीवर असलेल्या माणसाइतका वृद्ध होणार नाही. तसेच अल्बर्ट यांनी केलेली सापेक्षतेची व्याख्या - "सुंदर मुलीबरोबर तुम्ही प्रियाराधन करत असता, तेव्हा एक तास तुम्हाला एका सेकंदाप्रमाणे भासतो आणि जेव्हा लालबुंद निखाऱ्यावर एक सेकंदभरच बसता, तेव्हा तो एक सेकंद एक तासासारखा वाटतो. सापेक्षता म्हणतात ती हीच."

विनोदप्रिय आईन्स्टाईन

अल्बर्ट आईन्स्टाईन यांची विनोदबुद्धी असामान्य होती. अल्बर्टसारख्या बुद्धिमंताची ड्रायव्हरने फिरकी घ्यावी असंही एकदा घडलं. सापेक्षता सिद्धांताच्या प्रचारार्थ अल्बर्ट जिथे जिथे जाई तिथे तिथे हा ड्रायव्हर सोबत असे. त्यामुळे त्यांची व्याख्याने ड्रायव्हरला तोंडपाठ झाली होती. एकदा ड्रायव्हर आईन्स्टाईन यांना म्हणाला,  "साहेब, तुमच्या जागी मीच व्याख्यान दिलं तर?" आईन्स्टाईन यांना काय लहर आली कुणास ठाऊक. "ठीक आहे तर. पुढच्या लेक्चरला तू हो आईन्स्टाईन आणि मी होतो ड्रायव्हर!" एका निमंत्रणाच्या जागी दोघे गेले. समारंभाच्या वेळी ड्रायव्हर आईन्स्टाईन म्हणून मंचावर गेला आणि आईन्स्टाईन स्वतः मागे बसले. भाषण अगदी अस्खलित झाले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. शेवटी एका श्रोत्याने एक अवघड प्रश्न विचारला व ड्रायव्हरने न डगमगता उत्तर दिले, "या प्रश्नाचे उत्तर इतके सोपे आहे की मागे बसलेला माझा ड्रायव्हरही ते देऊ शकेल." आणि ड्रायव्हरच्या वेशातील आईन्स्टाईननी त्या प्रश्नाचे उत्तर दिले.

विनयशील आईन्स्टाईन

आईन्स्टाईनने वरिष्ठ तसेच कनिष्ठ लोकांशीसुद्धा मैत्री केली. एकीकडे ते भौतिकशास्त्रातील अवघड समस्या सोडवीत तर दुसर्‍या बाजूस एखाद्या स्थानिक व्यक्तीबरोबर व्हायोलीन वाजवीत. मुलांमध्ये ते सहजपणे रमत.

प्रिन्स्टन येथील शेजारच्या एका आठ वर्षाच्या मुलीने एके दिवशी त्यांना गणितातील एक शंका विचारली आणि ती सोडवून आपला गृहपाठ संपवण्यास मदतीची विनंती केली. त्यावेळी आईन्स्टाईन हे जगातील एक महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते. ते अगदी सहजपणे तिला पिटाळून लावू शकले असते, पण ते तिला म्हणाले, "मला तुला शिकवायला आवडेल. पण मग शाळेतील इतर मुलींवर अन्याय केल्यासारखे होईल." तिने त्यांच्यासाठी चॉकलेट आणले होते, ते त्यांनी घेतले व तिला एक कुकी दिली. त्यांनी कधीच आपल्या नावाचा मोठेपणा मिरवला नाही.

साधी राहणी

आईन्स्टाईन यांची राहणी साधी होती. आपल्या दिसण्याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. वेळ वाचावा म्हणून एकाच रंगाचे अनेक सूट खरेदी केले होते. छिद्रे पडतात म्हणून कधीही मोजे घातले नाहीत. एकदा तर त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीतसुद्धा मोजे घातले नव्हते. ते गबाळे आणि विक्षिप्त होते. आपले नूडल्ससारखे कुरळे केस ते कधीच विंचरत नसत.

त्यांनी एकदा रॉकफेलर फाउंडेशनचा पंधराशे अमेरिकन डॉलरचा चेक बुकमार्क म्हणून वापरला. शेवटी ते पुस्तकच गहाळ झाले. त्यांना गलेलठ्ठ पगाराची अपेक्षा नव्हती. ते ड्रायव्हिंग शिकले नाहीत. संस्थेजवळ एक दुमजली घर होते, एवढीच त्यांची संपत्ती. ते रोज चालत कामाला जात.

त्यांचे प्राण्यांवर प्रेम होते. प्राण्यांमुळे आयुष्यातील दुःखे दूर होतात असे ते मानत. चिको नावाचा कुत्रा सतत त्यांच्याबरोबर असायचा. त्यांना मांजरी देखील आवडायच्या. त्यांच्या अभ्यासिकेत अनेक मांजरी ठेवल्या होत्या. टायगर नावाचा एक बोका होता. ते प्राण्यांशी सहानुभूतीपूर्वक वागायचे.

त्यांना जरी पोहायला येत नसले तरी ते नौकाविहार करायचे. एकदा त्यांची नाव खडकावर आपटून उलटली, त्या वेळेस त्यांना एका मोटरबोटने वाचवले.

आईन्स्टाईनना डॉक्टरांनी अनेक बंधने घातली होती. त्यांना तंबाखू सेवन करण्यास मनाई केली होती. तरीही ते एक छोटा पाईप सोबत ठेवत आणि लपवून तंबाखूचे झुरके घेत असत. पाईप पेटविण्यासाठी लागणारी काडेपेटी ते दुसऱ्यांकडे मागत.

अलौकिक बुद्धिमत्ता

आईन्स्टाईन अतिशय बुद्धिमान होते. अखेरच्या दिवसात प्रिन्स्टन येथे राहत होते. प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वैद्यकीय केंद्रात १८ एप्रिल १९५५ रोजी वयाच्या ७६व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचा मेंदू काढून घेण्यात आला आणि तो पुढील अभ्यासासाठी जतन करण्यात आला. शास्त्रज्ञांना सामान्य माणसे व आईन्स्टाईनसारख्या असामान्य माणसाच्या मेंदूमधील फरक तपासायचा होता. त्यांच्या मेंदूचे २४० पातळ काप करून ते जतन करण्यात आलेत, तसेच अनेक प्रकारे त्याची छायाचित्रे घेण्यात आली. त्यांच्या मेंदूची रचना असामान्य होती असे संशोधकांना आढळले. त्यांच्या मृत्यूच्या दिवशी या महात्म्याला श्रद्धांजली म्हणून ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने अतिशय मार्मिक बातमी दिली.

"येथे अल्बर्ट आईन्स्टाईन राहत होते" 

या मजकुरासोबत दाखविलेली पृथ्वी असलेले अंतरिक्षाचे एक रेखाचित्र प्रसिद्ध केले.

संदर्भ :

१.     अल्बर्ट आईन्स्टाईन – अ‍ॅलीस कॅलाप्राइस आणि ट्रेवर लिप्सकोंब

२. अल्बर्ट आईन्स्टाईन - विनोदकुमार मिश्र, साकेत प्रकाशन

३. इनोव्हेशन, आईन्स्टाईनच्या नजरेतून - विरेंदर कपूर

४. अल्बर्ट आईन्स्टाईन - फियोना मॅकडोनाल्ड, रूपांतर : श्रीराम शिधये

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज