अनवट वाटेवरील प्रवास

सानिया किर्लोस्कर हिची उज्ज्वला वाघने घेतलेली मुलाखत

    आजची आपली तरुण पिढी ही जास्त प्रयोगक्षम व स्वतंत्र विचारसरणीची आहे. आपल्या विचारांशी प्रामाणिक राहताना साचेबद्ध जीवनप्रणालीला छेद देऊन त्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व कष्टांची, संकटांना सामोरे जाण्याची मानसिकता आजच्या आपल्या तरुण पिढीमध्ये आहे. यासाठी आजचे तरुण अनवट आणि अवघड वाटेवरून चालण्यास कचरत नाही. अशाच पिढीचे प्रतिनिधित्व करते आजची आपली पाहुणी सानिया किर्लोस्कर. फिरण्याची आवड आणि नावीन्याचा ध्यास यामुळे तिने अनेक गोष्टी अनुभवल्या, मानवी स्वभावाचे पैलू जोपासले. तिचे आवडते वाक्य...

Travelling is something that leaves you speechless and turns you into a storyteller.

‘टीच फॉर इंडिया’ मध्ये असताना वडगाव येथील शाळेत दोन वर्षे काम करून मग सानियाने ऋषिकेशजवळ ‘गुलर दोगी’ या डोंगराळ भागात काम केले आणि नंतर ‘सनबर्ड ट्रस्ट’ या संस्थेतर्फे मणिपूरमधील दुर्गम खेड्यात जाऊन तेथील मुलांच्या शिक्षणाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यात ती सफलही झाली. ह्या आणि अशा अनेक गोष्टींचा खजिनाच ती आपल्या समोर ठेवणार आहे. उज्ज्वला वाघशी मारलेल्या गप्पांमधून उलगडलेला सानियाचा प्रवास-


उज्ज्वला - सानिया, तू सुरु केलेल्या या अनवट वाटेवरील प्रवासाची सुरुवात कशी झाली?

सानिया - मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बायोटेक्नॉलॉजीची पदवी तसेच Biodiversity - जैवविविधता या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. मला विज्ञानाची आवड असल्याने मला वन्य जीवन आणि संवर्धन यात संशोधन करायचे होते. पण मग मला असे लक्षात आले की शिक्षणक्षेत्रामध्ये या सर्व संधी उपलब्ध आहेत. संगीत, वन्यजीव, कला या सर्वांसाठी शिक्षणक्षेत्र हे एक व्यासपीठ आहे असे मला वाटते.

 ‘टीच फॉर इंडिया’ तर्फे पदवीधर मुलांची भारतातील उपेक्षित मुलांसाठी असलेल्या शाळांमध्ये दोन वर्षांसाठी नेमणूक करण्यात येते. या दोन वर्षांमध्ये शाळा हे माध्यम विचारात घेऊन मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळण्यासाठी प्रायोगिक बदल घडवून आणण्याची संधी आपल्याला मिळते. ‘Be the change you wish to see’ या तत्त्वाचा अवलंब करण्यासाठी पुण्यात वडगाव बुद्रुक येथील एका शाळेत माझी नेमणूक झाली.

मी येथे शाळेतील उपेक्षित मुलांसाठी शिक्षण रंजक करण्यासाठी प्रयत्न केला. 'कचरा व्यवस्थापन', ‘क्रिएटिव्ह सॅटरडे’ अशा अनेक कल्पना राबवल्या. ‘क्रिएटिव्ह सॅटरडे’ अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत लोकांना शाळेत आमंत्रित करून त्यांचे अनुभव कथन सादर केले गेले. या अंतर्गत महेश काळेंनाही आमंत्रित केले होते. त्यांनीही मुलांशी संवाद साधला आणि मुलांना आपला 'कट्यार काळजात घुसली' हा सिनेमा दाखवला. याच शाळेतील वेगळा अनुभव म्हणजे येथील विज्ञान प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी सर्वच स्तरावर काम करावे लागले. मुले, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच नगरसेवक या सर्वांशी चर्चा घडवून त्याचे महत्त्व पटवून द्यावे लागले आणि त्यात मी यशस्वी ही झाले. मला वाटते, या फेलोशिपमध्ये आपल्यात नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते.

उज्ज्वला – या अनुभवानंतर तू ऋषिकेश आणि मणिपूरमधील दुर्गम भागात जाऊन काम केलेस. पुण्यात बालपण अनुभवलेली तू, तुला येथील मुलांचे बालपण बघताना शहरी आणि ग्रामीण भागात कोणते वेगळेपण जाणवले?


सानिया – ऋषिकेशजवळील ‘गुलर’ हे गाव गंगा नदीजवळ आहे. ऋषिकेश हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असल्याने येथील मुलांना थोडेफार एक्स्पोजर होते, परंतु त्यांच्या अडचणी वेगळ्या प्रकारच्या होत्या. उदा. शाळेत येताना वाटेत अस्वल दिसणे, दरड कोसळणे, प्रचंड पाऊस अशा नैसर्गिक अडचणी त्यांना येत असत. अशा अडाचणी आपल्या शहरी जीवनात आपल्याला जाणवतही नाहीत. या शाळेमध्ये विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या जवळपासच्या गावातून येत असत त्यामुळे या सगळ्या मुलांसाठी  पालक सभा भरविणे अशक्य होते आणि म्हणूनच पालकांशी संवाद साधण्यासाठी आम्ही प्रत्येक गावात भेट देत असू. ऋषिकेशमध्ये काम केल्यानंतर अजून दुर्गम भागात जाऊन काम करायचा आत्मविश्वास वाढला आणि ईशान्य भारतातल्या मणिपूरमधील नोने जिल्ह्यातील इजोरांग या अत्यंत दुर्गम गावातले काम सुरू झाले. या गावात जाण्यासाठी कच्चा रस्ता असल्याने जिल्ह्यापासून चार तास लागे. या गावात किराणा दुकान तसेच भाजी मंडई सारख्या सुविधाही नव्हत्या, गावात विजेचा पत्ताही नसे. सलग एकवीस दिवस आम्ही विजेशिवाय काढले. या सगळ्या अडचणी असूनही तिथल्या गावातील प्रेमळ आणि सध्या लोकांमुळे आम्हाला रोजच प्रेरणा मिळत राहिली. येथील मुले निसर्गाच्या खूप जवळ होती. मासेमारीचे वेगवेगळे प्रकार, कोणते मशरूम खाण्यास योग्य आहेत याची माहिती, तसेच शिकार करण्याचे विविध प्रकार यामध्ये पारंगत होती. मला वाटते, निसर्गाच्या, पर्वतांच्या सान्निध्यात राहात असल्याने या मुलांमध्ये एक प्रकारचा सच्चेपणा मला जाणवला.

उज्ज्वला – दुर्गम परंतु निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या इजोरांग गावातील दैनंदिन जीवन कसे असेल याची उत्सुकता आहे. त्याची थोडक्यात ओळख करून द्यावीस असे वाटते.

सानिया - नक्कीच! येथील लोक कोणतीही गोष्ट विकत घेत नाहीत. स्वतःचे कपडे, घर, अन्न हे स्वतः तयार करतात. हे लोक पहाटे लवकर उठून भरपूर जेवण करतात आणि दिवसभर कष्ट करतात व लवकर झोपतात. मला वाटते, या दिनचर्येमुळे त्यांना आजाराला फारसे सामोरे जावे लागत नाही.अनेक आजारांवर ते काही पारंपारिक उपायानेच उपचार करतात. या नैसर्गिक उपचारपद्धतीवर त्यांचा खूप विश्वास आहे. एका आजींनी हात मोडल्यावर देखील प्लास्टर लावण्यास नकार दिला. त्यांच्या मते नैसर्गिकरित्या ते भरून येईल.

स्वयंपाकघर हे या लोकांचे गप्पा मारण्याचे ठिकाण असावे कारण याठिकाणी संध्याकाळी लोक गोळा होतात. एक मोठे टेबल असते त्याभोवती ते जमतात. एका मोठ्या चुलीवर काहीतरी नवीन प्राण्याची शिकार करून ते शिजवले जाते, त्या चुलीच्या वरती एक जागा असते तिथे उरलेले मांस साठवून ठेवले जाते. येथील लोक घोरपड, साप, रानडुक्कर, साळींदर, बेडूक असे अनेक प्राणी खातात. वन्यजीव संवर्धनाच्या (Wildlife conservation) दृष्टिकोनातून मी त्यांना अनेक दुर्मिळ प्राण्यांची शिकार करू नका हे सुरुवातीला सांगू लागले परंतु नंतर मला कळले की अतिशय दुर्गम भाग असल्याने शिकार करणे हा त्यांच्या परंपरेचा एक भाग आहे. मी सुध्दा मांसाहारी आहे परंतु त्यांच्यासाठी कोणत्याही प्राण्याचे मांस (तो प्राणी पाळीव असो व वन्यप्राणी असो) जगण्यासाठीची गरज आहे हे लक्षात आले आणि मला माझ्या विचारातील विरोधाभास जाणवला. दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून द्यायचे असेल तर त्याची सुरुवात शाळेतल्या मुलांपासूनच होऊ शकते, यांची जाणीव झाली. त्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांमधून वन्यजीव संरक्षणासाठी प्रयत्न चालू झाले.


उज्ज्वला – कला, संगीत, खेळ हा या लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग या मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी तू कोणते वेगळे प्रयोग केलेस?

सानिया - पुण्यातील चित्रकार आभा भागवत यांना आम्ही इजोरांग येथे आमंत्रित केले. त्यांनीही अतिशय प्रेमाने मुलांना घेऊन शाळेच्या आणि वसतीगृहाच्या भिंती रंगवल्या. यामध्ये बालवाडी ते दहावी सर्व इयत्तांमधल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. भिंतींवर मुलांनी मणिपूरचा राज्यपक्षी ‘मिसेस ह्यूम्ज फिजंट’ (Mrs. Hume’s pheasant) तसेच राज्यपुष्प ‘शिरुई लिली’ (Shirui lily), मासेमारीचे व शिकारीचे विविध प्रकार, लहानग्या मुलांना पाठीवर बांधून काम करणाऱ्या स्त्रिया अशी अनेक चित्रे रंगवली.

तसेच पुण्यातील दोन नाट्यकलाकार पार्थ वाईकर आणि मंदार कुलकर्णी यांनी मणिपूरला येऊन पंधरा दिवसांचे नाट्यशिबिर भरवले आणि मुलांचे एक नाटक बसवले. यामधून मुलांच्या सुप्त गुणांचा विकास झाला, असे मला वाटते.



उज्ज्वला – तुझ्या या प्रवासातील एखादा अविस्मरणीय अनुभव सांगशील?

सानिया - येथे मासेमारीची एक वेगळीच पद्धत बघायला मिळाली. ती म्हणजे अलबेझिया आणि वॉलनट या झाडांची साल चुरगाळून पाण्यात (तलावाच्या) टाकतात आणि त्यातील केमिकल्समुळे ते मासे निश्चेष्ट (paralyse) होऊन पाण्यावर तरंगतात आणि मग ते हाताने उचलून बाहेर काढले जातात. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याचा अभ्यास करावा म्हणून एके दिवशी मासेमारीसाठी आम्ही मुलांबरोबर जंगलातून नदीकडे जाण्यासाठी निघालो. वाटेत मुलांनी या झाडाची पाने आणि साल घेतले. आम्ही चालत असतानाच समोरून काही माणसे येताना दिसली. त्यांच्या पोषाखावरून ती मला लष्कराची माणसे वाटली आणि मी त्यांना अभिवादन केले. ते जवळ आल्यावर लक्षात आले की ते लष्कराचे लोक नव्हते, तर शस्त्रास्त्र बाळगलेले अतिरेकी होते. त्यावेळी मनात अत्यंत भीती दाटून आली कारण त्यांच्या भाषेतील काही ठराविक वाक्यंच आम्हाला माहिती होती. उदा. - जेवलात का? कसे आहात? धन्यवाद इत्यादी. यावेळी मनात विचार आला, अरे, आपण आम्हाला वाचवा, आम्हाला जाऊ द्या ही वाक्ये पाठ करायला हवी होती. परंतु जवळ आल्यावर त्यांनी मुलांना आमच्याबद्दल विचारले आणि आम्ही मुलांना शिकवण्यासाठी येथे आलो आहोत हे कळल्यावर ते निघून गेले. तरीसुद्धा ती पाच मिनिटे आम्ही घाबरलो होतो हे नक्की, कारण याआधीही अनेक हिंसक प्रकार या भागात घडलेले होते. याला इतिहास आहे आणि कित्येक वर्षं संघर्ष, हिंसा अनुभवलेल्या भागात वाढलेली ही जमात आहे. ह्या भागात बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण हे किती शक्तिशाली माध्यम ठरू शकते यांची जाणीव त्यावेळी झाली. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.

उज्ज्वला – सानिया, वेगळ्या ध्येयाने प्रेरित अशा जीवनाच्या वाटेवरील तुझे प्रेरणास्थान कोण आहे?



सानिया – सर्वात पहिले आई-बाबा. माझा बाबा बार्क्लेजतर्फे सीएसआरमध्ये काम करत होता. त्याच्याकडून मला एका मुलींच्या शाळेत विज्ञान शिकवायची संधी मिळाली. शाळेत शिकवताना तुम्हाला खूप आनंद आणि समाधान मिळते हे लक्षात आल्याने मग मी शिक्षणक्षेत्रात काम करण्यास उद्युक्त झाले. नंतर ‘टीच फॉर इंडिया’ तर्फे दोन वर्षांची फेलोशिप पूर्ण केली. आईबाबांनी मला सतत प्रोत्साहन दिले आणि आवडते करियर जोपासताना कोणतेही निर्बंध घातले नाहीत.

दुसरी व्यक्ती म्हणजे माझा नवरा गीत. जो स्वतः एक ट्रेक लीडर आहे तसेच सध्या ‘आऊटडोअर एज्युकेटर’ म्हणून ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहे. सहास्तित्वाचं (coexistence) तत्त्व आम्ही नेहमी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. आपापल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उत्कटतेने काम करण्यासाठी आम्ही सतत एकमेकांना प्रोत्साहन देत असतो. आमचे एक स्वप्न आहे की वर्क, सेव्ह अ‍ॅन्ड ट्रॅव्हल यामधून संपूर्ण जगप्रवासाचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. मला वाटते, आईबाबा आणि गीतच्या पाठिंब्यामुळेच मी येथवर पोहोचले.

उज्ज्वला – या अनुभवातून आपल्या शिक्षणपद्धतीत कोणता बदल तुला अपेक्षित आहे?

सानिया - मला वाटते घरात असताना आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो. आपले जग मर्यादित असते. बाहेर पडले की वेगवेगळ्या अनुभवातून, लोकांच्या संपर्कातून आपली मानसिकता घडत जाते. भारतातल्या शिक्षणक्षेत्राबाबत मला आईन्स्टाईनचे एक वाक्य आठवते,

‘You cannot judge a fish by its ability to climb a tree.’

आपण एकाच निकषावर वर्गातल्या प्रत्येक मुलाचे मूल्यांकन करतो. मला असे वाटते की शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आपली बलस्थाने ओळखून ती कशी वाढवता येतील याकडे लक्ष देण्यासाठी शिक्षकाने प्रयत्न केले पाहिजेत. सध्या फक्त ज्ञान, माहिती यावर भर दिला जातो, याऐवजी कौशल्ये, मानसिकता, अनुभव यांवर भर दिला जावा असे मला वाटते.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज