समाने श्रुतीचा चेंडू उचलला
आणि गोखले काकांच्या गच्चीवर फेकला. गोखले काकांचे घर गेली पाच वर्षे बंद होते. हे
आठवून रडत रडत श्रुती समाच्या घरी गेली. समाचे आई बाबा ऑफिसमध्ये असल्यामुळे घरी फक्त आजी होती. आजीने श्रुतीला
रडत रडत त्यांच्या अंगणात येताना बघितले व ती काय झाले हे बघायला बाहेर आली.
श्रुती म्हणाली समा ताईने माझा चेंडू...माझा चेंडू... समाच्या आजीने तिला आत
बोलावले व श्रुतीने पूर्ण हकीकत आजींना सांगितली. श्रुतीचे बोलून झाले तेवढ्यातच समाची
आई घरी आली. श्रुतीने पुन्हा पूर्ण गोष्ट सांगितली आणि ती तिच्या घरी गेली. समा घरी
आल्यावर तिची आई तिला खूप रागावली. नंतर तीन-चार दिवस समाने
आईचे सगळे नीट ऐकले. हे पाहून आजी म्हणाली "आता समा सुधारली आहे".
तीन-चार दिवसानंतर आजीने समाला औषध आणायला सांगितले. रस्त्यात समाला
तीन ते चार मुलं लपाछपी खेळतांना दिसली. तिने राज्य घेणाऱ्या मुलाला कोण कुठे लपले
आहे हे सांगितले. अशाच काही प्रकारांनी ती लहान मुलांना त्रास देऊ लागली. हळूहळू
ती अजून गंभीर गोष्टी करू लागली आणि त्या मुलांचे आई बाबा घरी येऊन समाच्या
तक्रारी करू लागले. समाच्या आईने तिला समजावले पण सगळे व्यर्थ गेले.
एके दिवशी, शिक्षा
म्हणून तिच्या आईने तिला अंगणातल्या झाडाला बांधले. समाने आसपास खेळत असलेल्या
मुलांना हाक मारली पण तिचा आवाज ऐकून सगळे पळून गेले. तिची आजी देवळातून आली आणि
समाला पाहिले. आजीने समाला सोडले. दुसऱ्या दिवशी तिने शेजारच्या आजींची बेल
वाजवली. आजींना उठता येत नव्हते. तर एकदा तिने देविकाच्या दुधाच्या बोर्डवर
अर्धाच्या आधी ४ लिहिले आणि ते साडेचार झाले. दुसऱ्या दिवशी देविकाची आई दूधवाल्या
काकांना रागावली आणि म्हणाली "मला काय सगळ्या कॉलनीसाठी
खीर बनवायची आहे का?" एके दिवशी समाने तिच्या
मैत्रिणीच्या निबंधाच्या
वहीची पाने चिकटवली.
तर एका मैत्रिणीच्या अंगावर शाई सांडली.
मिहिका नावाची तिची एक मैत्रीण होती. तिने तिला सांगितले की "तिच्या घराच्या जवळ नवीन माणसं राहायला आली आहेत". त्यादिवशी समाने घरी गेल्यावर संपूर्ण घरचा अभ्यास संपवला. हे पाहून आजीला नवल वाटले. समा म्हणाली "मी खेळायला जाते" आणि ती तिच्या मैत्रिणीने सांगितलेल्या पत्त्यावर गेली. ती जागा जंगलाजवळ होती. तिथे कोणीच राहत नव्हते. एका ओसाड मैदानावर एक पडके घर होते. तिला सर्व खिडक्या बंद दिसल्या हे बघून तिला आश्चर्य वाटले. खिडकीच्या एका छोट्याशा फटीतून तिने डोकावले आणि बराच वेळ वाट बघत राहिली की कोण कधी बाहेर येईल. तेवढ्यात एका माणसाचे लक्ष तिच्याकडे गेले. तिला काही कळण्याच्या आतच त्याने तिचा हात धरला आणि ओढत त्या घरात घेऊन गेला. तो म्हणाला "इथे गुपचूप बस" आणि तिला बंदूक दाखवली. समाने ओरडायचा प्रयत्न केला पण तिथे कोणीच नव्हते आणि हे सगळे व्यर्थ गेले. तिने इथे तिथे बघितले . तिला समजले की हे लोक वाईट आहेत. तेव्हाच मिहिका समाच्या घरी पोहोचली आणि म्हणाली "समा कुठे आहे? मला तिला अभ्यासाबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे". समाची आजी म्हणाली "अगं बाळा, ती खेळायला गेली आहे". मिहिकाने विचार केला आणि ती म्हणाली, "मला माहीत आहे ती कुठे असेल. तिथे जाऊन मी तिला माझा प्रश्न विचारते आणि तुम्हाला हवं असेल तर तिला घरी पाठवते".
मिहिकाने नेहमीच्या खेळण्याच्या जागी समाला शोधले. ती कुठेही नव्हती. नंतर तिला सकाळचे त्यांचे बोलणे आठवले. ती पळत पळत त्या नवीन माणसांच्या घराजवळ गेली. तिने समाला आजू-बाजूला शोधले. तिला समा कुठेच दिसली नाही. तिला वाटले उगीचच तिने असा विचार केला की समा इथे येईल. गंमत म्हणून तिने त्या घराच्या खिडकीतून डोकावले. तर आश्चर्य म्हणजे काय, तिला चक्क असे दिसले की तिच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीला बांधले होते. तिला काही कळेना, तिने थोडा विचार केला मग ती कॉलनीत गेली आणि लोकांचे दार वाजवून तिने हे सांगितले. पण कोणाचा विश्वास बसेना. सगळ्यांनी हा समाचा खेळ समजून दुर्लक्ष केले. तिथे खेळत असलेल्या काही लहान मुलांनी मिहिकाला बघितले. त्यांनी तिला विचारले "काय झाले?". बाकी कोणीच मदत करत नाहीये समजून मिहिकाने त्यांना सगळे सांगितले. दोन-तीन मुले म्हणाली "बरं झालं, असंच पाहिजे". पण मिहिकाने त्यांना कसं बसं समजावलं. शेवटी सगळी मुलं तयार झाली. मिहिका सगळ्या मुलांना घेऊन त्या पडक्या घरापाशी गेली. सगळ्यांनी हळूच पडद्यांच्या फटीतून डोकावले तर त्यांना एकूण चार माणसं दिसली. मग त्यांनी काय करायचे ठरवले.श्रुतीने बेल वाजवली. एका माणसाने दरवाजा उघडला. तो म्हणाला, " काय हवे आहे?"
श्रुती म्हणाली, "मला खूप तहान लागली आहे, तुम्ही मला पाणी द्याल?"
तो माणूस पाणी आणायला आत गेला. या संधीचा फायदा घेऊन दरवाजामागे लपलेली मिहिका आत घुसली आणि टेबलाखाली लपली. त्या माणसाने पाणी दिल्यावर श्रुती म्हणाली, "माझा चेंडू झाडात अडकलाय. मला काढायला मदत कराल का? तुम्हाला एकट्याला नाही जमणार, अजून एक कोणीतरी लागेल".
तो माणूस अजून एका माणसाला घेऊन बाहेर निघाला. मग राजूने मागच्या दाराची बेल वाजवली आणि म्हणाला, "तुमच्यासाठी माझ्या घरी फोन आला आहे. फोनवर जे बोलले ते म्हणाले त्यांना या घरातल्या कोणाशी तरी बोलायचे आहे."
त्या माणसाला हे खरे वाटले आणि तो लगेच निघाला. त्याला वाटले बाकीचे सगळे घरीच आहेत. त्याने विचारले, "कुठे आहे तुझे घर?"
तो मुलगा म्हणाला, "हे जंगल दिसतय ना, ते पार करा आणि मग लगेच आहे."
त्या माणसाला वाटले की कोणाला कळू नये म्हणून त्याच्या सोबत काम करणाऱ्या लोकांनी तिथे फोन केला असेल. तो लगबगीने तिथे गेला. त्यांच्यातला जो चौथा माणूस होता, तो झोपला होता. मिहिकाने या संधीचा फायदा घेतला आणि समाला सोडवले. दरवाजा उघडून दोघी बाहेर आल्या. सगळी मुलं तिथे तिच्यासाठी थांबली होती. ते सगळे एका झाडामागे लपले.
एकेक करून त्या घरातील चारही जण घरी आले आणि त्यांनी बघितलं तर, समा गायब. सगळ्यांनी डोक्यावर हात मारला आणि ती कुठे जवळपास आहे का बघायला ते खिडकीबाहेर डोकावले तर त्यांना अजूनच मोठा धक्का बसला. त्यांचे घर पोलिसांनी वेढले होते. हे पोलीस त्या लहान मुलांनी बोलावले होते. पोलीस जोरात ओरडले, "तुमचे घर घेरले आहे. स्वतःला पोलिसांच्या हवाली करा."
पोलीस आत शिरले आणि त्यांना अटक केली. पोलिसांची गाडी बघून सगळे आसपासचे लोक तिथे गोळा झाले होते. पोलीस बाहेर आले आणि म्हणाले, "तुम्हां मुलांचे कौतुक आहे. वर्षानुवर्ष ज्यांना आम्ही शोधत होतो ते आज तुमच्यामुळे मिळाले. त्यांची पूर्ण टोळी आम्ही लवकर शोधून काढू."
समा म्हणाली, "त्याची काही गरज नाहीये. मला जेव्हा यांनी पकडले होते तेव्हा मी ऐकले - त्या टेबलावर जी लाल डायरी ठेवली आहे, त्यात कोण कुठे आहे ते आणि सगळ्यांचे नंबर आहेत."
पोलीसांनी तिच्याकडे कौतुकाने पाहिले. तेवढ्यात समाची आई तिथे पोहोचली. तिने समाला जवळ घेतले. मग समा स्वतःहून पुढे आली आणि म्हणाली, "तुम्हाला आजपर्यंत जो माझ्यामुळे त्रास झाला आहे त्याबद्दल मला माफ करा. मी तुम्हाला वचन देते मी असे पुन्हा गंमत म्हणून सुद्धा करणार नाही आणि यानंतर कधीही कोणाला माझ्यामुळे त्रास होणार नाही."
- आर्या ठेंगोडकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा