-
यमाजी मालकर
आर्थिक
साक्षरता हा आधुनिक जगातील एक महत्वाचा विषय आहे. पण त्याविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे
त्यात अनेक नागरिक भागच घेत नाहीत. त्यामुळे केवळ ते नागरिकच मागे राहात नाहीत तर देशाच्या अर्थकारणावरही त्याचा विपरित परिणाम
होतो. कोरोनासारख्या अभूतपूर्व संकटात तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. अशा
या आर्थिक साक्षरतेची गरज सोप्या शब्दांत समजून घेऊया...
बदल
ही जगात एकच शाश्वत गोष्ट आहे, असे म्हटले जाते आणि ते खरेच आहे. त्यामुळेच भारतीय
तत्त्वज्ञान आणि संस्कृती ही किती चांगली आहे, हे आपण सांगत असताना आपल्याला पाश्चिमात्य
व्यवहार श्रेष्ठ आहेत, हे मान्य करावे लागते आणि त्यांचे अनुकरणही करावे लागते. आधुनिक
काळातील असे व्यावहारिक बदल भारतीय समाज काही प्रमाणात स्वीकारतो आहे, पण अशा बदलांचा
वेग आता इतका वाढला आहे की समाजाचे स्थैर्य त्यामुळे संकटात सापडते की काय, अशी भीती
व्यक्त होऊ लागली आहे. अर्थात, अशी भीती मनात ठेवण्यापेक्षा या बदलांना सामोरे जाणे,
हेच आपल्या हिताचे आहे.
आता
असे कोणते बदल आर्थिक साक्षरता म्हणून समजून घेतले पाहिजेत आणि
त्यातील कोणते आत्मसात केले पाहिजेत, हे पाहूया. त्यातील एक अत्यावश्यक पहिली पायरी
म्हणजे सर्वांना समान संधी देण्याची क्षमता असलेले बँकिंग नियमितपणे
करणे होय. दुसरी पायरी म्हणजे आर्थिक पारदर्शकता देणाऱ्या डिजिटल व्यवहारांचा स्वीकार
करणे. त्यापुढील पायरी म्हणजे जमिनी, सोने, घरे यात अधिक गुंतवणूक न करता पैसा जेथे
फिरता राहतो आणि जेथून तो पाहिजे तेव्हा परत मिळू शकतो, अशा पद्धतीने तो गुंतविणे.
ती गुंतवणूक म्हणजे बँका, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, निवृती योजना, विमा अशा मार्गाने
तो फिरता ठेवणे, जेणेकरून आपल्या देशातील व्याजदर इतर विकसित
देशांसारखेच कमी होऊ शकतील. जे आपल्या तरुण पिढीच्या फायद्याचे आहे. थोडक्यात चलन ही
वस्तू नसून ते माध्यम असल्यामुळे ते सर्वांपर्यंत पोचले पाहिजे. पैशाचा माध्यम म्हणून
वापराचा हा जो बदल आहे, तो विकसित देशांनी केला आणि त्यामुळे ते अर्थकारणात ते आपल्या
पुढे गेले. आपल्या समाजातीलही अनेकांनी हा बदल स्वीकारला असून त्यामुळेच बँकांतील व्यवहार
मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील थेट अशी गुंतवणूक
वाढली आहे. आरोग्य आणि जीवन विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एवढेच नव्हे तर पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या प्रथमच एवढी वाढली आहे. कोरोना
संकटात आपल्याला असे लक्षात येईल की ज्यांनी पैसा गुंतविला होता, त्यांच्यावर तुलनेने
कमी आर्थिक ताण आला. पण ज्यांनी त्याचा विचारच केला नव्हता, त्यांना तो ताण अधिक जाणवतो
आहे.
अशा
या नव्या बदलात पैसा संघटित व्यवस्थेत जातो आहे आणि त्यामुळे
त्याचे नियंत्रण सोपे होते आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे पैसा संघटित क्षेत्रात जातो आहे, यावरून बोटे मोडत बसण्यापेक्षा आपण त्यातील
वाटा सर्वापर्यंत कसा जाईल, यासाठी आता प्रयत्न केले पाहिजेत. हा बदल थेट एक उदाहरण
समोर ठेवून आपण समजून घेऊ. भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स
इंडस्ट्रीने कोरोना संकटाच्या काळात दोन लाख कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक मिळविली
आहे. त्यामुळे ती कंपनी आता १४ लाख कोटी रुपयांचे (२०० अब्ज डॉलर्स) बाजारमूल्य असलेली
कंपनी झाली आहे. एवढे मूल्य होणे, हा जगात एक महत्वाचा टप्पा मानला जातो. बाजारमूल्य
म्हणून पहायचे तर ती जगात पहिल्या ४० मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी झाली आहे. पण मुद्दा
केवळ विक्रमांचा नाही. मुद्दा आहे, जगातील पैसा कोठे फिरतो आहे आणि त्यात आपला समाज
भाग घेतो आहे का, हे समजून घेण्याचा आहे. त्यात भाग घ्यायचा म्हणजे आधी अर्थसाक्षर
व्हायचे आणि अर्थकारणाचा परिणाम आपल्या जीवनावर होतो आहे, तो समजून घेऊन त्यानुसार
आपल्या विचारांत बदल घडवून आणायचा. मानवी जीवनाचे पैशीकरण (monetization) झाले आहे, हे वाईटच, पण त्यातून माणसाची सुटका करण्याचा एकमेव मार्ग
आहे, तो म्हणजे पैशाच्या वितरणाचा न्याय्य मार्ग शोधून काढणे. तो मार्ग म्हणजे आधी
पैसा सर्वापर्यंत पोचण्याची व्यवस्था उभी करणे. अधिकाधिक नागरिक आर्थिकदृष्ट्या साक्षर
झाल्याशिवाय तशी व्यवस्था उभी राहू शकत नाही. त्यामुळे जगातील बदलत्या अर्थकारणाचे
भान ठेवून त्यानुसार मानवी प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी ‘अर्था’च्या मदतीने सज्ज होणे.
त्याची सुरवात मात्र प्रत्येकाला स्वत:पासून करावी लागणार आहे.
आता
आपण आर्थिक साक्षरतेची एक दशसूत्री जाणून घेऊया.
१.
शुद्ध भांडवल म्हणजे पर्यायाने शुद्ध
पैशांचा वापर करण्याचा संकल्प करूया.
२. राष्ट्रीय
संपत्तीचे न्याय्य वितरण करावायचे असल्यास बँकिंगशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे
बँकिंगला प्रोत्साहन देऊया.
३. भविष्यातील
आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणुकीचे नवे मार्ग समजून घेऊ. सोने, जमीन आणि केवळ गुंतवणूक
म्हणून घरांत गुंतवणूक ही आपल्या आणि देशाच्या दृष्टीने फायद्याची नसल्याने बँक एफडी,
शेअर बाजार, म्युच्युअल फंड, निवृत्तीसाठीच्या विमा योजना हे नवे गुंतवणुकीचे मार्ग
सल्लागारांमार्फत चोखाळूया.
४. जीवन
विमा ही गुंतवणूक नसल्याने तो न काढता त्यातील टर्म इन्शुरन्स हा तरुणपणीच घेऊ या.
५. भविष्यात
आरोग्यावरील खर्च वाढतच जाणार असल्याने कुटुंबाचा आरोग्य विमा सर्वात आधी काढून घेऊ या.
६. बँकिंग
व्यवहार आणि डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढवू या. यामुळे अर्थव्यवहारातील
पारदर्शकता वाढते, जी देशाचा महसूल वाढण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपली सर्व बिले
डिजिटल स्वरुपात भरली तर आपला वेळ आणि खर्च वाचतो.
७. ज्या
गुंतवणुकीतून अव्वा की सव्वा परतावा मिळणार असे सांगितले जाते, अशा फसव्या गुंतवणुकीपासून
दूर राहू या.
८. गुंतवणुकीला
चांगला परतावा मिळण्यासाठी बहुतेक गुंतवणुकीला दीर्घकाळ द्यावा लागतो, त्यामुळे जी
रक्कम पुढील काही महिन्यात लागणार आहे, अशी रक्कम जोखीमीच्या
गुंतवणुकीत अडकविण्याची चूक टाळू या.
९. गरज
नसताना खरेदीची अनेक प्रलोभने बाजार दाखवीत असतो, पण जेव्हा अधिक किंमतीची वस्तू घेण्याची
वेळ येईल, तेव्हा ती आपल्याला खरोखरच गरजेची आहे काय, हे तपासूनच खरेदी करू या.
१०. गुंतवणूक
आणि आर्थिक नियोजनाच्या नोंदी ठेवणे अत्यंत आवश्यक असते. जीवनात दुर्दैवाने काही संकटे
आली तर आपण केलेल्या गुंतवणुकीचा लाभ आपल्या कुटुंबाला सहजपणे
मिळेल, याची काळजी घेऊया.
कोरोना संकटात आणि संकटानंतरचे दहा
कलमी आर्थिक नियोजन
कोरोनासारख्या संकटात ज्यांच्याकडे बचत आणि गुंतवणुकीची पुंजी आहे, अशा नागरिकांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात अनेक कुटुंबं आर्थिक अडचणीत सापडणार आहेत. शिवाय व्यापार उदीमावर मोठा परिणाम झाल्यामुळे अनेकांना रोजगार मिळणेही कठीण
होणार आहे. मध्यमवर्गीय नागरिकांनाही आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी
आपल्या आयुष्यात अनेक बदल करावे लागणार आहेत. या बदलांचा स्वीकार
करणे क्रमप्राप्त आहे. असे हे बदल कोणते असू शकतात आणि त्या संदर्भात त्यांना निर्णय
घेण्यास मदत व्हावी म्हणून ही दहा कलमी आर्थिक नियोजनाची मांडणी...
१.
आपल्याकडे असलेली पुंजी
कोरोना साथीचे संकट दूर होत नाही, तोपर्यंत जपून वापरा.
जोपर्यंत उत्पन्न सुरु होत नाही, तोपर्यंत अनावश्यक
खरेदी लांबणीवर टाका.
२.
उत्पन्नावर मर्यादा आल्या
असतील तर आवश्यक खर्चाची नोंद करून त्यानुसारच दर महिन्याला खर्च होतो आहे ना, याची काळजी घ्या. मात्र तशी कल्पना कुटुंबातील सदस्यांना द्या.
३.
इन्कमटॅक्स रिटर्न, घराचे कर्जाचे हप्ते, विमा पॉलिसीचे हप्ते, वाहन विमा, आरोग्य विमा हप्ते अशा अत्यावश्यक
गोष्टींसाठी सरकारने सवलत जाहीर केली आहे. हा सर्व पैसा या काळात नागरिकांच्या खिश्यातून
लगेच जाणार नाही, यासाठी या सर्व हप्त्यांच्या
मुदतीत वाढ केली आहे. पुरेशी रक्कम नसेल तरच या सवलतींचा फायदा घ्या. पुंजी असेल तर
अशा सर्व हप्त्यांचा भरणा वेळच्या वेळी करणे हेच आपल्या हिताचे आहे.
४.
एफडी, पीपीएफ, युलिप योजना, म्युच्युअल फंडातील रक्कम ही अशा वेळी कामाला येते. पण म्हणून ती काढून घेतलीच
पाहिजे असे नाही. ती काढल्यास त्या गुंतवणुकीचे दीर्घकालीन काही फायदे आपल्याला गमवावे
लागतात. त्यामुळे शक्य तेवढीच रक्कम काढा.
५.
आर्थिक अडचण असेल, आणि आपल्याकडे एलआयसीच्या पॉलिसी असतील तर ते कर्ज घेणे तुलनेने खूप सोपे आहे.
एलआयसी त्यावरील व्याज दर सहा महिन्यांनी घेते. मुद्दल तुम्ही
दर सहा महिन्यांनी किंवा तुमची पॉलिसी मॅच्युअर होईल तेव्हाही देऊ शकता.
६.
आपण आधी बचत तसेच गुंतवणूक
करायला हवी होती, असे अशा संकटाच्या काळात
आपल्याला वाटू लागते. पण कोणतीही चांगली गोष्ट करण्यास उशीर होत नसतो, असे म्हणतात. त्यामुळे आता ती सुरुवात करा. सुरवात
अगदी छोटी केली तर चालेल.
७.
गुंतवणुकीची सुरुवात करताना सर्वाधिक
महत्वाची गुंतवणूक ही आरोग्य विम्याची आहे. तो अजून काढला नसेल तर आधी तो काढा. आणि
तो सर्व कुटुंबाचा काढा. दरवर्षी विशिष्ट रक्कम तिचा हप्ता म्हणून जाते, त्यामुळे आपल्याला काहीच मिळत नाही, असे वाटू शकते. पण जेव्हा घरातील सदस्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासारखा आजार होऊन
अधिक खर्च येतो, तेव्हा या विम्याचा जो आधार
मिळतो,
त्यामुळे आपले कुटुंब आर्थिक संकटातून वाचू शकते.
८.
जे ६० वर्षावरील ज्येष्ठ
नागरिक आहेत आणि ज्यांना खात्रीची गुंतवणूक करावयाची आहे, त्यांच्यासाठीच्या दोन सरकारी गुंतवणूक योजना ७ टक्के व्याज मिळवून देणाऱ्या आहेत.
बँक एफडीचे व्याजदर आता कमी होत असले तरी ज्येष्ठ नागरिकांना सरकारने खास सवलत जाहीर
केली आहे. त्यानुसार सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम आणि प्रधान मंत्री वय वंदन योजनेत गुंतवणूक
केल्यास अजूनही तुम्ही ७ टक्के व्याज मिळवू शकता. (ही योजना आता ३१ मार्च २०२३ पर्यंत
खुली करण्यात आली आहे.) ज्या ज्येष्ठ नागरिकांना इतर गुंतवणूक आणि त्यातील जोखमीचा
अनुभव नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांनी
कोणत्याही अधिक परताव्याच्या गुंतवणुकीचा मोह बाजूला सारून या दोन योजनांचा फायदा घेतला
पाहिजे.
९.
कोरोनाच्या संकटात आणि त्यानंतर
जगाच्या आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत नजीकच्या भविष्यात अनेक चढउतार येणार आहेत.
त्यामुळे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही अधिक जोखमीची ठरू शकते. त्यामुळे
एकाच वेळी अधिक रक्कम अशा गुंतवणुकीत गुंतवू नका. मात्र या गुंतवणुकीचा परिचय असल्यास
एसआयपी पद्धतीने म्हणजेच दर महिन्याला विशिष्ट रक्कम अशी गुंतवणूक सुरू करा. हे संकट मागे पडले की भारताची अर्थव्यवस्था लवकर म्हणजे पुढील वर्ष - दोन वर्षात झेप घेऊ शकते.
१०. अर्थव्यवस्था लवकर रुळावर यावी, यासाठी सरकारने २० लाख कोटी रुपयांचे ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेज जाहीर केले आहे. त्यात
अनेक क्षेत्रांना मदत जाहीर केली आहे. विशेषतः उद्योग व्यवसायांना पतपुरवठा होत राहील, याची काळजी घेतली आहे. त्यातील कोणत्या सवलतींचा आपण फायदा घेऊ शकतो, याचा अभ्यास करा. ज्यांनी आतापर्यंत आपले व्यवहार बॅंकांमार्फत केले आहेत आणि
ज्यांची पत (क्रेडिट हिस्ट्री) चांगली आहे, त्यांना बँका कर्ज देण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे अशा सवलतींचा लाभ घ्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा