कुत्रा पाळू की नको?

-      पद्मिनी खांडेकर

साधारणपणे दोन वर्षांपूर्वी मला ‘साम्राज्य’मधल्या एका बारा वर्षांच्या मुलाच्या बाबांचा फोन आला. “माझ्या मुलाला कुत्र्यांची अतिशय आवड आहे पण घरी आम्हाला कोणालाच कुत्रे पाळण्याचा अनुभव नाहीये. तर कुत्रे पाळण्याचे प्लस आणि मायनस पॉईंट्स सांगाल का?”

हा प्रश्न मला काही नवीन नव्हता. माझ्या हातात सतत असणाऱ्या बेल्टमुळे आणि बेल्टच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या अ‍ॅस्ट्रोमुळे आत्तापर्यंत अनेक मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी हा प्रश्न विचारला होता. प्रश्न विचारणारी जास्त करून पाचवी-सहावीत असणारी मुले असायची. तेव्हा मला जाणवले की जेव्हा मूल स्वतंत्र व्हायला लागते, तेव्हा त्याला आई - वडील, आजी आजोबा, मित्र मैत्रिणी सोडून प्रेमाची भूक भागवायला, लाड करायला कोणीतरी हवे असते. तेव्हा खरोखर कुत्र्यासारखा दुसरा सोबती नसतो. कुत्रे हे कधीच मोठे न होणारे एक बाळ असते. त्यामुळे घरात सतत एक जिवंतपणा असतो. हल्ली एकेकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा दूर करण्यासाठी, मायेचा स्पर्श अनुभवण्यासाठी खास प्रशिक्षित कुत्री असतात. स्वमग्न (autistic) मुलांकरता, त्यांचे वाचनकौशल्य वाढण्याकरता ‘चांगले लिसनर' म्हणून ट्रेनिंग दिलेली स्पेशल कुत्री असतात.

तर, कुत्रा हा त्याच्या खेळकरपणामुळे, निरागसतेमुळे, हुशारीमुळे, घरात निखळ आनंद पसरवणारा कुटुंबातील एक सदस्य होऊन जातो. एक गंमतशीर उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही दर पाच मिनिटांनी  घराबाहेर जाऊन कितीही वेळा घरात आलात तर तुमचा कुत्रा तुमचे स्वागत प्रत्येक वेळी तितक्याच आनंदाने करेल पण असे घरातली कुणीही कितीही लाडकी व्यक्ती करेल का सांगा बरे...

पण या निखळ आनंदाकरता तुम्हाला कुत्र्याच्याही काही गोष्टी आधी काटेकोरपणे पाळाव्या लागतात.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता. आपल्या अंगी स्वच्छतेच्या सवयी असतील तर आपल्या पाळीव प्राण्याच्या बाबतीतही त्या आपसूकच लागू केल्या जातात. म्हणजे तो केसाळ प्राणी असल्यामुळे त्याची वेगळी गादी, त्यावर स्वच्छ चादर, खाण्याची, पाणी पिण्याची रोज धुवून स्वच्छ केलेली भांडी, त्याची दर आठवड्याची आंघोळ, त्याचा वेगळा शाम्पू, औषधे, यांची ठराविक वेगळी जागा असे सर्व करावे लागते. स्वच्छतेच्या बाबतीतली एक अतिमहत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला शी, शूचे ट्रेनिंग देणे. सध्याच्या काँक्रिटच्या रस्त्यांमुळे कुठेच माती नसते. त्यामुळे एक तर त्याला डोंगरावर मातीमध्ये शी झाल्यावर त्यावर माती टाकायची सवय लावणे किंवा त्यानी माती टाकली नाही तर आपण ते मातीने झाकून टाकणे. नाही तर हल्ली पूप पिकर्स मिळतात पेटशॉपमध्ये. त्याने उचलून घरी फ्लश करून टाकणे, किंवा उत्तम मार्ग म्हणजे त्याला घरीच एका विशिष्ट जागी शी करायची सवय लावणे.



दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्त. आपल्या कुत्र्याचे आरोग्य उत्तम राहावे असे वाटत असेल तर त्याला सकाळी, दुपारी आणि रात्री असे तीन वेळा फिरायला नेणे, त्याला पळवणे. तुम्हाला कुठे बाहेर, गावाला जायचे असल्यास प्रथम ही सोय करणे आवश्यक असते. कुत्र्याचे बॉडी क्लॉक आधीच पर्फेक्ट सेट झालेले असते. त्यामुळे तुम्ही घड्याळात बघायच्या आधीच त्यांच्याकडून तुम्हाला पूर्वसूचना मिळते. त्या वेळा सांभाळणे महत्त्वाचे असते. तसे न केल्यास त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी चालू होऊ शकतात.

हे आणि यासारखे अनेक मुद्दे आहेत. काही लोक ही कुत्रे सांभाळण्याची १४-१५ वर्षांची जबाबदारी घेण्याऐवजी रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला घालून समाधान मिळवतात. पण मंडळी, यातही अनेक मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. पहिला म्हणजे आपण ' सहनिवास ' म्हणजे को-एक्झिस्टन्सचे महत्व जाणून या भटक्या कुत्र्यांना फक्त खायला घालणे किंवा फक्त काठीने/दगडाने मारणे हे टाळले पाहिजे. बरीचशी भटकी कुत्री त्यांचे त्यांचे अन्न शोधण्यास समर्थ असतात परंतु अगदी म्हातारी किंवा अपघात झाल्यामुळे चालण्यास असमर्थ असलेली कुत्री (उदा. आपल्या गेट बाहेर झोपून असलेली कुत्री) असतील तर त्यांना मदतीची गरज असते. त्यांना दूध, बिस्किटं सोडून कोणतेही अन्न थोडे लांब जाऊन दिले तरी चालते कारण एकदा का त्यांना समजले की या विशिष्ट जागीच खाणे मिळते आणि गेटच्या आत प्रवेश आणि खाणे दोन्ही मिळत नाही तर ते तुमच्याकडे बघणार सुद्धा नाहीत.

बरेचदा प्राणी आवडणारे आणि नावडणारे यांना असा प्रश्न पडतो की या रस्त्यावरच्या कुत्र्यांना एखाद्या मोठ्या मोकळ्या माळरानात कुंपण घालून एकत्र सोडून का देत नाहीत? तर त्यावर माझ्या परीने सगळीकडे चौकशी करून मी असे उत्तर मिळवले आहे, की कॉर्पोरेशन कडे इतकी मोठी जागा नाहीये आणि दुसरे म्हणजे कुत्र्यांमध्ये सुद्धा हद्दीवरून भांडणे होतात. त्यातून रेबीज पसरण्याची भीती असते. त्यामुळे सध्या या भटक्या कुत्र्याचे निर्बीजीकरण (sterilization operations) करून त्यांना परत त्यांच्याच परिसरात सोडतात. महानगर पालिकेच्या बरोबरीने अजूनही काही स्वयंसेवी संस्था सध्या हे कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्याचे काम करतात. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात राहील अशी आशा वाटते.

आपली देशी कुत्री सुद्धा अत्यंत हुशार, चपळ असतात. त्यातही काही उत्तम गुण असणारी म्हणजे उंच, देखणी, उत्तम रोगप्रतिकारक शक्ती, इथल्या वातावरणाशी जुळवून घेणारी असल्यामुळे शक्यतो यांनाच पाळण्याचा विचार केला तर सगळ्यांचेच भले होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज