- माधवी कुलकर्णी
आणि तो दिवस उजाडला. 'गेला माधव कुणीकडे' या जगप्रसिद्ध विनोदी नाटकातल्या 'प्रमिला बोडस' ह्या भूमिकेसाठी त्यांना एक नवीन चेहऱ्याची मुलगी हवी होती. ही मॉडेलिंग करणार्या मुलीची व्यक्तिरेखा असल्यामुळे त्यांना साधारण वीस-बावीसची मुलगी अपेक्षित होती. माझं वय थोडं जास्त होतं, पण बहुधा प्रमोद सरांना त्या भूमिकेसाठी मी अनुरूप वाटले असेन. आम्ही दोघी-तिघी जणी प्रमोद सरांबरोबर पार्ल्याला दीनानाथला पोहोचलो. प्रमोद सरांनी आम्हाला तोपर्यंत कल्पना दिली नव्हती कुठल्या नाटकासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय याची. आणि तिथे गेल्यानंतर रंगमंचावर गेलो तेव्हा नाटक संपलं होतं आणि समोर गोरा गोमटा गब्या 😁 हसतमुख असा साक्षात प्रशांत दामले! सगळ्यांचा लाडका प्रशांत दामले 😱...
तिथे त्यावेळेला मला काय बोलू आणि काय नको असं झालं होतं. खरंतर दडपण यायला हवं होतं, पण तसं काहीच झालं नाही, उलट मला मी खरंच वास्तवात आहे की स्वप्नात असं वाटून मी काय बोलतीये माझं मलाही कळत नव्हतं. तीच गोष्ट प्रशांत सरांना आवडली असेल. त्यांनी फारशी काही ऑडिशन वगैरे न घेता केवळ शब्दोच्चार किंवा वाक्य फेकण्याची पद्धत यावरच बहुधा माझी निवड केली असावी. आणि एका वेगळ्याच प्रवासाला सुरुवात झाली.
आधीच्या
कलाकाराला पर्याय म्हणून माझी निवड झाली होती, त्यामुळे सगळ्या
कलाकारांबरोबर माझी तालीम होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. सुरुवातीला कलावैभवच्या
व्यवस्तापकांनी माझी तालीम घेतली. पण सुदैवाने दोन सत्रं माधवी गोगटे यांच्याबरोबर
झाली. नाशिकचे पहिले तीन प्रयोग मस्त जमले आणि प्रशांत, विनय, माधवी, नीता
यांच्याबरोबर पुरेशी गट्टीही जमली. एका प्रसंगात मी प्रशांत सरांचं नाक पकडून
हलवायचे. आता आठवलं तरी हसू येतं ... इतकं अवघडल्यासारखं व्हायचं सुरुवातीला.
साधारण २० ते २५ दिवसानंतरच चौथा किंवा पाचवा प्रयोग, दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये होता. शिवाजी मंदिर म्हणजे नाटकवाल्यांची पंढरी. आणि त्यात प्रशांत दामले बरोबर काम करणं म्हणजे काय अप्रूप होतं, हे तेव्हा लक्षात नाही यायचं पण आता मात्र पदोपदी जाणवतं. शिवाजी मंदिरचा तो प्रयोग अतिशय अविस्मरणीय आणि माझ्यासाठी खरंच ऐतिहासिक ठरला.
तिसरा
प्रवेश झाल्यानंतर साधारण पाच ते सात मिनिटं मला मधल्या प्रशांत आणि विनयच्या सीनमध्ये
विश्रांती मिळायची आणि त्यानंतर लगेच माझा दुसरा प्रवेश असायचा. मधल्या काळात
कलाकारांनी मेकअप रूममध्ये न जाता, विंगेत
खुर्च्या ठेवलेल्या असायच्या, त्या खुर्च्यांमध्ये बसायचं
असा शिरस्ता होता. तसं मलाही ते पाठ झालं होतं. त्यामुळे तिथल्या विंगमध्ये मी
बसले होते. पण झालं काय, सुरुवातीचे तिन्ही प्रयोग खूप छान झाले होते त्यामुळे
माणसाला एकदा का फाजील आत्मविश्वास चढला, की कधी त्याची गाडी
कशी घसरेल सांगता येत नाही आणि तसंच काहीसं झालं.
माझ्या
मधल्या पाच मिनिटाच्या विश्रांतीमध्ये मी विंगेत जाऊन खुर्चीवर बसले. सगळीकडे
अंधार आणि स्टेजवर प्रशांत आणि विनय यांची धुवांधार फटकेबाजी चालू. प्रशांतच्या
एका ठरलेल्या वाक्यानंतर मला एन्ट्री घ्यायची असं सांगितलेलं असायचं आणि ते वाक्य
होतं, “अरे,काय सांगतोस काय?" त्या वाक्याला मी
प्रशांतच्या घराच्या दरवाजावर जाऊन उभं राहायचं आणि म्हणायचं, " हाय,... मला तुमची डिरेक्टरी मिळेल का?"
हे म्हणून एन्ट्री घ्यायची असं ठरलेलं असायचं. पण त्या दिवशी काय
झालं कुणास ठाऊक मी विंगेत बसलेले आणि माझं डोकं कुठेतरी भलतीकडेच भरकटलं. डोक्यात
काहीतरी वेगळेच विचार. काही सेकंदासाठी मी तिथून मनाने खूप बाहेर गेले, तन्द्री लागली बहुधा आणि भानावर आले त्या वेळेला मेकअप काका मागे येऊन मला
हाका मारत होते, “माधवी, जा, जा!” मी खडबडून जागी झाले आणि लक्षात आलं की माझ्या
एन्ट्रीची वेळ होऊन जवळपास एक ते दीड मिनिट उलटून गेलं होतं. बाप रे माझ्या
पायाखालची जमीनच सरकली.
कसं
असतं ना मंडळी, नाटकात विशेषतः विनोदी नाटकात, टायमिंगला प्रचंड महत्त्व असतं. एक सेकंद तुमचं टायमिंग चुकलं आणि तुमचा
हशा गेला, तुमच्या टाळ्या गेल्या. आणि अशा परिस्थितीत विंगमध्ये मी तब्बल एक दीड
मिनिट मूर्खासारखी बसून होते. अक्षरशः चुकलेच होते. भानावर आल्यावर मी तडक एंट्री
घेण्यासाठी स्टेजवर गेले. माझं ठरलेलं होतं त्याप्रमाणे प्रशांतच्या दारात उभी
राहिले आणि विचारलं, मोठ्याने हाक मारून विचारलं,
"मला ना तुमची डिरेक्टरी हवी आहे, मिळेल
का?" प्रशांत माझ्याकडे बघायला लागला. त्याच्या नजरेत
भाव होते, “अगं... गेलीस माधवी कुणीकडे?"😊🙈
मला काय करू कळेना. काळाची गरज होती, की मी चेहऱ्यावर हसू ठेवावं आणि मॉडेलच्या अविर्भावात खूप स्टाईल मारत डायलॉग म्हणावा. पण मनात तर भीती होती प्रचंड, की बाप रे माझी एन्ट्री मी दीड मिनिटे उशिरा घेतली. काय झालं तेवढ्या वेळात स्टेजवर कुणास ठाऊक. आणि प्रशांत माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता. माझी अशी फजिती व्हायची पहिलीच वेळ होती, त्यामुळे माझ्या मनातल्या संमिश्र भावना चेहऱ्यावर दाखवू द्यायच्या, की ठरलेले डायलॉग म्हणायचे, की प्रशांत आणि विनयच्या डायलॉग्जना प्रतिक्रिया द्यायची - जो काही गोंधळ त्यावेळेला माझ्या डोक्यात उडाला होता तो मला शब्दात सांगणं कदापि अशक्य. पण कशीबशी वेळ मारून नेली. प्रेक्षकांना कळलं नाही काय झालं, कारण मी येईपर्यंत प्रशांत आणि विनय यांनी त्यांची फटकेबाजी तशीच चालू ठेवली. ऑन द स्पॉट त्यांनी प्रचंड डायलॉग वाढवले, तेही विनोदी. डायलॉग वाढवले, प्रेक्षकांकडून हशा आणि टाळ्या मिळवल्या, पण जोपर्यंत मी येत नाही, तोपर्यंत त्यांनी स्टेजवर खिंड लढवली. मला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. माझा तो प्रवेश मी आटोपला आणि विंगेत येऊन खाली मान घालून बसले. मला वाटलं आता संपलं. प्रशांत सरांचा ओरडा खायला लागणार. विनय, माधवी गोगटेसुद्धा काय बोलतेय कुणास ठाऊक. पण सुदैवाने विनय आणि मी विंगेत एकत्र येण्याची वेळ फारच कमी यायची. कारण त्याचे सगळे डायलॉग्स पलीकडच्या विंगेतून असायचे. पण मी खुर्चीवर जाऊन बसले आणि पाचच मिनिटात माझ्या शेजारच्या खुर्चीवर प्रशांत येऊन बसले. मला म्हणजे मानच वर करवेना. प्रचंड खजील, प्रचंड अपराधी आणि प्रचंड वाईट वाटत होतं. पण प्रशांत सरांना सॉरी म्हणणं तर भाग होतं. कशीबशी मान वर केली तर प्रशांत सर माझ्याकडेच बघत होते. अंधार असल्यामुळे त्यांच्या चेहर्यावरच्या भावना काही मला दिसत नव्हत्या, पण मी तसं त्यांना कसंबसं अवसान आणून म्हटलं, " एक्स्ट्रीमली सॉरी, परत नाही होणार असं". पण तो माणूस इतका ग्रेट. काहीच रागाने बोलले नाहीत. म्हणाले, "इट्स ओके. अगं, होतं असं. पण याच्यापुढे काळजी घे ". मला म्हणजे असं झालं, की बाप रे त्यांना अशी स्टेजवर बॅटिंग करायची सवय असली, तरीसुद्धा नवीन आलेल्या सहकलाकाराला सांभाळून घेत, त्याला अपराधी वाटू न देता, त्याला प्रोत्साहित करत राहणं, हे कदाचित प्रशांत आणि प्रशांतसारखे अभिनयाने आणि कर्तृत्वाने महान असलेले लोकच करू शकत असतील . त्यांचा मोठेपणा म्हणून, माझी फजिती फार काही कोणाच्या लक्षात आली नाही आणि त्याचा कोणीच गाजावाजा केला नाही आणि प्रशांतनी तर नाहीच नाही. पुढच्या आयुष्यात प्रशांतसरांबद्दल खूप काही चांगल्या गोष्टी कळल्या. आत्ताच करोना च्या काळामध्ये प्रशांत सरांनी सगळ्या बॅकस्टेज आर्टिस्टना जी आर्थिक मदत केली, ती तर शब्दांच्या पलीकडची. पण मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते. ती फजिती होऊन किंवा इतक्या दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर राहून त्यांना जवळून बघता आलं, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. त्याकाळी मोबाईल फोनच नव्हते त्यामुळे माझा आणि त्यांचा तेव्हाचा फोटो नाहीये. नंतर त्यांच्या बऱ्याच नाटकांना जाऊन फोटो काढले, पण ‘गेला माधव’ मध्ये काम करत असताना स्टेजवर फोटो काढण्याची संधी मात्र मला कधी मिळाली नाही. पण ती फजिती आणि ‘गेला माधव’ हे नाटक मात्र माझ्या आयुष्यात एक सुखद आठवण, एक अवर्णनीय आनंद देणारी आठवण मनाच्या कोपऱ्यात कायम सजवत राहील. आणि हो, अजून एक. त्यानंतर आयुष्यभर कानाला खडा लावला. आपण करत असलेलं कुठलंही काम मनाने तिथेच उपस्थित राहून करायचं. तंद्री लावायची माझी ती सवय त्यानंतरच बहुधा संपुष्टात आली... 😁
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा