ऑस्टिओपॅथिक आणि कायरोप्रॅक्टिक ट्रिटमेंट

-      डॉ. स्वाती ठेंगोडकर

 

 वे दुपारची, मी माझ्या फिजिओथेरपी क्लिनिकचा शेवटचा पेशंट संपवून मुलींच्या शाळेच्या बसच्या वेळेआधी साम्राज्य ओल्ड गेट गाठण्याच्या तयारीत. तेवढ्यात माझ्या ऑर्किड्स क्लिनिकच्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या जोशीकाकू (नाव बदललेले), दरवाजा किलकिला करत आत डोकावतात,

"स्वाती निघालीस का घरी? अग, पंधरा दिवसांपासून माझा खांदा एकसारखी तुझी आठवण परत काढतोय ग!"

मी हसून म्हणाले, "काकू यावेळी तुमच्या उजव्या खांद्याचा नंबर असेल ना?"

जोशी काकूंनी हसत-हसत "तुझ्या बरोबर सगळं लक्षात राहतं" असं म्हणतच  क्लिनिक मधल्या ’शोल्डर पुली’वर एक्सरसाईज करायला सुरुवात केली होती. मी कधीच कोणालाही वेदनांमध्ये बघू शकत नाही, हे मला बारा वर्षे ओळखणाऱ्या आणि माझ्यावर मुलीसारखे प्रेम करणाऱ्या जोशीकाकू चांगलेच जाणून होत्या. घड्याळात दोन वाजले होते. मुलींची वेळ गाठण्यासाठी माझ्याकडे आत्ता फक्त वीस मिनिटेच होती. उद्याची अपॉइंटमेंट देण्यापूर्वी मला जोशी काकूंचं दुखणं थोडं तरी कमी करायचं होतं.

"अगं, दोन आठवडे झाले नीट केस विंचरले नाही, की साडी पिन-अप केली नाही. उजवा हात असल्यामुळे फार अडते सगळे. अगं इडली केली नाही किती दिवसात".

"कारण इडलीचा स्टॅन्ड वरती ठेवला असेल ना, आणि तुमचा हात तिथपर्यंत पोहोचू शकत नसेल आता."

शोल्डर व्हील थोडे तरी हलविण्याचा प्रयत्न करणाऱ्या काकूंना थांबवून मी हसत, "तुला बाई माझं सगळं कळतं" हे काकूंचं नेहमीचं वाक्य पूर्ण केलं आणि त्यांना खुर्चीत बसायला सांगितलं.

"अगं एवढा कॅनेडियन युनिव्हर्सिटीचा कोर्स केलाना तू, मग एकदाची ही माझी खांदेदुखी बरी करच, माझं डायबेटिस विसरून तुझे आवडते रव्याचे लाडू करून देईन तुला".

काकूंना लांब श्वास घ्यायला सांगून, त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला हात टेकवून हलकेच त्यांचे लिव्हर लिफ्ट केले. एक-दोन मिनिटे खांद्याच्या फऱ्याच्या हाडाखाली (scapula) दाब देऊन तिथला एक स्नायू मोकळा करून दिला.

"अगं खूप दुखतंय ग, तुला माझं दुखणं कमी करायचं आहे, वाढवायचं नाही".

" हो, हो, काकू झालं हो" असं चक्क लहान मुला सारखे समजावत मी काकूंना झोपायला सांगितले, थोडा वेळ लिव्हर आणि गॉल ब्लॅडरची हालचाल तपासून त्यांना उठायला सांगितले.

"काकू आता जरा उठून ते समोरचं बटन बंद करा!"

"अगं काय चेष्टा करतेस का माझी, किती उंचावर आहे ते, माझा हात एवढ्या वर पोहोचणार तरी आहे का?" असे म्हणत काकू उठल्या आणि उजव्या हाताने ते बटण बंद करून झटकन खाली बसल्या.  काकूंचा स्वतःवर विश्वास बसेना, परत परत हात पूर्ण कानाच्या वर पर्यंत नेऊन त्या बघू लागल्या.

"अगं काय जादू केलीस नक्की? पंधरा दिवसांपासून हाच हात हलत नव्हता, आता तर दुखणेही खूपच कमी झाले आहे" हात गोल फिरवत काकू म्हणाल्या.

"काकू, या जादूच्या ट्रीटमेंट नाव आहे, 'ऑस्टिओपॅथी (Osteopathy).

"ओके, म्हणजे तू गेली दोन वर्षे घेत असलेली मेहनत फळाला आली बघ स्वाती. घर ,मुली, क्लिनिक सांभाळून वरचेवर दिल्लीला जाऊन जे शिकत होतीस ती जादू हीच ना?" जोशी काकूंचा प्रेमळ प्रश्न.

मी समाधानाने हसून "हो" म्हंटलं.

"आता जाऊन तो इडलीचा स्टँड आधी खाली काढते".

"हो, आणि काकू उद्याच्या अपॉइंटमेंट आधी तुमचे नेहमीचे बेल्ट एक्सरसाइझेस करायला विसरू नका". मी नेहमीप्रमाणे क्लिनिक बंद करताना काकूंना होमवर्क दिला.

" हो तर, नक्की करते."

ऑस्टिओपॅथी (soft tissue manipulative techniques) आणि Chiropractic (bony alignment techniques) या विषयाचा अभ्यास भारतात सुरु झाला २०१३ मध्ये. स्वतःचे ज्ञान सतत वृद्धिंगत करण्याची आवड असल्याने, मी माझ्याच नकळत या नवीन शिक्षणाकडे आकर्षित झाले. त्यातच, माझे या विषयाचे पहिले भारतीय शिक्षक, डॉक्टर नारकीश सर यांच्यामुळे माझ्या जवळच्या नातलगांची अतिशय क्लिष्ट  मणक्याची शस्त्रक्रिया टाळली गेल्यामुळे मला या विषयाची अजूनच गोडी वाढली. माझे मूळचे शिक्षण फिजिओथेरपी असल्यामुळे या थोड्या 'हटके' पण परिणामकारक विषयांचे तंत्र शिकणे फारसे अवघड गेले नाही. २०१५ पासून modified osteopathic and chiropractic techniques for physiotherapist या विषयावर भारतातील विविध दिग्गज तज्ञांकडून नऊ छोटे-छोटे अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच कॅनेडिअन युनिव्हर्सिटीमधून ऑस्टिओपॅथीचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम २०१९ मध्ये यशस्वीपणे पूर्ण केला.

ऑस्टिओपॅथीचे हे क्लिनिकल पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यामुळे एकीकडे माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमधले यश वाढू लागले. अवघ्या एक किंवा दोन सीटिंग्स मध्ये पेशंटचे गॉल ब्लॅडर स्टोन तसेच किडनी स्टोन पडून जाऊ लागल्याचे दाखलेही सोनोग्राफी करून पडताळून पाहिले. त्यामुळेच पेशंट्सचा थेरपीवरचा विश्वास आणि माझा आत्मविश्वास दोन्हीही वृद्धिंगत होत गेले. २०१९ मध्येच, एकीकडे ऑस्टिओपॅथीचा कोर्स पूर्ण होत असतानाच, बोनी अलाईनमेंट या विषयावर शास्त्रोक्त प्रभुत्व मिळविण्यासाठी, स्वीडनच्या एकर्मॅन कॉलेज चा कायरोप्रॅक्टिक टेक्निक्सचा डिप्लोमा अभ्यासक्रम जोमाने सुरू झाला. माझ्या या स्पायनल अलाईनमेंट टेक्निक्सचा सगळ्यात जास्त फायदा आणि पुरेपूर समाधान मला मिळत होते ते माझ्या श्री क्षेत्र गोंदवले येथील ग्रामीण भागातल्या प्रॅक्टीसच्या माध्यमातून. साताऱ्यापासून जवळच असलेल्या गोंदवले येथे चैतन्य रुग्‍णालयात. श्री गोंदवलेकर महाराजांच्या विश्वासावर हजारो गोरगरीब दर महिन्याला गोंदवल्याला येतात. तेथे ऑर्थोपेडिक शिबिरामध्ये मोफत सेवा देताना कायरो प्रॅक्टिक टेक्निक्स आणि ऑस्टिओपथिक मॅनिप्युलेशनमुळे पाच-सहा वर्षापर्यंत सिरीयल सर्जरीज करूनही चालू न शकणारी लहान मुले एका सेशनमध्ये, स्वतःच्या पायावर चालत हसत हसत जेव्हा दवाखान्यातून बाहेर पडू लागली, तेव्हा मला मिळणारे समाधान काही औरच होते.

मार्च २०१९ मध्ये साम्राज्य सखी मंचातर्फे महिला कामगारांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामध्ये मी कायरोप्रॅक्टिक स्पायनल अलाईनमेंट टेक्निक्सचा प्रामुख्याने वापर केला होता.

ओव्हरियन सिस्ट, पीसीओडी, वंध्यत्व यासारख्या अनेक गायनिक समस्यांसाठीसाठी कॉम्बिनेशन ट्रीटमेंट (modified osteo- chiro techniques+ physiotherapy) वापरू लागल्यावर तर कितीतरी  दाम्पत्यांच्या शुभेच्छा मला भरभरून मिळू लागल्या.

ऑस्टिओपॅथिक ऑर्गन इंडक्शन ट्रीटमेंट करणे म्हणजे आपल्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्यागणिक होणारी प्रत्येक अवयवाची हालचाल संयमित करणे. ह्या कॉम्बिनेशन ट्रीटमेंटमुळे (modified osteo- chiro techniques+ physiotherapy) थायरॉईड, मधुमेह, अर्धशिशी, व्हर्टिगो, सायनस प्रॉब्लेम्स, निद्रानाश ( insomnia) या आणि यासारख्या अनेक आजारांवर यश मिळू शकते. यातल्या कितीतरी आजारांसाठी रुग्ण एका फिजिओथेरपिस्टकडे जाण्याचा विचार सहसा करणार नाही, पण हाच दृष्टीकोन आता बदलतोय आणि अजूनही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोहोचवण्यासाठी हा लेखन प्रपंच.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

पैसा पैसा पैसा...