- रा. त्र्यं. काकडे
दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही सोसायटीने कार्यकर्त्यांच्या सभेत ठरल्याप्रमाणे श्रावण महिन्यात विद्वांस गुरुजींच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. सोसायटीत मागील दोन - तीन वर्षांपासून विद्वांस गुरुजींच्या कीर्तनाचा कार्यक्रम साधारण ऑगस्ट महिन्याच्या आसपासच असतो. त्यांच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे कार्यकर्त्यांनाही एक चांगला कार्यक्रम केल्याचं श्रेय दर वर्षी मिळत असतं.
विद्वांस गुरुजी म्हणजे पौरोहित्य करणार्या मंडळींमधील एक मोठं प्रस्थ. त्यांच्या बाह्य व्यक्तिमत्वाने अन् ज्ञानानेसुद्धा ते मोठेच. फारसे उंच नसणारे... काहीसे स्थूल... रंगाने गोरे... सतत अष्टगंधाचा टिळा लावणारे... गळ्यात रुद्राक्षासारखे दिसणार्या मण्यांची माळ घातलेले... राहिलेले केस व्यवस्थित विंचरलेले... गोल चेहर्याचे... हसरे... नेहमीच धोतर अन् अंगरखा घालणारे विद्वांस गुरुजी म्हणजे पूजा सांगणारे गुरुजी कसे असावे अशी जी कल्पना असते अगदी तसे. ते आमच्या सोसायटीतच नव्हे तर बाहेर सुद्धा चांगले प्रसिद्ध आहेत. आमच्या सोसायटीतला कुठलाही धार्मिक विधी त्यांच्याशिवाय झालेला मला आठवत नाही. हे गुरुजी आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे यजमानांकडे जे पूजासाहित्य असेल त्या साहित्याशिवाय इतर साहित्य असावेच असा त्यांचा आग्रह नसतो. लाल फूल नसेल तर पांढरे फूल... पिवळे नसेल तर लाल फूल... किंवा कुठलेच फूल नसेल तर नुसत्या अक्षता असल्या तरी त्यांची पूजा सुरळीत पार पडेल अशी सगळ्यांची खात्री. पंचामृतामध्ये एकादा पदार्थ नसला तरी गुरुजींची कटकट नसते. तुपाऐवजी तेलाचा अन् तेलाऐवजी तुपाचा दिवा असला तरी चालेल. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळॆ पदार्थ सारख्याच महत्त्वाचे. ते फक्त पूजा सांगणारे गुरुजीच नव्हेत तर बर्यापैकी कीर्तनकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. आणि ते दक्षिणा सुद्धा माफक घेत असल्यामुळे त्यांचा यजमानवर्गसुद्धा बराच मोठा आहे.
सोसायटीचा कार्यक्रम असल्यामुळे गुरुजी लगेच तयार झाले व ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या शनिवारी रात्री ठीक साडे आठ वाजता सोसायटीच्या हॉलमध्ये कार्यक्रम करण्याचे नक्की झाले व सभासदांना तसे कळविण्यात आले. कार्यक्रम साधारणपणे दीड एक तासाचा असल्यामुळे दहा वाजेपर्यंत संपेल अशी अपेक्षा होती. दुसर्या दिवशी रविवार असल्यामुळे शनिवार सगळ्यांनाच म्हणजे लहान मोठ्यांना सोयीचा होता.
कीर्तनाच्या कार्यक्रमाची कामानुसार विभागणी करण्यात आली. मोजकेच लोक येतील, अन् गुरुजींचा आवाजही ठणठणीत असल्यामुळे लाऊडस्पीकरची आवश्यकता नसल्याची अध्यक्षांची सूचना आम्ही मोडीत काढली व एक छोटा लाऊडस्पीकरसुद्धा आम्ही आणला.
तरूण सदस्यांपैकी मी, दिनू अन् इतर दोघे अशा आम्ही चौघांनी कार्यक्रमाची जबाबदारी घेतली. पूजासाहित्य गोळा करण्याची जबाबदारी दिनूकडे होती. शनिवारी ऑफिस लवकर सुटत असल्यामुळे दुपारी चार वाजल्यापासूनच तयारीला सुरुवात झाली. उपस्थितांना बसायला खाली सतरंज्या टाकल्या. हॉलच्या दारावर फुलांचे हार लावले. रांगोळ्या काढल्या. शेजार्यांकडून चार सारख्या उंचीचे सेंटर टेबल आणून छोटेसे व्यासपीठ तयार केले. कीर्तन असल्यामुळे साथसंगतीची आवश्यकता नव्हती. एखाद दोन टाळकरी असले तरी कीर्तनासाठी लागणारा संगीताचा भाग पूर्ण होतो.
सोसायटीच्या अध्यक्षांना वाईट वाटू नये म्हणून दीपप्रज्वलनाचा दोन मिनिटाचा कार्यक्रमही ठेवला. अध्यक्षांना काडेपेटीने समई पेटवण्याचे श्रम नकोत म्हणून मी पेटविलेली मेणबत्ती त्यांच्या हाती देणार होतो. समई माझ्याच घरून आणलेली असल्यामुळे तो मान मला मिळाला होता.
शनिवारी कार्यक्रम साडेआठ वाजता असल्यामुळे सोसायटीचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांनी हॉल भरल्यासारखा वाटत होता. मुलांच्या चेहर्यावर जादूचे प्रयोग बघायला आल्यासारखा आनंद दिसत होता. नाही म्हणायला आज कार्यक्रमाला नेहमीपेक्षा जास्तच उपस्थिती होती. आमच्या अंदाजापेक्षा नेहेमीच कमी लोक येतात हे आमचं नेहेमीचं दुःख... पण आज परिस्थिती वेगळी होती. आनंदीआनंद होता. कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळ अगोदर आलेली मंडळी परत जाऊ नयेत म्हणून एका कार्यकर्त्याने “ना जा रे ना जा, रोको कोई” हे फिल्मी गीतसुद्धा बराच वेळ ध्वनीक्षेपित केलं.
दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षांनी उद्घाटनाचे भाषण, अध्यक्षीय भाषण, आभारप्रदर्शनाचे भाषण ह्या सगळ्यांची सरमिसळ करून उपस्थित मंडळी जोरात हसणार नाहीत इतपत विनोदी भाषण ठोकले. भाषणानंतरची प्रतिक्रिया... म्हणजे टाळ्यांचा गजर झाला. कुणीतरी “टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत” असे जोरात ओरडल्यामुळे पोरासोरांना टाळ्या वाजवायला आणखी जोर आला. एकदाच्या टाळ्या संपल्या. टाळ्या भाषण चांगलं झालं म्हणून की भाषण लवकर संपलं म्हणून ... कळायला मार्ग नव्हता. टाळ्या वाजल्या हे महत्त्वाचं.
गुरुजीही दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमाच्या थोडेसे आधीच आले. दीपप्रज्वलनानंतर कीर्तनाच्या आधी जी भक्तीगीतं किंवा भजनं ज्याला निरूपण म्हणतात ती झाली. कार्यक्रमाचा हा निरूपणाचा भाग पंधरा मिनिटे चालला. निरूपणानंतर कीर्तनाची मुख्य कथा सुरू होण्यापूर्वी यजमानांना अन् उपस्थितांना बुक्का लावण्याची आमच्या सोसायटीत प्रथा असल्यामुळे आता बुक्का लावण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार होती.
“अहो जरा बुक्का घेता का?”गुरुजींनी बुक्क्याविषयी विचारणा केली. पूजासाहित्य गोळा करण्याची जबाबदारी दिनूची असल्यामुळे मी दिनूकडे पाहिलं... दिनू अगदी ब्लँक. त्याला काही सुचेना. नेहेमीप्रमाणे त्याने काही घोटाळा न करता सगळं साहित्य चोख गोळा केलं असेल असं जे मला वाटत होतं... ते चुकीचं निघालं. दिनू बुक्का आणायला पूर्णपणे विसरला होता.
“एक काम कर दिनू... तू आमच्या घरी जा अन् बुक्का घेऊन ये!” मी म्हणालो. आमचं घर अगदी जवळ असल्यामुळे आमच्या घरूनच बुक्क्याची पूर्तता करणं सोयीचं होतं.
खरं तर मलाही जाता आलं असतं पण पूजासाहित्य गोळा करण्याचं काम त्याचं असल्यामुळे मी त्याला सांगितलं. दिनू आमच्या घरी नेहेमीच येत असल्यामुळे त्याला बुक्का आणायला वेळ लागणार नव्हता. आमचे वृद्ध आबा नेहेमीच घरी असल्यामुळे आमचं घरही उघडंच होतं. खरं तर आम्ही बुक्का नाही असं म्हणालो असतो तरी चालण्यासारखं होतं. विद्वांस गुरुजींनी निभावून नेलं असतं. पण कर्तव्यदक्षता दिसावी म्हणून दिनू आज्ञाधारकपणे लगेच आमच्या घरी पळाला अन् येताना काचेची बाटली घेऊन आला. त्याने गुरुजींना बाटली दिली.
कीर्तनाचा कायक्रम छान झाला. कीर्तनाची कथा सगळ्यांना फार आवडली. सगळे खूष झाले. काही मुलांनी तर नेहेमीप्रमाणे कीर्तनालाही वन्समोरची आरोळी ठोकली. वन्समोरच्या आवाजाने शांताकाकूंजवळ गाढ झोपलेला त्यांचा नातू खाडदिशी जागा झाला अन् त्याने “आजी काकांनी कुठल्या सिनेमाची गोष्ट सांगितली?” अशी जोरात विचारणा केली. काकूंनी बहुतेक गुरुजी सिनेमाची गोष्ट सांगणार आहेत अशी समजूत घालून त्याला कार्यक्रमाला आणलं असावं. त्यांनीसुद्धा कुठल्यातरी सिनेमाचं नाव सांगत पाठीत एक धपाटा घातला अन् त्याला शांत केलं.
आवराआवर करण्यापूर्वी मी गुरुजींना, दिनूला अन् दोन कार्यकर्त्यांना आमच्या घरी दुसर्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळचं चहाचं आमंत्रण दिलं. गुरुजींना मला माझ्याकडून काही दक्षिणा द्यायची होती.
दुसर्या दिवशी सकाळी (गुरुजींसोबत?) मी, दिनू अन् दोन कार्यकर्ते आमच्या घरी पुढल्या खोलीत पाकशाळेतून चहा येण्याची वाट बघत बसलो होतो. आमच्या आदल्या दिवशीच्या कार्यक्रमाविषयी गप्पा सुरू होत्या.
“काल लावलेला बुक्का तुम्ही कुठून आणला होता?” गुरुजी.
“का बरं?” मी.
“नाही त्याला एक छान वेगळाच वास होता.” गुरुजी.
“हो, मलासुद्धा छान वास येत होता!” एक कार्यकर्ता.
“हो, मलासुद्धा... दिनूला विचारलं तर तो म्हणाला, हल्ली बुक्का चांगला वाटावा म्हणून वास येण्यासाठी त्यात काहीतरी टाकतात.” चौथा कार्यकर्ता.
आमच्या गप्पा सुरू असतानाच...
“तरीच मी विचार करत होतो की फ्रीजवर ठेवलेल्या माझ्या काळ्या दंतमंजनाच्या बाटलीची जागा कुणी बदलली... अन् पूर्ण भरलेली बाटली अर्धी रिकामी होईल एवढ्या लोकांनी रात्री दात स्वच्छ करण्याचं कारण काय? अरे शहाण्या, ती बुक्क्याची बाटली नव्हती, ती काळ्या दंतमंजनाची बाटली होती... विकत आणलेली बाटली फुटल्यामुळे ते दंतमंजन मी एका साध्या बाटलीत भरून ठेवलं होतं... दंतमंजनात निलगिरी वगैरे टाकलेली असते त्याचा तो वास असेल. दिनू आला तेंव्हा मी आतल्या खोलीत होतो. पण हा कशासाठी आला ते मला कळलंच नाही. ह्यानी मला विचारलं असतं तर मी त्याला बुक्क्याची बाटली काढून दिली असती पण हा मला काही न विचारताच निघून गेला.”
आबा त्यांच्या आतल्या खोलीतूनच जोरात ओरडले. त्यांनी आमचं संभाषण ऐकलं होतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा