- माधव
जोशी
"किती
देऊ या?" आहेराचं पाकीट तयार करता करता त्याचा प्रश्न.
"मुलं
येतील का हो?"
"प्रश्नाला
प्रश्न काय विचारतेस गं?"
"तुमच्या
प्रश्नाचंच उत्तर देतेय."
"म्हणजे?"
"म्हणजे
दोघंच जाणार असलो तर पाचशे आणि चौघंही जाणार असलो तर एक हजार."
"अग
‘दूर्वांकुर’मध्ये का जेवायला चाललोय आपण?" शेखरनी हातातली
मित्राच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दाखवली.
त्यानंतर
बरीच चर्चा झाली त्यांची आणि "व्यवहार कशाशी खातात, हे कळत नाही तुम्हाला"
या वाक्याने त्या परिसंवादाचा समारोप झाला.
शेखरनी
हा किस्सा जेव्हा सांगितला, तेव्हा हसायला आलं खरं. तिच्या बोलण्यात तथ्य नव्हतं, असं
नाही. स्पष्ट विचार आणि पारदर्शक व्यवहार हे गुणही नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत, पण
'सप्रेम भेटी’चा प्रश्न, हा असा त्रैराशिक मांडून सोडवावा, हे मला विचित्र वाटलं, एवढंच!
'देण्या'बद्दलचा विचार सुरू झाला, तो तिथून.
कशासाठी? घेण्यासाठी!
शाळेत
मधल्या सुट्टीत डबा खाताना आम्ही वाटावाटी करायचो. ज्याच्या डब्यात काही चमचमीत पदार्थ
असायचा, त्याला आपल्याकडची पोळीभाजी द्यायला बरेच हात पुढे जायचे. तेव्हा खरं तर त्यातले
बरेच हात, काही देण्यापेक्षा, बरंच काही घेण्यासाठी पुढे आलेले असायचे. अर्थात यामध्ये
निरागसपणा होता.
देण्याचे
बरेच व्यवहार हे खरं तर घेण्यासाठी असतात. देतो त्यावर रास्त नफा कमावणं, म्हणजे व्यापार.
यात गैर काही नाही. देतो त्याच्या तुलनेत अवाजवी मिळवणं, ही मात्र झाली फसवणूक. आणि
काहीच न देता मिळवणं, म्हणजे चक्क लूट.
हे
रुक्ष व्यवहार सोडले, तर ‘देण्या’शी भावना जोडलेल्या असतात. घरी आलेल्या पाहुण्याला
आपण चहा देतो. त्या संदर्भात वपुंच्या 'हसरे दुःख' मध्ये एक वाक्य आहे "अरे, चव
काय पदार्थाची असते का? ज्या भावनेने तो पदार्थ तुम्हाला दिला
जातो, त्या भावनेची पहिली चव असते. वस्तू नाममात्रच असते पुष्कळदा!"
“You
can give without loving, but you can never love without giving.”
–
Victor Hugo
‘गिफ्ट’
हे देण्याचं सर्वात लोभस रूप! त्यातही 'व्यवहार' नेहमीच टाळता येतो, असं नाही. पण
‘उपचार‘ जसा मागे पडत जातो, तसा 'भेटी'चा गोडवा वाढत जातो. मग
आहेराचं पाकीट भरताना प्रश्न पडत नाही. देणारा सहजपणे देतो आणि घेणाऱ्यालाही संकोच
वाटत नाही. उष्टी बोरं आणि फाटक्या शिदोरीतले पोहे मग गोड लागतात आणि काही तोळ्यांच्या
हाराचंही ‘ओझं’ वाटत नाही.
परं
परोपकारार्थं यो जीवति स जीवति।
देण्याचं
उदात्त रूप म्हणजे दान! काही जण अन्नदान करतात, तर काही विद्यादान. कुणी पैसा देतात,
तर कुणी वेळ! काही रक्त देतात, तर काही रक्त सांडतात. नेत्रदान आणि देहदान करणाऱ्यांच्या
दृष्टीने तर मृत्यू ही सुद्धा एक ‘संधी’ ठरते.
नुसतं
२० मार्क्स मिळाले, हे म्हणणं संदर्भहीन आहे. २० पैकी २० मार्क्स मिळाले, हे कळलं,
तर चित्र स्पष्ट होतं. दानाचंही तसंच आहे.
सर्वश्रेष्ठ दान
आज
मिळालेलं सर्वश्रेष्ठ दान कोणतं, असं विचारल्यावर गौतम बुद्धाने आपल्या झोळीतून एक
अर्धं खाल्लेलं फळ काढून दाखवलं होतं. कारण ज्या वृद्धेनं ते
दिलं, ते तिच्याकडचं सगळं काही होतं, त्याशिवाय द्यायला तिच्याकडे दुसरं काही नव्हतं.
असू
आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील
अर्थेष्णा
आणि कामेष्णा या बरोबरच लोकेष्णा ही सुद्धा माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. मूर्त स्वरूपात
परत काही नको असलं, तरी नावलौकिक ही देण्यामागची प्रेरणा असू शकते. महारथी कर्ण हा
दातृत्वाचा मापदंड. पण कवचकुंडलं दिली, तेव्हा त्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती,
हे विसरून चालणार नाही.
सिंगापूरमध्ये
सुभाषचंद्र बोस यांची एक मोठी सभा झाली. त्यांच्या ओघवत्या वाणीने श्रोते मंत्रमुग्ध
झाले. सभेच्या शेवटी आपल्याला मिळालेल्या हारांचा लिलाव करण्याची त्यांनी घोषणा केली
आणि तो पैसा ‘आझाद हिंद फौजे’च्या उभारणीसाठी वापरला जाईल, असं ते म्हणाले. श्रोत्यांमध्ये
अनेक धनिक भारतीय होते. गर्दीत एक भारावलेला तरुणही होता. एका हारासाठी तो बोली लावत
होता. पण कोणी ना कोणी त्याच्यापेक्षा मोठी बोली लावत होतं. शेवटी ते सगळं असह्य होऊन
तो व्यासपीठापाशी गेला आणि म्हणाला, "मेरी पुरी जायदाद!" नेताजींनी त्या
हाराचा लिलाव थांबवला. त्यांच्या दृष्टीने ती सगळ्यात मोठी बोली होती.
जगाच्या
पाठीवर अशी निरपेक्षपणे देणारी कर्णापेक्षाही उदार माणसं होऊन गेली, पण इतिहासाने त्या
सगळ्यांची नावं लक्षात ठेवलीच, असं नाही आणि काळाच्या पटलावर आपली नावं कोरण्यासाठी
त्यांनीही कष्ट घेतले नाहीत.
की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
भावनेच्या
ओलाव्याशिवाय त्याग शक्य नाही, पण तेवढी शिदोरी पुरेशी नसते काही वेळा.
एक
व्यापारी नावेतून नदी पार करत होता. प्रवाहाच्या मध्यभागी पोहोचल्यावर नावेला छिद्र
पडल्याचं आणि त्यातून पाणी शिरू लागल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याला पोहोता येत
नव्हतं. तेवढ्यात त्याला एक दुसरी नाव दिसली. व्यापाऱ्याने नावाड्याला हाक मारली आणि
म्हणाला "मला वाचव, माझं सगळं धन मी तुला देईन". नावाड्याने त्याला आपल्या
नावेत घेतलं. थोड्या वेळाने व्यापारी नावाड्याला म्हणाला, "मी सगळी संपत्ती तुला
दिली, तर माझ्या कुटुंबाचं काय होईल? मी तुला सगळी नाही, पण अर्धी संपत्ती देईन." नावाडी काही बोलला नाही. अजून थोड्या वेळाने व्यापारी
म्हणाला "माझ्या संपत्तीवर माझ्या मुलांचाही हक्क आहे, मी तुला अर्धी नाही, पण
एक चतुर्थांश संपत्ती देईन." असं करत नाव प्रत्यक्ष किनाऱ्याला जेंव्हा लागली,
तेंव्हा व्यापाऱ्याने सोन्याची एक मुद्रा नावाड्याच्या हातावर ठेवली.
एखाद्या
उत्कट क्षणी खूप काही देण्याची इच्छा होते, काळाच्या कसोटीवर ती टिकतेच, असं नाही.
पण अंदमानाचं काळं पाणी, रत्नागिरीची स्थानबद्धता आणि स्वकीयांनी केलेला गांधीवधाचा
खोटा आरोप पचवूनही जेंव्हा एखादा महापुरुष देतच राहतो, तेव्हा ते 'देणं' बुध्दीलाही
पूर्णपणे पटलेलं असतं, म्हणून त्या संकल्पाला ताकद मिळालेली असते.
काही
वेळा जेवढं द्यायची इच्छा असते, जवळ ‘तेवढं’ नसतं!
जैनेंद्र
कुमार यांची एक कथा आहे – ‘अपना अपना भाग्य’. दोन मित्र नैनितालला जातात. कडाक्याची
थंडी पडलेली असते. एक गरीब मुलगा त्यांना भेटतो. त्यांना त्याची दया येते. त्याला मदत
करण्यासाठी दोघेही खिशामध्ये हात घालतात, पण निराश होऊन खिशातून हात बाहेर काढतात.
त्यांच्या अवस्थेचं वर्णन लेखकाने उपहासात्मक पण खूप मार्मिक शब्दात केलं आहे -
"ह्रदय में जितनी दया है, पास में उतने पैसे तो नही है ...
(सब) दस दस के नोट है।" (कथा तशी जुनी आहे, ती जर आज लिहिली
गेली असती, तर कदाचित 'सौ सौ के नोट' असं लिहिलं गेलं असतं.)
सिग्नलला
एक कार येऊन उभी राहिली. मळक्या कपड्यातलं एक मूल गाडीच्या खिडकीपाशी
गेलं. इथपर्यंतचं दृश्य परिचयाचं होतं. काच उघडली गेली. मालकानं जवळ होतं ते ताजं रसरशीत
फळ मुलाच्या हातावर ठेवलं.
असं
खिशात असेल ती ‘नोट’ देणं प्रत्येकाला आणि प्रत्येक वेळेला जमतंच, असं नाही. मग जेवढं
वाटतं, तेवढं तरी देण्याची तयारी काही जण विचारपूर्वक करतात. बाहेर पडताना सिग्नलवरच्या
गरीब मुलांसाठी कारमध्ये आठवणीने छोटे बिस्कीट पुडे ठेवणारेही काही जण भेटतात.
असं
म्हणतात, की ‘Every charitable act is a stepping stone
towards heaven’. तेव्हा लहान-मोठ्या स्वरूपात का होईना, देणाऱ्याने देत राहावं.
`मी’ ह्या केंद्रापासून काढायला सुरुवात केलेल्या वर्तुळाची त्रिज्या जशी वाढत जाते,
तशा अधिकाधिक गोष्टी 'आपले'पणाच्या परिघात येऊ लागतात. हे ‘प्रमेय’ जसं उलगडत जातं,
तसा आयुष्याला अर्थ प्राप्त होत जातो …
“We make a living by what we get. We make a life by what we give.”- Winston Churchill
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा