अभिजात संगीताची साधना

अंजलीताई मालकर यांची निशा किर्लोस्कर यांनी घेतलेली मुलाखत

     प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका अंजलीताई मलकर यांच्या संगीतमय प्रवासाचा मागोवा... साम्राज्य सोसायटीच्या ऑनलाईन दिवाळी अंकासाठी आपल्याच सोसायटीत राहणाऱ्या शास्त्रीय संगीत गायिका अंजली मालकर यांची निशा किर्लोस्कर यांनी घेतलेली ही मुलाखत.

 

निशा - शास्त्रीय संगीत हे एखाद्या सागरासारखं आहे. आपणही लहानपणापासून संगीत साधना करत आहात. आपल्या सुरवातीच्या संगीत प्रवासाविषयी काय सांगाल?

अंजलीताई -  माझं बालपण औरंगाबादमध्ये गेलं. मला आईकडून गाण्याचा वारसा मिळाला. ती उपांत्य विशारद असल्यामुळे शास्त्रीय संगीत मी लहानपणापासून ऐकत होते. पाचवीत असताना तिने मला पं. मधुसूदन भावे यांच्याकडे रीतसर शिकायला पाठवलं. कॉन्व्हेंट शाळेत असल्याने मी ख्रिसमस कॅरोल्स नेहमी म्हणत असे. मला दहावीला चांगले मार्क्स असूनही मी गाणं करायचं म्हणून आर्टसला गेले. वडील डॉक्टर असल्याने त्यांना साहजिकच मी डॉक्टर व्हावं, असं वाटत होतं. पण संगीताच्या आवडीमुळे मी संगीत विषय घेऊन बी.ए. झाले. त्यानंतर आकाशवाणी औरंगाबादच्या संगीत विभागाचे प्रमुख यशवंतबुवा क्षीरसागर, विश्वनाथ ओक यांच्याकडे नाट्यसंगीत शिकले. घरात रेडिओ सतत चालू असायचा. त्यामुळे सगळ्या प्रकारची गाणी मला ऐकायला मिळाली. नंतर मुंबईला एस.एन.डी.टी.मध्ये एम.ए. करायला गेले. तेथे विभाग प्रमुख डॉ. प्रभा अत्रे याचं मार्गदर्शन लाभलं. ती संधी माझ्या दृष्टीने संगीताचे दालन खऱ्या अर्थाने खुले करणारी ठरली. शास्त्रीय संगीताशिवाय समाजशास्त्र, मानसशास्त्र, कर्नाटक संगीत, रवींद्र संगीत या संगीताची ओळख त्यांनी करून दिली. इतर अनेक संगीतविषयक पैलूंचा परिचय देखील प्रभाताईंनी करून दिला. नुसताच रियाज करून चालत नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो, असं त्या म्हणायच्या. त्यानंतर, हसतमुख व उदार मनाच्या पंडित सी. आर. व्यास यांच्याकडे थोडा काळ शिकले. मुंबईला अनेक परिसंवाद ऐकले तसेच एस.एन.डी.टी.मध्ये  ऑडिओ लायब्ररी असल्यामुळे त्याचा खूप फायदा झाला. कारण त्यावेळी रेकॉर्डिंग्ज आतासारखी सहजपणे मिळत नसत.


निशा – तुम्ही विदुषी वीणाताई सहस्रबुद्धे यांच्याकडे बराच काळ संगीताचे धडे घेतले आहेत. त्यांच्याकडील शिकण्याचा अनुभव कसा होता?

अंजलीताई -  वीणाताई अफलातून शिकवायच्या, त्या एका वेळी २५ मुलींना, हातात तबला घेऊन शिकवायच्या. प्रामाणिक, शिस्तप्रिय, सोज्वळ अशा वीणाताईंकडे सलग दहा वर्ष शिकण्याचा योग आला. त्यांच्या ‘भाववीणा’ आणि ‘ऋतुचक्र’ या ध्वनिफिती तयार होताना मला प्रत्यक्ष बघायला मिळाले. त्यातून खूप शिकायला मिळाले. लहानमोठे कोणीही असो, शिकण्याची लाज कधी वाटू देऊ नका, असे त्या नेहमी म्हणायच्या. रामाश्रय झा, बळवंतराय भट्ट, वसंत ठकार अशा बऱ्याच रचनाकारांची ओळख त्यांनी आम्हाला करून दिली. प्रत्येक घराण्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन त्यांनी स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली होती, त्याचा आम्हाला उपयोग झाला. 

(त्यांनी शिकवलेली एखादी बंदिश म्हणून दाखवता का? असं विचारल्यावर अंजलीताईंनी लगेच हंसध्वनीची बंदिश “हे सकल दुख हरन” म्हणून दाखवली. - त्याची ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.)

निशा - त्यानंतर म्हणजे सध्या तुम्ही पंडित विकास कशाळकर आणि कुमुदिनी काटदरे यांच्याकडे मार्गदर्शन घेत आहात. दोघांच्या शिकवण्यामध्ये काय वेगळेपण आहे किंवा दोघांचं वैशिष्ट्य काय आहे?

अंजलीताई -  पं. विकास कशाळकर यांच्याकडे संगीताकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. ग्वाल्हेर परंपरेच्या दुसऱ्या शाखेची ओळख (गजानन जोशी यांची परंपरा) झाली. रागाच्या प्रस्तुतीकरणामध्ये आलाप, तान, बोलतान असे पृथक न बघता सर्वंकष प्रस्तुतीचा विचार त्यांच्याकडून कळाला. संगीताचे सौदर्य म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी कशात असते, याचा अनुभव मिळाला. ‘मराठवाड्याच्या संगीताचा इतिहास’ हे पुस्तक मी लिहिले, ते त्यांच्याच प्रेरणेमुळे. माझ्या दुसऱ्या गुरु विदुषी कुमुदिनी काटदरे. त्याचं जयपूर घराणं. त्यांची गायकी बुद्धिप्रधान आणि स्वरप्रधान आहे. त्यांचा आवाज चमकदार गोलाई असलेला आहे. स्वरांमधील आस, अतूटता आणि जयपूर गायकीची वैशिष्ट्ये अतिशय सोपेपणाने त्या मला शिकवत आहेत. अशा प्रकारे ख्याल गायनाच्या विविध घराण्यांचा अनुभव मला मिळाला.

निशा - पूर्वी गुरूकडे राहून गुरुकुल पद्धतीने संगीत शिकावं लागत असे. आता ते शक्य नाही. आता मुलांना करियर म्हणून पूर्णवेळ गाणं केलं तर त्यातून उदरनिर्वाह साधत नाही अशी खंत आहे. याविषयी तुमचं काय मत आहे.?

अंजलीताई  - तुमच्या आत्मविश्वासावर सगळं अवलंबून आहे. आपण गाणं करू शकू असा कॉन्फिडन्स वाटत असेल तर त्याच्या बरोबरीने येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून घेतल्या पाहिजेत. तुमची कलेकडे बघण्याची दृष्टी कशी आहे, त्यावर ते अवलंबून आहे. पूर्णवेळ संगीत करणाऱ्या झरीन दारूवाला, शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया, अल्लारखां यांनी फिल्म इंडस्ट्रीतही चांगलं काम केलं आहे. तुमच्यात टॅलंट असेल तर तुम्ही काही करू शकता.

निशा - आजकाल मुलांना टी व्ही वरचे रिअ‍ॅलिटी शो बघून लगेच गाणं किंवा वादन शिकावंसं वाटतं, पालक त्यांना लगेच इतर क्लास प्रमाणे गाण्याच्या क्लासला घालतात. आपल्याला शिकायला मिळालं नाही, त्यामुळे आपली इच्छा मुलांनी पूर्ण करावी असं त्यांना वाटत असतं. तर या विषयी तुम्ही काय सांगाल?

अंजलीताई – रिअ‍ॅलिटी शोमध्ये जाण्याचा उद्देश जर स्पष्ट असेल तर मुलांनी जरूर भाग घ्यावा. तात्कालिक कौशल्य त्यातून नक्कीच साधता येते. मात्र गायन शिकण्याची प्रक्रिया ही दीर्घकालीन असते. कला हे अभिव्यक्तीचं साधन आहे. तुमचा आवाज गोड आहे म्हणून तुम्ही  गायलाच पाहिजे असं नाही आणि तुमचा 
आवाज चांगला नाही म्हणून तुम्ही गाणं म्हणायचं नाही, असंही नाही. एखाद्याला खरंच गाणं शिकायचं असेल तर तो आपोआप गायला लागतो. वादनाचंही तसंच आहे.

निशा - चांगला परफॉर्मर हा उत्तम शिक्षक असतोच असे नाही किंवा उत्तम शिकवणाऱ्याला मंचावर कला सादर करता येईलच असे नाही. तुम्ही स्वतः एक परफॉर्मर आहात. शिवाय तुम्ही एम.ए.(संगीत) करणाऱ्या मुलांना आणि अमेरिकेतील शिष्यांना ऑनलाईन शिकवता तर तुम्ही दोन्हीची सांगड कशी घालता?

अंजलीताई - दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायला जमलं पाहिजे. त्या त्या वेळेची तुमची भूमिका तुम्हाला कळली पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यात जशा वेगवेगळ्या भूमिका निभावता तसंच कलेच्या बाबतीत आहे. माझे सगळे गुरु परफॉर्मर आणि उत्तम शिक्षक आहेत.

निशा – ‘हिंदुस्थानी संगीताचा सातशे वर्षांचा इतिहास’ या तुमच्या नवीन पुस्तकासाठी तुम्ही देशात बऱ्याच ठिकाणी फिरलात, तसेच अनेक संदर्भ ग्रंथांचे वाचन केले, त्याबद्दल काही सांगाल का?

अंजलीताई -  माझं पहिलं पुस्तक ‘मराठवाड्यातील अभिजात संगीताचा ७०० वर्षांपूर्वीचा इतिहास’ हे मी २००५ साली लिहिलं. ‘संगीत रत्नाकर’ हा संगीतविषयक ग्रंथ देवगिरी भागात लिहिला गेला होता, त्या शोधातून मी हे पुस्तक लिहिलं. सध्या हिंदुस्तानी संगीताचा ७०० वर्षांचा इतिहास लिहिण्याचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने माझ्यावर सोपविला आहे. तो आता दोन खंडांमध्ये लिहून पूर्ण झाला आहे आणि पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यासाठी मी बांधवगड, जयपूर, विजापूर, बडोदा अशा अनेक ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तू, वस्तुसंग्रहालये आणि ग्रंथालयांना भेटी दिल्या. हे पुस्तक लिहिण्यासाठी मी किमान ३०० पुस्तकांचे संदर्भ जमा केले आहेत. त्यातील अनेक संदर्भ दुर्मिळ आहेत. हे पुस्तक लिहिताना खूप बौद्धिक आनंद आणि मानसिक समाधान मिळाले.  

निशा - शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त तुम्ही काय ऐकता आणि इतर छंद कोणते आहेत?

अंजलीताई - मी सर्व प्रकारचं संगीत ऐकते. लावणी, फटका, गजल, चित्रपटगीते, पाश्चात्य संगीत, कर्नाटक संगीत हे सगळं आवडतं. याशिवाय भरतकाम आणि लेखन आवडते.

निशा - सर्वसामान्य श्रोत्याने संगीताची आवड कशी जोपासावी, असे तुम्हाला वाटते? एखाद्या मालिकेमध्ये शास्त्रीय गायन वादन बघून लोकांना वाटते, हेच शास्त्रीय संगीत. याविषयी तुम्हाला काय वाटते?

अंजलीताई  - गाणं ऐकता ऐकता श्रोत्यांना शास्त्रीय संगीताची आवड आपोआप लागते. आधी भावगीतं, मग नाट्यगीतं, मग वादन आणि मग शास्त्रीय गायन अशा प्रकाराने आवड विकसित होते. अलीकडील मालिकांमधलं शास्त्रीय गायन, वादन जर त्यांना आवडत असेल तर काही काळ ते ऐकलं जाते. मात्र पुढे जेव्हा त्यांना अधिक खोलात जाऊन ते जाणून घेण्याची इच्छा होते, तेव्हा ते मूळ गायन वादनाकडे वळतात, असा अनुभव आहे. त्यामुळे सुरवातीचा भाग म्हणून आपण त्या आवडीकडे पाहिलं पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

संस्कृत – समज आणि गैरसमज