‘समृद्धी’ची वाटचाल

-      नीलिमा सदावर्ते

 

 साम्राज्यचा ऑनलाइन दिवाळी अंक ही सुंदर कल्पना वाचली आणि खूप छान वाटले. आपल्याला कथा-कविता असं काही लिहिता येत नाही पण स्नेहा लिमयेच्या(ओ-२०५) मदतीने चालवलेल्या प्रयत्नांची माहिती आपल्या लोकांपर्यंत म्हणजेच साम्राज्यमध्ये सर्वांपर्यंत पोहचवावी असं वाटलं म्हणून हे लेखन.

एक गोष्ट नेहमी खटकायची - मराठी माणूस दुकानदारीत दिसत नाही. महाराष्ट्रात ९८% अमराठी दुकानदार वेगवेगळे व्यवसाय करतात. दुकानदारीत काही मराठी लोकांनी मानाचे स्थान मिळवलेही आहे. पण तरी प्रमाण अतिशय कमी आहेच. 




जानेवारी २०१८मध्ये सहज मनात आलं, नुसतं बोलण्याऐवजी आपण एखादं दुकान सुरू करावं. स्नेहाला विचारलं, तयार आहेस का आणि ती हो म्हणाली. त्याचदिवशी प्रकाश स्टेशनरी दुकानात चौकशी केली तर त्याचंदुकान रिकामं होतं. खरं तर आधी अभ्यास करायला हवा होता. पण दुकान हवं की नको हे २-३ दिवसात सांगायचं होत. घराजवळचं दुकान म्हणून फार विचार न करता निर्णय घेतला.

दुकान कसं चालवायचं असतं, सामान कसं घ्यायचं असतं, कुठून घ्यायचं असतं काहीच माहिती नव्हती. डोक्यात एकच होतं मराठी माणूसही दुकान चालवू शकतो, व्यवसाय करू शकतो.

सर्व जमवाजमव, धावपळ करून, मग आठ दिवसात समृद्धी फूड शॉपी सुरू केली.

माहितीपत्रक छापून आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये घरोघरी फिरलो, बोललो. कितीतरी घरी छान ओळखी झाल्या, ते आमच्याशी आजतागायत जोडले गेलेत.

आम्ही हे दुकान सुरू केलं ना, यामध्‍ये आमचा किती फायदा होतोय यापेक्षाही समोरच्या माणसाची गरज आपण भागवू शकतो याचं समाधान खूप मिळतं. त्याला चांगल्या दर्जाच्या गोष्टी आपण पुरवतो, लोकांच्या विश्वासाला जागतो ही गोष्ट आम्हालाच आनंद देते.

तिसऱ्या वर्षातली आमची ही वाटचाल आहे. रोज नवीन नवीन काहीतरी शिकत असतो. नवीन नवीन अनुभव येत असतात. आम्हाला खूप मोलाचे सल्ले या क्षेत्रातील लोकांकडून मिळाले, तुम्ही मार्केट बघून, गर्दीचे ठिकाण न निवडता दुकान सुरू केलं आहे, आता तुम्हाला खूप वाट बघावी लागेल याची त्यांनी आम्हाला कल्पनाही दिली. 

सुरवातीच्या दिवसात खूप निराश वाटायचे. माझं ठीक, मी प्रयत्न म्हणून यात पडले. पण मिळणारी नोकरी सोडून स्नेहाला इथे आणले. अर्थात भरपूर पेशन्स ठेवून आम्ही तेही दिवस काढले.  

रं तर घरगुती व्यवसाय करून जास्त नफा मिळतो. दुकान भाडे, जास्त दराने लाईट बिल, कामावरील लोकांना द्यावा लागणारा पगार, इतर अनेक छोटे मोठे खर्च नसतात.

पण आम्हाला तसे करायचे नव्हते. आज आम्ही तीन-चार जणांना रोजगार देऊ शकतो. अनेक पदार्थ असे आहेत की आम्ही ते दुकानात ठेवून त्यांच्या छोट्या व्यवसायाला हातभार लावत आहोत. दर्जा, स्वच्छता, विश्वास जपतो आहोत, ज्यामुळे माणसं समृद्धीशी जोडली जात आहेत.

यातील समाधान खूप जास्त आहे.

यापेक्षा यश ते काय. 

आपल्याला वाण्याच्या दुकानातून घ्यायची सवय आहे. ते सगळे एकमेकांशी जोडलेले असतात, हवं ते तात्काळ मिळते तेथे. आम्हीही खूप शिकतो त्यांच्याकडून. त्याच्यानंतर ॲमेझॉन, बिग बास्केट, बिग बजार, आता रिलायन्स. या सर्वांशी स्पर्धा करणं केवळ अशक्य. या अंबानी भाईंना तर फक्त एकटे शिल्लक रहायचे आहे.

तीव्र स्पर्धा करत सर्वांना संपवून ते खूप पुढे जाणार आहेतच.

पण या स्पर्धेत मराठी अस्तिव या व्यवसायात राहावे यासाठी आम्हीही आमच्या परीने प्रयत्न केले, करत राहणार आहोत हे समाधान आम्हाला आहे.

 मार्चमध्ये लॉकडानच्या आधी पूर्ण दुकान रिकामं झालं होतं. चला व्यवसाय करून बघितला, आता बस असं वाटलं होतं.

पण साम्राज्यमध्ये लॉकडानच्या काळात खूप जणांशी चर्चा झाल्या आणि आपल्यासोबत आपला साम्राज्यपरिवार आहे हे लक्षात आले. पुढे घेतलेले हे पाऊल जोपर्यंत आपले लोक साथ देत आहेत तोपर्यंत मागे नाही घ्यायचे ठरवले. आणि अजून एक पाऊल पुढे टाकायचे ठरवून, परत दुकानात सामान भरून सज्ज झालो आपल्या सेवेसाठी....  🙏🏻

सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 💐💐


टिप्पण्या

  1. निलिमा lockdown च्या काळात खरच खूप आधार मिलला समृद्धी foods चा! तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 💐💐💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

देणं कृतज्ञतेचं!

पैसा पैसा पैसा...